रॉयल एनफिल्ड’च्या बाइकबाबत बोलायला सुरुवात केल्यानंतर तिच्या भारदस्तपणाचे तोंडभरून कौतुक करावे तेवढे कमीच असते. आयुष्यात स्वत:ची रॉयल एनफिल्ड बाइक असावी, असे अनेकांचे स्वप्न असते. एनफिल्डला स्टार्ट मारल्यावर बुलेटचा रांगडेपणा, तिची बाजारातील वेगळी ओळख आणि ती गाडी चालविणाऱ्याकडेही सगळ्यांचे आपसूकच लक्ष लागून राहते. गाडीवर बसल्यानंतर गाडीमधून निघणाऱ्या ‘डूग डूग’ आवाजामुळे गाडी चालविणाऱ्याला रस्त्यावरचा राजा असल्याचाच भास होतो. त्यामुळेच रॉयल एनफिल्ड ही सर्व भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र असे असतानाही एनफिल्डकडून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती काळजी न घेतल्याची तक्रार अनेक चालकांकडून येते. सुरक्षिततेची आवश्यक ती मानके पूर्ण केल्यास रॉयल एनफिल्ड आणखी ‘रॉयल’ होण्यास वेळ लागणार नाही.

रॉयल एनफिल्ड भारतीय बाजारामध्ये १९९० पासून स्वत:ची वेगळी ओळख टिकवून आहे. तेव्हापासून या गाडीमध्ये खूप काही बदल करण्यात आलेला नाही. तंत्रज्ञानाचा अतिशय कमी वापर करून शक्य तितकी बाइक साधी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र केटीएम ३९०, बजाज डॉमिनर ४०० आणि महिंद्रा मोजो ३०० या प्रतिस्पर्धी बाइक्स रॉयल एनफिल्डच्या तुलनेत तांत्रिकदृष्टय़ा अधिक प्रगत आहेत.

ज्या वेळी आपण ५०० सीसीच्या रॉयल एनफिल्डशी तुलना केटीएम ३९० आणि बजाज डॉमिनर यांच्याशी करतो त्या वेळी केटीएम ३९० आणि बजाज डॉमिनर या वैशिष्टय़ांच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आघाडीवर आहेत. दोन्ही बाइक्समध्ये (केटीएम ३९० आणि बजाज डॉमिनर ४००) एबीएस, स्लिपर क्लच, राइड बाय वायर ही वैशिष्टय़े आहेत. वैशिष्टय़ांमध्ये असा भला मोठा फरक असला तरी रॉयल एनफिल्डच्या विक्रीमध्ये मे २०१७ मध्ये २५.५ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते, हे विशेष!

रॉयल एनफिल्डने आतापर्यंत अनेक प्रतिस्पध्र्याना केव्हाच मागे टाकले असून, २००५ मध्ये एनफिल्डने भारतामध्ये आपली पन्नाशी साजरी केली. एनफिल्डने भारतीय बाजारामध्ये १० बाइक्स भारतीय बाजारामध्ये उतरवल्या आहेत.

बुलेट ३५० आणि ५००, क्लासिक ३५० आणि ५००, डेझर्ट स्टॉर्म ५००, क्रोम ५००, थंडरबर्ड ३५० आणि ५००, हिमालयन ४१० सीसी आणि कॉन्टिनटल जीटी ५३५ सीसी यांचा यामध्ये समावेश होतो. या सर्व बाइक्समधील फक्त चार बाइक्सना रिअर डिक्स ब्रेक देण्यात आले आहेत. यामध्ये थंडरबर्ड ३५० आणि ५००, हिमालयन आणि कॉन्टिनटल जीटी या बाइक्सचा समावेश आहे. इतर बाइक्समध्ये योग्य मानकांसह ड्रम ब्रेक्स वापरले जातात.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तसे पाहिले गेल्यास रॉयल एनफिल्ड ही अपघात होण्यास कारणीभूत ठरणारी बाइक आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त बाइकमध्ये मूलभूत गोष्ट असणारे रिअर डिक्स ब्रेक देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रॉयल एनफिल्डने सरकारने तयार केलेले प्रदूषणाबाबतचे नियम पाळले असून, बीएस४ इंजिन विकसित केले आहे. यामुळे पर्यावरणाचे आणि लोकांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. मात्र असे करत असतानाच एनफिल्डने गाडी चालवणाऱ्या रायडर्सच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.

एनफिल्ड बाइक्सचे वजन आणि ताकदीचा विचार करता सर्व बाइक्समध्ये एबीएस प्रणाली असणे सामान्य बाब आहे. मात्र असे अनेक बाइक्समध्ये दिसून येत नाही. बाइकला वजन आणि ताकद असल्याने रस्त्यावर अचानक अडथळा निर्माण झाल्यास तेवढय़ाच ताकदीने बाइक थांबविण्यासाठी एबीएस प्रणाली आवश्यक आहे. पावसामुळे ओलसर झालेल्या आणि वाळूच्या रस्त्यावरून एनफिल्ड जात असताना या बाइकला थांबविणे जवळजवळ अवघड होऊन बसते. त्यामुळे बाइक घसरली जाते. हेच अपघाताचे मुख्य कारण आहे आणि याच ठिकाणी रॉयल एनफिल्डने आपल्या रायडर्सची फसवणूक केली आहे. सरकार प्रत्येक वेळी चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही नवे नियम आणते. खास करून ज्या वेळी चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो त्या वेळी काही पावले आपल्याकडूनही पुढे यायला हवीत. त्यामुळे रॉयल एनफिल्डने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे!

एबीएस प्रणाली काय आहे?

एबीएस अर्थात ‘अ‍ॅन्टी लॉक ब्रेक प्रणाली’. ब्रेक लावण्याच्या स्थितीमध्ये दुचाकीचे टायर लॉक होऊन गाडी अचानक थांबू नये यासाठी ही प्रणाली वापरण्यात येते. गाडीच्या स्पीड सेन्सरपासून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर एबीएस प्रणाली ब्रेक फ्लूइडच्या दबावाला नियंत्रित करण्याचे काम करते. अचानक ब्रेक लावल्यामुळे गाडी घसरण्याची शक्यता असते. एबीएस दुचाकीवरून प्रवास करत असणाऱ्या व्यक्तीस ब्रेक लावतेवेळी गाडी घसरू नये आणि अडथळ्याची मर्यादा कमी करण्यासाठी मदत करते. यामुळे दुचाकीला होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अतिशय कमी होते. युरोपियन आयोगाने १२५ सीसीच्या वरील सर्व दुचाकींसाठी एबीएस प्रणाली लावण्याची सक्ती १ जानेवारी २०१६ पासून केली आहे.

jaideep.bhopale@expressindia.com