कोलकाता येथे झालेल्या स्पीडवीक फेस्टिव्हलमध्ये वेगाचे आकर्षण असलेल्या सर्वानाच आनंदाची पर्वणी होती. फेरारी, सुझुकी एस्टीम अशा एकापेक्षा एक वेगवान गाडय़ांच्या संगतीत झालेला हा भारतातील पहिलावहिला फेस्टिव्हल भारतात ऑटोमोबाइल क्षेत्राचा विस्तार किती वेगाने होत आहे, याचेच निदर्शक होता..

तो ‘धूमऽऽऽ’ चित्रपटात दिसला आणि त्याच्या बाइक चालवण्याच्या वेडाने अनेकांना वेड लावले. फूटबॉल, जीमिंग आणि वाऱ्याच्या वेगाशी शर्यत करणाऱ्या मोटरबाइक्स ही त्याची खास आवड! वेगाच्या बाबतीतही निस्सान कंपनीला त्याची खूप पसंती! पण हिंदी चित्रपटसृष्टीतील हा वेगाचा राजा म्हणजेच जॉन अब्राहम कोलकाता येथे भरलेल्या स्पीडवीक फेस्टिव्हलदरम्यान फेरारी, सुझुकी एस्टीम अशा एकापेक्षा एक सरस गाडय़ा पाहून नादावला होता. भारतात पहिल्यांदाच होणाऱ्या या फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी आलेल्या जॉनने त्यानंतर आपले निस्सानप्रेम बाजूला ठेवत ‘फेरारी की सुस्साऽऽऽट सवारी’ करत चाहत्यांना खूश करून टाकले.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील ऑटोमोबाइल इंडस्ट्रीने खूपच प्रगती केली आहे. ऑटोतज्ज्ञांच्या मते भारतीय ऑटोमोबाइल बाजारपेठ अजूनही बाल्यावस्थेत असली, तरी याच बाजारपेठेतील काही जणांना मात्र देशविदेशातील वेगवेगळ्या गाडय़ांचे प्रचंड आकर्षण आणि माहिती असते. त्यात तरुणाईचा मोठय़ा प्रमाणावर समावेश असला, तरी अत्याधुनिक गाडय़ा आणि बाइक्स यांची लोकप्रियता प्रौढांमध्येही प्रचंड आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन कोलकाता येथील बेहला फ्लाइंग क्लब येथे तीन दिवसांचा स्पीडवीक फेस्ट भरवण्यात आला. या महोत्सवात केवळ गाडय़ा किंवा बाइक्स यांच्या शर्यतींचाच समावेश नव्हता, तर विविध ऑटो उत्पादने स्टॉल्सद्वारे संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची सोयही होती. त्याचबरोबर खाद्यपदार्थाचे स्टॉल्स, डीजे संगीत अशा विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांमुळेही भारतात पहिल्यांदाच आयोजित झालेल्या या फेस्टिव्हलची मजा वाढवली.

भारतीय बाजारपेठेत येऊ घातलेल्या नवनव्या गाडय़ा त्या गाडय़ांसाठी वेडय़ा असलेल्या तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा सहजसोपा मार्ग म्हणजे जाहिराती! पण त्याहीपेक्षा भन्नाट आणि अधिक थरारक मार्ग म्हणजे या गाडय़ांच्या विविध स्वरूपाच्या शर्यती! नेमका हाच मार्ग चोखाळत काही वर्षांपूर्वी पुण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोटरबाइक्सकरता होणाऱ्या रॉडिल कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या वेळी ही स्पर्धा भारतात पहिल्यांदाच होत होती. त्या स्पर्धेत यामाहा, सुझुकी, कावासाकी अशा एकापेक्षा एक भन्नाट बाइक्सचा समावेश होता. काही परदेशी रायडर्सप्रमाणे भारतीय तरुणांनीही त्यात सहभाग घेतला. परिणामी भारतीय तरुणांमध्ये या नवनव्या बाइक्सविषयी प्रचंड आकर्षण निर्माण झालं आणि त्याचा थेट फायदा या सगळ्या कंपन्यांना झाला. एकापेक्षा एक भन्नाट आणि वेगवान अशा बाइक्सचा चंचुप्रवेश या निमित्ताने भारतीय बाजारपेठेत झाला.

नेमका अशाच प्रकारचा हेतू घेऊन आयोजित केलेल्या स्पीडवीक फेस्टिव्हलचा हा उद्देश प्रमाणाबाहेर सफल झाला. ह्य़ुंदाई व्हेर्ना, होंडा सिटी, फोक्सव्ॉगन, मारुती-सुझुकी एस्टीम, स्कोडा लॉएरा, मारुती-सुझुकी स्विफ्ट, बीएमडब्ल्यू, फेरारी, ऑडी अशा एकापेक्षा एक गाडय़ांच्या शर्यतींबरोबरच त्या कंपन्यांचे स्टॉल्सही या फेस्टिव्हलच्या निमित्ताने लागले होते. त्याचप्रमाणे यामाहा, कावासाकी, डुकाटी, केटीएम या सध्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या बाइक्सच्या कंपन्यांच्या स्टॉल्सवर या वाहनांची माहिती घेण्यासाठी गर्दी होती. बाइकसंबंधी सगळी तांत्रिक माहिती, चकचकीत ब्रोशर्स यांच्याबरोबरच ती घेण्यासाठी कोणत्या बँकेद्वारे किती हप्त्यांमध्ये कर्ज घेता येईल, व्याजदर कसा असेल, परतफेडीच्या अटी काय असतील, अशा अनेक गोष्टींचे ज्ञान या स्टॉल्सवर करून दिले जात होते.

सेल्फी विथ बाइक

सध्या तरुणाईच नाही, तर सर्वामध्येच प्रचंड लोकप्रिय असलेल्या सेल्फीचा प्रभाव या फेस्टिवलमध्येही दिसून आला. एकाच ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अनेक सरस बाइक्स किंवा गाडय़ा डिस्प्लेसाठी असल्याने अनेकांनी या गाडय़ा किंवा बाइक्सबरोबर सेल्फी काढण्याचा आनंदही भरपूर लुटला. काहींनी तर बाइक चालवण्याच्या पोझ घेत सेल्फी आणि छायाचित्रे काढली. त्याशिवाय या सर्व गाडय़ांचे उत्पादन कसे होते, याची चित्रफीतही त्या-त्या कंपनीच्या स्टॉल्सवर पाहायला मिळत होती. विशेष म्हणजे बॉलीवूडमधील कलाकार अनिल कपूर, जॅकी श्रॉफ यांच्यासह फुटबॉलपटू बायचुंग भुतिया यांनीही आवर्जून या फेस्टिव्हलला भेट दिली. चाहत्यांबरोबर सेल्फी काढता काढता त्यांनाही या गाडय़ांमध्ये बसून ड्राइव्ह करण्याचा मोह आवरला नाही. बायचुंग भुतियाने तर फेरारीही चालवण्याचा आनंद लुटला.

वेगवान स्पर्धक

अपेक्षेप्रमाणे या शर्यतींमधील दुचाकी वाहनांच्या विभागात मुंबई, बंगळुरू, चेन्नई व कोईमतूर येथील स्पर्धकांनी निर्विवाद वर्चस्व गाजविले. दुचाकी विभागात अमित शर्मा याने सर्वात कमी वेळेत शर्यत पार करण्याचा मान मिळविला. त्याने सुझुकी चालविताना २५० मीटर्सचे अंतर अवघ्या ९.६१४ सेकंदांमध्ये पार केले. मोटार विभागात कोलकाता, नवी दिल्ली, चंडीगढ, बंगळुरू येथील स्पर्धकांनी घवघवीत यश मिळविले. प्रवीण अगरवाल याने कार रेसिंगमध्ये वेगवान स्पर्धक होण्याचा मान मिळविला. त्याने फेरारी गाडी चालवीत हे अंतर ११.५३५ सेकंदांमध्ये पूर्ण केले. विविध भारतीय व परदेशी वाहनांविषयी चाहत्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यामागचा संयोजकांचा उद्देश बऱ्याच अंशी तेथे सफल झाला. उत्सवाच्या तीन दिवसांत लोकांनी अलोट गर्दी केली होती. स्पीडवीकचा हा पहिलाच प्रयत्न खूपच यशस्वी ठरल्याने हुरूप आलेल्या संयोजकांनी अन्य शहरांतही असे उपक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

अनोखी शर्यत

शर्यतींकरिता केवळ २५० मीटरचा ट्रॅक होता. सहसा एवढय़ा कमी अंतराचा ट्रॅक नसतो. मात्र विमानाच्या रनवेवर हा ट्रॅक असल्यामुळे त्याचे वेगळेच आकर्षण स्पर्धकांमध्ये होते. तसेच एरवी शर्यतीच्या वेळी एकदम सर्व मोटारी किंवा दुचाकी वाहने सोडली जातात. त्याऐवजी येथील शर्यतीत एका वेळी दोनच दुचाकी व एकच मोटार सोडली जात होती. कमी  वेळ नोंदविणाऱ्या स्पर्धकास विजयी घोषित केले जाणार होते. रस्त्यावर मोटार किंवा दुचाकी चालविताना वेग व गाडीवर योग्य नियंत्रण ठेवले पाहिजे, सुरक्षित चालविण्यावरच भर दिला पाहिजे हा संदेश या स्पर्धेद्वारे संयोजकांना द्यायचा होता. या शर्यतीमध्ये एकाच चाकावर दुचाकी चालविण्याची स्वतंत्र शर्यत आयोजित करण्यात आली होती. त्या शर्यतीत खऱ्या अर्थाने चालकाचे कौशल्य पाहावयास मिळाले. अशी गाडी चालविताना त्यातही रनवेच्या ट्रॅकवर दुचाकी चालविताना वेग, दिशा यावर नियंत्रण ठेवताना प्रत्येक स्पर्धकाची कसोटीच पाहावयास मिळाली.

मिलिंद ढमढेरे milind.dhamdhere@expressindia.com