व्हेस्पा या नावात नॉस्टॅलजिकपणा आहे. कारण भारताच्या दुचाकी वाहन उद्योगाची विशेषत: स्कूटरची नाळ या ब्रॅण्डशी जोडली गेलेली आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक परकी कंपन्यांची उत्पादने भारतात परवाना पद्धतीच्या माध्यमातून येण्यास सुरुवात झाली होती. अर्थात, ही परदेशातून थेट आयात केली जात होती. १९६०-७० च्या दशकात देशात दुचाकी वाहन उत्पादनाचा परवाना कंपन्यांना मिळू लागला. बजाज ऑटोने पियाज्यो कंपनीची जागतिक पातळीवर यशस्वी झालेली व्हेस्पा ही टू स्ट्रोक स्कूटर उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी लागणारा परवानाही मिळाला. त्यानंतर व्हेस्पाची विक्री भारतात सुरूही झाली. मात्र, पुढे जाऊन सरकारी कारभारामुळे बजाज ऑटोने व्हेस्पाच्या डिझाइनवर आधारित स्कूटरची निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्यास कंपनीने चेतक नाव दिले. दमदार इंजिन, डिक्की, स्टेपनी यांच्यामुळे भारतीय बाजारपेठेत चेतक प्रसिद्ध झाली. अर्थात, चेतकनंतर बजाज ऑटोने अनेक स्कूटर बाजारात आणल्या. पण, व्हेस्पाची गोष्टच वेगळी होती. पुढे लोहिया मोटर्सने व्हेस्पा भारतात आणण्यासाठी करार केला आणि व्हेस्पाची पुन्हा भारतात एंट्री झाली. एलएमएल व्हेस्पा नावाने स्कूटरची अनेक मॉडेल लाँच झाली. मात्र, भारतीय बाजारपेठेत व्हेस्पाची झालेली दुसरी एंट्री पियाज्यो कंपनीसाठी यशस्वी ठरली नाही. १९९५ नंतर भारतातील दुचाकीमध्ये गिअर स्कूटरची मागणी कमी होऊ लागली. त्यामुळेच गिअर्ड स्कूटर उत्पादन कंपन्यांनी बंद करण्यास सरुवात केले. पियाज्योने एलएमएलबरोबर असणारी भागीदारी संपुष्टात आणली.

देशातील वाढता मध्यमवर्ग, बदलणारी जीवनशैली, महिला (दुचाकीच्या नव्या ग्राहक) आणि वाढते ट्रॅफिक यामुळे ऑटोमॅटिक स्कूटरना बाजारपेठेत मागणी येऊ लागली. होंडा, हीरो मोटोकॉर्प, टीव्हीएस, सुझुकी या कंपन्यांच्या ऑटोमॅटिक स्कूटरना मिळणारा प्रतिसाद आशादायी चित्र निर्माण करणारा होता. त्यामुळेच पियाज्यो कंपनीने भारतात पुन्हा एकदा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कंपनीने आयकॉनिक असणारा स्कूटरचा ब्रॅण्ड व्हेस्पाचीच निवड केली. देशाची बाजारपेठ खुली झाली असल्याने कंपनीने कोणताही भागीदार न घेता व्हेस्पा भारतात लाँच करण्याचा निर्णय घेतला. बारामती येथील कंपनीच्या उत्पादन प्रकल्पात व्हेस्पाचे उत्पादन सुरू करण्याचा निर्णय झाला. २०१२ मध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोत पियाज्योने व्हेस्पाचे ऑटोमॅटिक व्हर्जन लाँच केले.

व्हेस्पा लाँच करताना देशात उपलब्ध असलेल्या ऑटोमॅटिक स्कूटरच्या मॉडेलपेक्षा वेगळी दिसणारी तसेच, पोझिशिनगही वेगळे राहील, यावर कंपनीने भर दिला. त्यामुळेच यास १९ बीएचपीचे १२५ सीसीचे फोर स्ट्रोक इंजिन दिले. तसेच, पूर्णपणे मोनोकॉक चासीवर मेटल बॉडी दिली. तसेच, चटकदार रंगाबरोबर रेट्रो लुक दिला. यासाठी क्रोमचाही वापर करण्यात आला. त्यामुळेच ही स्कूटर डिझाइनबाबत अन्य स्कूटरच्या तुलनेत उजवी ठरली.

कम्युटिंग स्कूटरपेक्षा ही लाइफस्टाइल स्कूटर कशी आहे, असेच ब्रॅिण्डग पियाज्योने व्हेस्पाचे सुरुवातीपासून केले आहे. अर्थात, यातील प्रीमियम फॅक्टर टिकविण्यासाठी कंपनीने किंमतही प्रीमियमच लाँच करताना ठेवली होती आणि अजूनही प्रीमियमच आहे. कामावर जाताना वा फिरायला जाताना तुमचे स्टाइल स्टेटमेंट बनवा, पार्टीला जाताय मग कार नको स्कूटरवरून जा, असे काहीसे ब्रॅिण्डग सुरुवातीस झाले. त्यामुळेच सामान्य ग्राहक या स्कूटरपासून दुरावत राहिला आणि स्कूटरची किंमत स्पर्धक कंपन्यांच्या स्कूटरपेक्षा अधिक असल्याने प्रीमियम देण्यास तयार असलेला ग्राहकवर्ग याकडे आकर्षति झाला आहे. अर्थात, व्हेस्पाला मिळालेला प्रतिसाद हा अन्य स्कूटरएवढा नक्कीच नाही. पण, व्हेस्पाने एक स्वत:चा ग्राहकवर्ग आणि छाप बाजारपेठेवर नक्कीच सोडली आहे.

(पूर्वार्ध)

obhide@gmail.com