आता फक्त अंतिम सामना बाकी आहे. भारताचे आव्हान संपले. संपूर्ण स्पर्धेत आपण चांगले खेळलो. ऑस्ट्रेलिया आपल्याविरुद्ध बिनचूक क्रिकेट खेळला. भारताच्या पराभवानंतर पोस्टमॉर्टेम सुरु होणे स्वाभाविक आहे. क्रिकेट आपल्याकडे विरंगुळा नाही, तर जीवनशैलीचा भाग आहे. त्यामुळे चर्चा तर होणारच. सांघिक कामगिरीचे पोस्टमॉर्टेम व्हावे, खेळाडूंचे वैयक्तिक कोथळे काढू नयेत.
एकंदरीत वर्ल्डकपच्या निमित्ताने एक गोष्ट पक्की झाली की टॉस जिंका फलंदाजी करा, मॅच जिंका, असा नवीन फॉर्म्युला रूढ होतोय. म्हणजे टॉस हरला आणि फिल्डिंग आली की धडाधड एसेमेस येतात मॅच गेली. कर्णधारदेखील टॉस हरल्यावर सांगतो की मलादेखील पहिली फलंदाजी करायची होती. मोठे मोठे तज्ज्ञ पण सांगतात की, टॉस फार महत्त्वाचा होता. आता मॅच आहे म्हटल्यावर कुणाला तरी दुसरी फलंदाजी करावी लागणार. पहिल्या ५० ओवर्सनंतर खेळपट्टीत झालेले बदल, रात्रीच्या हवेमुळे जास्त स्विंग होणारा चेंडू, दव पडल्यामुळे खेलपट्टीत आलेले नवचैतन्य ही सगळी आव्हानं घेऊन रनरेटचे आव्हान पेलायचे हे संघाना अवघड जातंय. संपूर्ण स्पर्धेत हा ट्रेंड दिसला.
क्षेत्ररक्षणाचे नियम शिथिल झाल्याने पहिली फलंदाजी आली की ३००-३५० स्कोअर होतोय. नवीन खेलपट्टीवर हा स्कोअर करणे तुलनात्मक सोप आहे, पण दुसऱ्या फलंदाजीला तितके सोपे नाही, हे खरे. इथेच क्रिकेट विश्वापुढे नवीन आव्हान आहे विपरीत परिस्थितीमध्ये टिकून राहायचं, कणखरपणा आणि धावा करत राहायचं.
आता सर्व संघाना असे फलंदाज लागतील की जे नुसते चांगले फलंदाज नाही, तर उत्तम चेस करणारे फलंदाज असतील. कौशल्य, अधिक कणखर मन आणि गुड चेसर, अशी वेगळी मेहनत खेळाडूंना घ्यायची आहे आणि प्रशिक्षकांनासुद्धा.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शिखर धवन चांगल्या कौशल्याने खेळत होता, पण दबावापुढे तो बळी पडला. तसेच काही खेळाडू कणखर आहेत पण गॅप्स काढण्यात, क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून मारण्यात, पॉवर हिटिंग करण्यात ते कमी पडतात. म्हणून अशा दोन गुणांचे संयोग असलेले खेळाडू तयार करणे क्रिकेट पुढील नवीन आव्हान आहे.
क्रिकेटविश्वाने ते पेलून दुसऱ्या फलदाजीला तितकेच इंट्रेस्टिंग बनवायला हवे. हा असमतोल लवकर जाणे क्रिकेटच्या दृष्टीने पहिले उद्दिष्ट असले पाहिजे.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)