भारतीय संघाबाबत काय बोलणार, सलग पाच सामने आपण जिंकले आहेत. पाकिस्तान, दक्षिण आफ्रिकेसारख्या मोठय़ा संघांना आपण पराभूत केलं आहे. खरं म्हणायचं तर संघामध्ये जी संघभावना असायला हवी ती दिसते आहे. गुणवत्तेच्या बाबतीत तशी आपल्याकडे काही अडचण नसते. एवढय़ा मोठय़ा व्यासपीठावर खेळताना त्या क्षणी चोख कामगिरी करणं, दडपण झुगारून स्वत:चा कस लावणं, यांसारख्या अनेक गोष्टी मोठय़ा अवघड आहेत. या साऱ्या गोष्टी सुदैवाने आपल्याकडून होत आहेत, ही फार चांगली गोष्ट आहे. हे असं चालू राहिलंच पाहिजे. गोलंदाजी हा आपला कच्चा दुवा असल्याचे वाटत होते, ती फार चांगली होत आहे आणि हीच आपली जमेची बाजू आहे आणि यामधून एकंदरीत सर्व खेळाडूंची सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. एकंदरीत ऊर्जा, सकारात्मक वृत्ती ही जाणवते. आता उपांत्यपूर्व फेरीत भारतापुढे बांगलादेशचे आव्हान आहे, त्यामुळे हा सामनाही सोपाच असेल, असं वाटतंय. आता राहिले शेवटचे दोन सामने. या दोन सामन्यांमध्ये प्रत्येक वेळी एकाच सामन्याचा विचार करून खेळायला हवं.
आतापर्यंत जो काही भारतीय संघानं खेळ केला, त्याने संपूर्ण देशवासीयांना, त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद दिलेला आहे. पण त्यांनी हेही समजून घेतलं पाहिजे, की हा सरतेशेवटी खेळ आहे. त्यामुळे चाहत्यांनी यामधली हार-जीत शक्या-शक्यता, शेवटच्या क्षणी काहीही चमत्कार घडण्याची शक्यता असते, याचाही विचार करायला हवा. त्याचाही विचार करून, या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून पुढचे सामने पाहू या. एखाद्दुसऱ्या सामन्यात काही विपरीत घडलं तर त्याचं वाईट वाटून घ्यायला नको. सारेच खेळाडू मन लावून खेळत आहेत आणि हेच महत्त्वाचं आहे.
आता जी काही आपली कामगिरी होते आहे त्याहीपेक्षा जास्त गुणवत्ता आपल्या फलंदाजांमध्ये आहे. प्रत्येक फलंदाजाकडे पुरेशी गुवणत्ता आहे. त्यामुळे ते अजूनही चांगली कामगिरी करू शकतात. कारण असं झालं आहे, की काही झेल सुटलेले आहेत आणि त्यानंतर मोठय़ा खेळी झालेल्या आहेत. एका परीने दैवपण आपल्या बाजूने होतं असं म्हणावं लागेल. मला म्हणायचंय असं, की त्यांच्याकडून निर्दोष खेळींची अपेक्षा आहे, तशी गुणवत्ता आहे. प्रत्येक संघाला नामोहरम करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नक्कीच आहे. धवन, कोहली यांनी काही चांगल्या खेळी केलेल्या आहेत. अजिंक्य रहाणेने कामगिरीत सातत्य दाखवले आहे आणि तो फारच विश्वासू वाटत आहे. हे फलंदाज उर्वरित सामन्यांमध्येही असामान्य कामगिरी करून दाखवतील. पण अजूनही काही फलंदाजांना सूर गवसलेला नाही. जडेजा, रोहित, धोनी यांना अजूनही मोठी खेळी साकारता आलेली नाही. कोहलीने शतक झळकावलेले आहे, जसा कोहली खेळायला हवा तसा तो खेळताना दिसत नाही. रोहितलाही अजून पक्का सूर गवसलेला दिसत नाही. या मंडळींना जर लय सापडली तर आपला संघ कुठच्या कुठे जाईल.
झिम्बाब्वेविरुद्ध आपला अखेरचा साखळी सामना आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला अतिआत्मविश्वास, प्रतिस्पध्र्याना कमी लेखणं, हलगर्जीपणा यांची काळजी घ्यावी लागेल. रवी शास्त्री किंवा संघातील जाणकार मंडळी खेळाडूंना हे सांगतीलच. खेळाडूंनी आपण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड किंवा पाकिस्तानविरुद्धच खेळतोय, अशा प्रकारे खेळ केला पाहिजे. असं जर केलं तर काहीच
अडचण नसेल.
आतापर्यंत भारताला काही जण विजेता वगरे ठरवू लागले आहेत, पण तसं त्यांनी करू नये, हे अति होईल. शेवटी खेळाचा आनंद घेण्यासाठी खेळ आहे की अंदाजांचा आनंद घेण्यासाठी खेळ आहे? कपोलकल्पित कल्पना करून तसा आनंद लुटायचा असेल तर लुटू शकता, मुद्दा असा आहे, की शेवटी वास्तव समोर येतंच. प्रत्येक सामन्याचा आनंद लुटत राहावा. जास्त दडपण घेऊ नये. अपेक्षांची ओझी लादू नयेत!
शब्दांकन : प्रसाद लाड