आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे(आयसीसी) अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी बुधवारी राजीनामा दिला. विश्वचषक स्पर्धेचा चषक विजेत्या संघाला देण्याचा अधिकार डावलल्याने कमाल नाराज होते. क्रिकेटला प्रदुषित करणाऱया व्यक्तींसोबत काम करू शतक नाही. अशा व्यक्तींनी क्रिकेटपासून दूर राहायला हवे, अशी श्रीनिवासन यांना उद्देशून बोचरी टीका करत मुस्तफा कमाल यांनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले की, “आयसीसीने झालेल्या घटनांचा सविस्तर विचार करावा अशी विनंती असून क्रिकेटला प्रदुषित करणाऱया व्यक्तींना दूर करावे नाहीतर, एक दिवस क्रिकेटच संपेल. आयसीसीचा अध्यक्ष असूनही विजेत्या संघाला चषक देण्याचा माझा अधिकान हिसकावून घेण्यात आला. त्या रात्री मला झोपच लागली नाही कारण, मी एका देशाचे प्रतिनिधित्व करतो. अध्यक्ष म्हणून चषक माझ्या हस्ते प्रदान करणे हा माझा अधिकार होता.”
आयसीसी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांच्याऐवजी एन.श्रीनिवासन यांच्या हस्ते विश्वचषक प्रदान
दरम्यान, सदोष पंचगिरीमुळे बांगलादेशची हार झाली आणि त्यामुळेच भारतीय संघ जिंकू शकला, असे वक्तव्य मुस्तफा कमाल यांनी केले होते. कमाल यांचे वादग्रस्त विधान त्यांना महागात पडले. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम लढतीला कमाल उपस्थित होते. त्यांच्या हस्तेच विजेत्या संघाला जेतेपदाचा चषक देण्यात येणार होता. मात्र आयसीसीच्या नवीन संरचेनुसार कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याकडे संघटनेचे सर्वाधिकार आहेत. भारतावर टीकेमुळे संतप्त झालेल्या श्रीनिवासन यांनी कमाल यांच्या हस्ते जेतेपदाचा चषक देण्यात येऊ नये, असा निर्णय घेतला. अध्यक्ष या नात्याने मिळणारा बहुमान मिळणार नसल्याने कमाल यांनी अंतिम लढत होण्यापूर्वीच मैदान सोडले. मैदानात असलेल्या आयसीसीसी पदाधिकाऱ्यांच्या कक्षातही कमाल बसले नाहीत. अध्यक्ष असूनही अपमान झाल्यामुळे कमाल यांनी अंतिम लढत पूर्ण होण्यापूर्वीच मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.