विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ७ गडी राखून दमदार विजय साजरा करत विश्वचषक उंचावला. मेलबर्न स्टेडियमच्या बालेकिल्ल्यात कांगारूंनी किवींचे १८४ धावांचे माफक आव्हान सहजरित्या गाठून ‘यहा के हम सिकंदर’ असल्याचे दाखवून दिले. ऑस्ट्रेलियाचा हा पाचवा विश्वचषक विजय ठरला तर, आपल्या सर्वोत्तम कामगिरीने पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेल्या न्यूझीलंडचे पहिल्या-वहिल्या विश्वविजयाचे स्वप्न अधुरेच राहिले. 
न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळत असलेल्या कर्णधार मायकेल क्लार्कने ७४ धावांचा नजराणा पेश केला. तर, स्टिव्हन स्मिथने ५६ धावांची नाबाद खेळी केली. आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर ही सलामी जोडी स्वस्तात बाद झाल्यानंतर क्लार्क आणि स्मिथने ११२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. ३४ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार खेचून स्टिव्हन स्मिथने ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपल्या भेदक माऱयाने चूकीचा ठरवून दाखवला. कांगारूंच्या गोलंदाजीपुढे किवींनी १८३ धावांतच आटोपते घेतले. मिचेल जॉन्सन, स्टार्क आणि फॉकनर यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना नामोहरम केले. ग्रँट एलियटची ८३ धावांची खेळी वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर यावेळी तग धरता आला नाही. जॉन्सन आणि फॉकनर यांनी प्रत्येकी तीन विकेट्स मिळवल्या तर, स्टार्कने २ फलंदाजांना बाद केले. सामन्याच्या सुरूवातीलाच कांगारूंनी किवींना तीन झटके दिले. तेजतर्रार गोलंदाज मिचेल स्टार्कने न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमला भोपळा ही न फोडता स्टार्कने चालते केले आणि स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. यानंतर डाव सावरून संयमी फलंदाजी करणाऱया सलामीवीर मार्टीन गप्तीलला ग्लेन मॅक्सवेलने १५ धावांवर माघारी धाडले. सलामी जोडी स्वस्तात तंबूत परतल्यानंतर मिचेल जॉन्सनने १३ व्या षटकात घातक केन विल्यमसनला बाद करून ऑस्ट्रेलियाला तिसरे यश मिळवून दिले. यानंतर संघाच्या धावसंख्येला सावरण्याची जबाबदारी रॉस टेलर आणि ग्रँट एलियटवर आली. दोघांनीही संयमी फलंदाजी करत शतकी भागीदारी रचली. न्यूझीलंडचा धावफलक हलता राहिल या दृष्टीने प्रयत्न करत असताना ३५ व्या षटकात पावरप्ले सुरू झाल्यावर पहिल्याच चेंडूवर रॉस टेलर बाद झाला. रॉस टेलरने ४० धावा केल्या. पाठोपाठ अष्टपैलू विस्फोटक फलंदाज कोरे अँडरसन देखील आल्या पावलांनेच माघारी परतला. तर, ल्युक राँकी अवघी एक धाव करून धावचीत बाद झाला. यानंतर डॅनियल व्हेटोरी देखील काही खास कामगिरी करू शकला नाही. मैदानात चांगला जम बसवलेला ग्रँट एलियट देखील ८३ धावा ठोकून माघारी परतला.  एलियट बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा डाव गडगडला. सामन्याच्या ४५ व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलने उत्तम हजरजबाबीपणाच्या सामर्थ्यावर टीम साऊदीला धावचीत केले आणि न्यूझीलंडचा डाव १८३ धावांवर आटोपला.

– सामनावीर- जेम्स फॉकनर (ऑस्ट्रेलिया)

मालिकावीर- मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
* विश्वचषक २०१५ स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीबद्दल ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्कला मालिकावीर पुरस्काराने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.