सहा महिन्यांपूर्वी कोणाच्याही खिजगणतीत नसलेला वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरला. स्टार्कने आठ सामन्यांमध्ये २२ बळी मिळवत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रत्येक सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी तो प्रमुख अस्त्र ठरत होता. स्पर्धेत १०.१८ एवढी सरासरी त्याने राखली. न्यूझीलंडविरुद्धच्या साखळी सामन्यात त्याने फक्त २८ धावांत सहा बळी घेतले होते आणि हीच त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूच्या क्रिकेटपटूसाठी न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलम, त्याचा संघसहकारी मार्टीन गप्तिल, श्रीलंकेचा अनुभवी क्रिकेटपटू आणि स्पर्धेत सलग चार शतके झळकावणारा कुमार संगकारा शर्यतीमध्ये होते; पण सातत्यपूर्ण भरीव कामगिरीच्या जोरावर स्टार्कने अखेर हा पुरस्कार पटकावला.