अ‍ॅडलेडला रविवारच्या महामुकाबल्याबाबत प्रत्येक पाकिस्तानी क्रिकेटपटू एकच वाक्य म्हणतो, ‘‘आम्हाला फक्त विजय हवा!’’ १९९२च्या विश्वचषकापासून पाच स्पर्धामध्ये भारताने प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. कर्णधार मिसबाह उल हकला विश्वचषकातील हा अडथळा पार करायचा आहे. ‘‘इतिहास बदलण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू,’’ असे उद्गार हकने काढले आहे.
‘‘भारताविरुद्ध विश्वचषकातील सामने आम्ही का गमावले, हे मला सांगता येणार नाही. कदाचीत महत्त्वाच्या सामन्यांत दडपण हाताळण्यात ते संघ अपयशी ठरले असावेत,’’ असे हकने सांगितले.
लोकप्रिय अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘‘यावेळी आम्ही इतिहास बदलू आणि हा महत्त्वाचा सामना जिंकू, यावर माझा विश्वास आहे. जर आम्ही हा सामना जिंकू शकलो तर विश्वचषकातील उर्वरित सामन्यांमध्ये संघाचा आत्मविश्वास वाढेल.’’
‘‘पहिल्याच सामन्यात भारताशी सामना होतो आहे, हे अतिशय छान आहे. जर त्यांना आम्ही हरवले तर विश्वचषकाची चांगली सुरुवात होईल,’’ असे अनुभवी फलंदाज युनूस खानने सांगितले.
वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान म्हणाला, ‘‘माझ्याकडून काय अपेक्षा केल्या जात आहेत, याची मला कल्पना आहे. भारताविरुद्ध आतापर्यंत माझी कामगिरी चांगली झाली आहे.’’