रविचंद्रन अश्विन.. भारताचा अष्टपैलू खेळाडू. प्रतिस्पर्धी संघाच्या दिग्गज फलंदाजांना जेरबंद करणारी ऑफ-स्पिन गोलंदाजी आणि संघ अडचणीत असताना सावरणारी फलंदाजी ही त्याची खासियत. परंतु बालपणी अश्विन वेगवान गोलंदाज आणि सलामीचा फलंदाज अशी वेगळी ओळख जपायचा. दक्षिण wc09आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॅक कॅलिसप्रमाणे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हींमधील आघाडीचं स्थान त्याचं असायचं. ११ वर्षांचा असताना स्पोर्ट्स्टार करंडक क्रिकेट स्पध्रेत त्यानं शतकही झळकावलं होतं. शालेय जीवनापासून त्याची कारकीर्द बहरत होती, परंतु अश्विन १४-१५ वर्षांचा असताना त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे सुमारे सहा महिने त्याला विश्रांती घेऊन क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. त्यातून सावरल्यावर तो पुन्हा मैदानावर परतण्याच्या बेतात होता. परंतु वेगवान गोलंदाजी करू नये, हा वैद्यकीय सल्ला त्याच्या कारकिर्दीच्या आड येत होता. त्यामुळे आई चित्रानं त्याला फिरकी गोलंदाजी टाकण्याचा सल्ला दिला. दरम्यानच्या काळात सलामीचा फलंदाज आणि वेगवान गोलंदाजाचं संघातलं स्थानसुद्धा रिक्त राहिलं नव्हतं. पण फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी घेत त्यानं आपल्या संघात स्थान मिळवलं आणि कालांतरानं भारतीय क्रिकेटला एक चांगला फिरकी गोलंदाज मिळाला.
अश्विन हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या राजकारणातील धूर्त आणि वादग्रस्त प्रशासक एन. श्रीनिवासन यांच्या तामिळनाडू राज्यातील.. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं कोणत्याही सामन्यातलं हुकमाचं पान. त्यामुळेच क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांप्रमाणेच माहीचा तो चेन्नई सुपर किंग्जचाही साथीदार.. भारतीय कसोटी क्रिकेटला हमखास जिंकून देणाऱ्या फिरकी परंपरेचा सध्याचा वारसदार. त्यामुळे अनिल कुंबळेसारखा महान फिरकी गोलंदाजसुद्धा अश्विनचं कर्तृत्व मान्य करतो.. चेन्नईच्या पश्चिमेकडे माबल्लममधील रामकृष्णापूरम भागात अश्विनचं निवासस्थान आहे. अश्विनची आई चित्रा निप्पॉन पेंट्स कंपनीत व्यवस्थापकपदावर कार्यरत आहे, तर वडील रविचंद्रन हे रेल्वेत अधिकारी. आपल्या एकुलत्या मुलावर त्यांचं निस्सीम प्रेम. त्यामुळेच अश्विनचं एकंदर आयुष्य हे लाडाकोडातलं आहे.
अश्विन पाच वर्षांचा होता, तेव्हापासून त्याला क्रिकेटचा लळा लागला. वडीलसुद्धा क्लब क्रिकेट खेळत असल्यामुळे त्यांनी अश्विनला सुरुवातीपासूनच धडे द्यायला सुरुवात केली. मग नऊ वर्षांचा झाल्यावर त्याला क्रिकेटच्या तंत्रशुद्ध प्रशिक्षणासाठी दाखल केले. अश्विनच्या खेळाच्या खुणा बालपणीपासूनच या कुटुंबीयांच्या टुमदार बंगल्याच्या भिंतींवर उमटायच्या. भिंतीवरील चेंडूच्या निशाणांमुळे अनेक पाहुण्यांना आश्चर्य वाटायचे. आई रंगनिर्मिती करणाऱ्या नामांकित कंपनीत उच्च पदावर असतानाही घराचे रंग मात्र उडालेले कसे, असे प्रश्नही ते या दाम्पत्याला थेट विचारायचे. सुरुवातीची काही वष्रे त्याच्या आईने इमाने-इतबारे रंगकाम करवून घेतले, पण नंतर काही दिवसांतच पुन्हा त्यावर खुणा दिसायच्या. त्यामुळे अखेर तिनं अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरस्थावर होईपर्यंत घराचं रंगकाम मनावर घेतलं नव्हतं.
प्रशिक्षक विजय कुमार यांनी अश्विनला ऑफ-स्पिन गोलंदाजीचे धडे दिले. त्यानंतर सुनील सुब्रमण्यम आणि डब्ल्यू. व्ही. रामन यांनी अश्विनच्या गोलंदाजीला पैलू पाडण्याचं काम केलं. ५ जून २०१० या दिवशी श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात अश्विननं प्रथमच भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर नोव्हेंबर २०११मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यानं कसोटी पदार्पण केलं. पाहता पाहता गेल्या पाच वर्षांत तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज म्हणून त्यानं आपलं स्थान अधोरेखित केलं आहे. २४ कसोटी सामन्यांत दोन शतकांसह १००७ धावा आणि ११९ बळी अश्विनच्या खात्यावर जमा आहेत. यात तब्बल नऊ वेळा पाच बळी घेण्याची किमया त्यानं साधली आहे. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९१ सामन्यांत ६२९ धावा आणि १२८ बळी त्याच्या खात्यावर जमा आहेत.
भारतात फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ांवर बळींची संख्या वाढवता येते, परंतु परदेशात या फिरकीपटूंचा काय उपयोग, ही हेटाळणी अश्विनच्याही वाटय़ाला आली. प्रारंभी या अपयशाचा त्यालाही मुकाबला करावा लागला. परंतु गेल्या काही वर्षांत भारतानं फिरकी चक्रव्यूहाचं जाळं आता परदेशातही विणायला सुरुवात केली आहे. २०१३मध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत जडेजा आणि अश्विननं इंग्लंडमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. विश्वचषकाआधी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्यानं आपलं कर्तृत्व दाखवलं. शनिवारी संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध अश्विननं सामनावीर पुरस्कार पटकावून फिरकीवरील विश्वास सार्थ ठरवला. याच पर्थमध्ये भारताचा पुढील सामना वेस्ट इंडिजशी आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे २० मार्च २०११ या दिवशी वेस्ट इंडिजविरुद्धच अश्विनने विश्वचषकातील पदार्पण केलं होतं, आपल्या घरच्या मैदानावर, चेन्नईच्या चेपॉकवर!