विश्वचषकातील पुढील सामन्यात भारताला पराभूत करण्यासाठी संघातील प्रत्येक खेळाडूला योगदान देणे गरजेचे आहे, असे मत वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू डॅरेन सॅमीने व्यक्त केले आह़े  
तो म्हणाला, ‘‘हा आणखी एक क्रिकेट सामना वाटत असला, तरी भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आह़े  प्रत्येक प्रतिस्पध्र्याचा तुम्ही आदर केला पाहिज़े  भारताविरुद्ध आमचा सामना नेहमीच चांगला होतो आणि त्यांना नमवण्यासाठी संघाने ‘अ’ दर्जाचा खेळ करणे आवश्यक आह़े’’
मुडरेच युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स येथे सराव सत्रादरम्यान सॅमीने हे मत व्यक्त केल़े आर्यलड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वेस्ट इंडिजला पराभव पत्करावा लागला़  मात्र संघाच्या वरिष्ठ खेळाडूंनी युवा कर्णधार जेसन होल्डरला कठीण प्रसंगात मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे सॅमीला वाटत़े  होल्डरच्या नेतृत्वाबाबत सॅमी म्हणाला, ‘‘हा चांगला अनुभव आह़े  त्याला सर्वाचा पाठिंबा आह़े  कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडण्याचा अनुभव त्याच्यापाशी नाही़  मीही या परिस्थितीतून गेलो आहे. मात्र हा विश्वचषक आहे आणि त्याला सर्वतोपरी मदत करण्याची आमची जबाबदारी आह़े ’’