युद्ध, रक्तपात, हिंसाचार या नकारात्मकतेने अफगाणिस्तानचा इतिहास आणि वर्तमानही काबीज केला आहे. या प्रतिकूल वातावरणात आनंद फुलवला अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंनी. पायाभूत सुविधांची वानवा, निधीचा अभाव, अपुरा सराव या सगळ्यातून मार्ग काढत अफगाणिस्तान संघाने विश्वचषकात स्कॉटलंडवर मात करीत पहिलावहिला विजय साकारला. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर देदीप्यमान यश मिळवणाऱ्या या संघाचा विजय देशवासीयांनी जल्लोषात साजरा केला.

काबूल आणि जलालाबाद येथे संघाचा जयघोष करीत, गाणी गात अफगाणिस्तान नागरिकांनी आनंद व्यक्त केला. डय़ुनेडिनमध्ये शापूर झाद्रानने विजयी धाव घेताच अफगाणिस्तानच्या विविध भागांत उत्साहाला उधाण आले. ढोल-ताशांच्या गजरात या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा झाला.

अफगाणिस्तानचा संघ विश्वचषकासाठी रवाना होण्यापूर्वी विमानतळावर आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी संसद सदस्य आणि मंत्रिगण उपस्थित होते. अफगाणिस्तान विश्वचषकात विजय मिळवणार हा विश्वास उपस्थितांच्या मनात होता. दोन आठवडय़ांच्या आतच अफगाणिस्तान संघाने देशवासीयांना अनोखी भेट दिली. संघातील खेळाडूंचे वास्तव्य असणाऱ्या विविध प्रांतांतील शहरांना मिरवणुकीचे स्वरूप प्राप्त झाले होते. एकमेकांना मिठाई वाटत नागरिकांनी जणू हा राष्ट्रीय विजय साजरा केला.