प्रत्येक चेंडूगणिक चाहत्यांची उत्कंठा ताणणाऱ्या खेळाची पुरेपूर प्रचिती देत न्यूझीलंडने पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियावर एक विकेट राखून थरारक विजय मिळवला. तसेच विश्वचषकातील सलग चौथ्या विजयासह न्यूझीलंडने दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत गाठली.
एका क्षणी २ बाद ८० अशा सुस्थितीत असणाऱ्या ऑस्ट्रेलियाची ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर घसरगुंडी उडाली आणि त्यांचा डाव १५१ धावांतच संपुष्टात आला. मग ब्रेंडन मॅक्क्युलमने तडाखेबंद अर्धशतकासह aaaविजयाची पायाभरणी केली. विजय न्यूझीलंडच्या दृष्टीपथावर होता. मात्र मिचेल स्टार्कच्या अफलातून माऱ्यासमोर २ बाद ७८वरून न्यूझीलंडची अवस्था ९ बाद १४६ अशी झाली. ‘विश्वचषकाच्या अंतिम लढतीची रंगीत तालीम’ असे वर्णन होणाऱ्या या लढतीत विजयाचे पारडे मिनिटागणिक बदलत होते. परंतु केन विल्यमसनने निर्णायक षटकार लगावला आणि ईडन पार्कवरील न्यूझीलंड चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले.
ऑस्ट्रेलियातर्फे ब्रॅड हॅडिनने सर्वाधिक ४३ धावा काढल्या. हॅडिनने पॅट कमिन्ससोबत दहाव्या विकेटसाठी केलेल्या ४५ धावांच्या भागीदारीमुळेच ऑस्ट्रेलियाला दीडशे धावांची मजल मारता आली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ३४ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे ट्रेंट बोल्टने २७ धावांत ५ बळी घेतले.
मार्टिन गप्तिल व ब्रेंडन मॅक्क्युलम यांनी ४० धावांची सलामी दिली. मॅक्क्युलमने मिचेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर घणाघाती हल्लाबोल केला. या दरम्यान मॅक्क्युलमच्या हातावर जॉन्सनचा वेगवान चेंडू आदळला. वेदना सहन करतच मॅक्क्युलमने झंझावात कायम ठेवला. कमिन्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना मॅक्क्युलम बाद झाला. त्याने ७ चौकार व ३ षटकारांसह २४ चेंडूत ५० धावांची खेळी केली. यानंतर स्टार्कच्या माऱ्यासमोर किवी फलंदाजांनी शरणागती पत्करली. दोन वेळा स्टार्कची हॅट्ट्रिक हुकली.  त्याने २८ धावांत ६ बळी घेतले. एकामागोमाग एक साथीदार तंबूत परतत असताना विल्यमसनने (४५) जिद्दीने किल्ला लढवला. परंतु ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडणाऱ्या ट्रेंट बोल्टला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

थरारक सामना.. स्टार्क आणि बोल्ट यांनी आपापल्या संघांसाठी शानदार कामगिरी केली. आम्ही आक्रमक क्रिकेट खेळत आहोत आणि हे डावपेच यशस्वी झाले आहेत.
– ब्रेंडन मॅक्क्युलम, न्यूझीलंडचा कर्णधार

चाहत्यांना पुरेपूर मनोरंजन करणारा सामना, मात्र आम्हीजिंकायला हवे होते. आमची फलंदाजी निकृष्ट दर्जाची होती. फलंदाजी आणि गोलंदाजीला साथ देणारी खेळपट्टी तयार केल्याबद्दल ग्राऊंड्समन कौतुकास पात्र आहेत.
– मायकेल क्लार्क, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

१२ सामन्यात डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी घेतलेल्या बळींची संख्या. एकदिवसीय प्रकारात एका सामन्यात डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांच्या सर्वाधिक बळींची संख्या.
विश्वचषकात एका विकेट्सनी मिळवलेल्या विजयांची संख्या.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ३२.२ षटकांत सर्वबाद १५१ (ब्रॅड हॅडिन ४३, डेव्हिम् वॉर्नर ३४, ट्रेंट बोल्ट ५/२७) पराभूत विरुद्ध न्यूझीलंड : २३.१ षटकांत ९ बाद १५२ (ब्रेंडान मॅक्क्युलम ५०, केन विल्यमसन ४५, मिचेल स्टार्क ६/२८)
सामनावीर : ट्रेंट बोल्ट.
मिचेल स्टार्क ९-०-२८-६