इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी आणि पुन्हा आपण जगज्जेतेपद काबीज करावे, असा निर्धार सर्व संघांप्रमाणेच पाकिस्ताननेसुद्धा केला आहे. याचे कारण यंदाचा विश्वचषक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड भूमीवर होत आहे. ११९२ मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलिया खंडाने यजमानपद सांभाळले होते, तेव्हा इम्रान खानने पाकिस्तानला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. त्यामुळेच सर्वात अनपेक्षित संघ म्हटल्या जाणाऱ्या पाकिस्तानला संभाव्य विश्वविजेते म्हणून गणले तर ते वावगे ठरणार नाही.
पाकिस्तानचा संघ दहापैकी सहा वेळा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आहे, ही आकडेवारी त्यांच्या आशा उंचावणारी आहे. १९७५च्या पहिल्या विश्वचषकात आसिफ इक्बालच्या नेतृत्वाखाली हा संघ सहभागी झाला. साखळीत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजकडून हार पत्करली, तर दुबळ्या श्रीलंकेविरुद्ध एकमेव विजय मिळवला. त्यामुळे बाद फेरी गाठण्यात त्यांना अपयश आले. कॅरेबियन संघाविरुद्ध पाकिस्तानने चांगली झुंज दिली, परंतु फक्त एक विकेट राखून त्यांनी सामना गमावला. इक्बालच्याच नेतृत्वाखाली १९७९ मध्ये पाकिस्तानची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला त्यांनी हरवले, परंतु इंग्लंडकडून १४ धावांनी हार पत्करली. त्यामुळे गटउपविजेते म्हणून त्यांनी आगेकूच केली. परंतु विश्वविजेत्या विंडीजपुढे त्यांचा निभाव लागला नाही आणि उपांत्य सामना पाकिस्तानने ४३ धावांनी गमावला.
१९८३च्या विश्वचषक साखळीत पाकिस्तानने तीन सामने जिंकले, तर तीन गमावले. गुणतालिकेत न्यूझीलंडसोबत समान १२ गुण झाले असतानाही सरस धावगतीच्या बळावर पाकिस्तानने बाद फेरी गाठली. इम्रान खान कर्णधार असलेल्या या संघाची उपांत्य फेरीत पुन्हा विंडीजशी गाठ पडली आणि पुन्हा ते पराभूत झाले. विंडीजविरुद्ध हा विश्वचषकातील सलग तिसरा पराभव पाकिस्तानच्या भलताच जिव्हारी लागला होता. १९८७मध्ये इम्रानने भारतीय उपखंडात दिमाखात घोडदौड करताना साखळीतील सहापैकी पाच सामने जिंकत गटविजेत्याचा मान संपादन केला. त्यांचा एकमेव पराभव हा विंडीजविरुद्ध होता, परंतु साखळीत पाकिस्तानने एकदा त्यांना हरवलेसुद्धा होते. मग सलग तिसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानची वाटचाल संपुष्टात आली. यावेळी लाहोरला ऑस्ट्रेलियाने त्यांचा १८ धावांनी पराभव केला.
१९९२मध्ये झालेल्या विश्वचषकात प्रथमच रंगीत गणवेश, पांढरा चेंडू आणि प्रकाशझोत अशी क्रांती झाली होती. पण या वेळी मात्र पााकिस्तानने साखळीत सामान्य कामगिरी करून मग विश्वविजेतेपदाचा बहुमान मिळवला. कर्णधार इम्रानच्या संघाची सुरुवातीची कामगिरी पाहता त्यांच्याकडून माफक अपेक्षा केल्या जात होत्या. पाकिस्तानला विंडीजने १० विकेट राखून हरवले, मग परंपरागत प्रतिस्पर्धी भारताने त्यांना हरवले. इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानचा डाव ७४ धावांत कोसळला होता, परंतु पावसामुळे एक गुण पाकिस्तानच्या पदरी पडला. अखेरच्या साखळी लढतीत ऑस्ट्रेलियाने विंडीजचा धक्कादायक पराभव केला आणि पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचे दरवाजे उघडले. त्यानंतर मात्र जिद्दीने खेळत पाकिस्तानी संघाने मागे वळून पाहिलेच नाही. इन्झमाम उल हकने ३७ चेंडूंत साकारलेल्या ६० धावांच्या खेळीने पाकिस्तानने उपांत्य फेरीत न्यूझीलंडला पराभूत केले. मग वसिम अक्रमच्या सामन्याचा निकाल पालटवणाऱ्या गोलंदाजीमुळे अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला नामोहरम केले आणि चाळिशीच्या इम्रानचे जगज्जेतेपदाचे स्वप्न पूर्ण झाले.
मग वसिम अक्रमच्या नेतृत्वाखाली १९९६च्या विश्वचषकात साखळीतील पाचपैकी चार सामने जिंकत पाकिस्तानी संघ बाद फेरीत पोहोचला. फक्त बलाढय़ द. आफ्रिकेविरुद्ध ते अपयशी ठरले. परंतु गतविजेत्या पाकिस्तानला या वेळी उपांत्यपूर्व फेरीत भारताने हरवले. सलामीवीर आमिर सोहेल आणि सईद अन्वर यांनी चांगली सलामी दिल्यानंतरसुद्धा हा सामना पाकिस्तान वाचवू शकला नाही. अक्रमला दुखापत झाल्यामुळे सोहेलने संघाचे नेतृत्व केले होते. जावेद मियाँदादने या सामन्यात ६४ चेंडूंत ३८ धावा केल्या. १९७५च्या विश्वचषकात पदार्पण केलेल्या जावेदने विश्वचषकाच्याच सामन्याने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला. १६ वर्षांनी विश्वचषक स्पर्धा इंग्लिश भूमीत परतली आणि पकिस्तानने अंतिम फेरीत पोहोचण्याची किमया साधली. साखळीत पदार्पणवीर बांगलादेशविरुद्ध पत्करलेला अविश्वसनीय पराभव वगळल्यास पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया, विंडीजसारख्या कडव्या प्रतिस्पध्र्याना पराभूत केले. सुपर सिक्समध्ये ते भारताकडून हरले, परंतु तरीही उपांत्य फेरी पोहोचून न्यूझीलंडला नऊ विकेट राखून पराभूत केले. मग अंतिम सामन्यात मात्र अक्रमचा संघ फक्त १३२ धावांत भुईसपाट झाला आणि विजेतेपदावर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले. विश्वविजेतेपदाच्या लढतीतील ही सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली.
२००३चा विश्वचषक पाकिस्तानसाठी निराशाजनक ठरला. वकार युनिसच्या संघाला गटात दुबळ्या हॉलंड आणि नामिबियापेक्षा वरचे पाचवे स्थान मिळाले. इन्झमाम उल हकला सहा सामन्यांत जेमतेम १९ धावा करता आल्या आणि भारताविरुद्ध विश्वचषकातील तिसऱ्या पराभवामुळे तर या जखमेवर मीठ चोळण्याचे कार्य केले. पाकिस्तानने फक्त दोन सामने जिंकले, तर तीन गमावले आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. २००७ हे वर्षसुद्धा पाकिस्तानच्या क्रिकेटसाठी फारसे चांगले गेले नाही. यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध पत्करलेल्या पहिल्या पराभवातून पाकिस्तानी संघ अखेपर्यंत सावरला नाही. पावसाचा फटका बसलेल्या आर्यलडविरुद्धच्या सामन्यातही ते पराभूत झाले. इन्झमामच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव विजय मिळवू शकला आणि साखळीतच ते गारद झाले. आर्यलडविरुद्धच्या आश्चर्यकारक पराभवानंतर दुसऱ्या दिवशी प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा गूढ मृत्यू झाल्यामुळे क्रिकेटविश्व ढवळून निघाले.
त्यानंतर २०११ मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला आशियाई राष्ट्रांसह यजमानपदाला मुकावे लागले. परंतु श्रीलंकेत पाकिस्तानने आपल्या अभियानाला चांगला प्रारंभ केला. गटसाखळीत पाच विजय आणि न्यूझीलंडविरुद्ध एक पराभव अशा कामगिरीसह पाकिस्तानचा संघ बाद फेरीत पोहोचला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानने विंडीजला १० विकेट राखून पराभूत केले आणि एका तपानंतर उपांत्य फेरी गाठण्याची किमया साधली. परंतु भारताचा अडथळा ओलांडण्यात पाकिस्तानचा संघ विश्वचषकात पुन्हा अपयशी ठरला. मोहालीत झालेल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा संघ २९ धावांनी पराभूत झाला. मग १९७९, १९८३ आणि १९८७ची पुनरावृत्ती झाली आणि पाकिस्तानला उपांत्य फेरीत हरवणारा संघ विश्वविजेता झाला.
शाहीद आफ्रिदी, युनिस खान आणि मिसबाह उल हक हे आपल्या कारकीर्दीतील अखेरची विश्वचषक स्पर्धा खेळत आहेत. १९९२ प्रमाणेच यश मिळवून देशाला विश्वविजेतेपदाचे भाग्य दुसऱ्यांदा मिळवून देण्यासाठी हे खेळाडू उत्सुक आहेत.

अपेक्षित कामगिरी
पाकिस्तान संघाने विश्वचषकातील ६४ सामन्यांपैकी ३६ सामने जिंकले आहेत, तर २६ सामन्यांत पराभव पत्करले आहेत. त्यामुळे विजयाची ५८.०६ अशी समाधानकारक टक्केवारी त्यांच्या खात्यावर आहे. ‘ब’ गटात समावेश असलेल्या पाकिस्तानपुढे भारत, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका यांचे प्रमुख आव्हान असले, तरी उपांत्यपूर्व फेरीतील त्यांचे स्थान नक्की मानले जात आहे. याचप्रमाणे हा संघ उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत स्थान मिळवू शकला, तरी त्याचे कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.

बलस्थाने आणि कच्चे दुवे
जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानला १९९९ नंतर विश्वचषकाची अंतिम फेरी गाठता आलेली नाही. उपांत्य फेरी मात्र त्यांनी बऱ्याचदा गाठली आहे. मिसबाह उल हकच्या नेतृत्वाखालील या संघात वेगवान गोलंदाज सोहेल खानचा समावेश करण्यात आला आहे. शोएब मकसूद, जुनैद खान आणि एहसान अदिल आता दुखापतीतून सावरून सज्ज झाले आहेत. पाकिस्तानचा लाडका अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी १९९९ पासून पाचव्या विश्वचषकात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करीत आहे. विश्वचषकातील आतापर्यंत झालेल्या पाच लढतींमध्ये पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध हरला आहे. ही मालिका खंडित करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मागील वर्षी पाकिस्तानचा संघ १६ सामने खेळला. यापैकी फक्त  सहा सामने त्यांना जिंकता आले. ही आकडेवारी मात्र निश्चितच चिंताजनक आहे.

पाकिस्तान
(ब-गट)
क्रमवारीतील स्थान : ७
सहभाग : १९७५ ते २०११ (सर्व)
विजेतेपद १९९२
उपविजेतेपद १९९९
उपांत्य फेरी १९७९, १९८३, १९८७, २०११

संघ : मिसबाह उल हक (कर्णधार), अहमद शेहझाद, मोहम्मद हाफीझ, सर्फराझ अहमद, युनिस खान, हरिस सोहेल, उमर अकमल, शोएब मकसूद, शाहीद आफ्रिदी, यासिर शाह, मोहम्मद इरफान, जुनैद खान, एहसान अदिल, सोहेल खान, वहाब रियाझ.
प्रशिक्षक : वकार युनूस
साखळीतील सामने :
१५ फेब्रुवारी : वि. भारत
२१ फेब्रुवारी : वि. वेस्ट इंडिज
१ मार्च  : वि. झिम्बाब्वे
४ मार्च : वि. संयुक्त अरब अमिराती
७ मार्च : वि. दक्षिण आफ्रिका
१५ मार्च : वि. आर्यलड
संकलन : प्रशांत केणी