सध्याच्या तंत्रप्रेमी जगात प्रत्येक गोष्टीसाठी ‘मोबाईल अॅप्लिकेशन्स’ (अॅप्स) उपलब्ध आहेत. प्रत्येक ‘अॅप्स’चे रंगरुप, गुणधर्म, उपयोग हे वेगवेगळे आणि ओळखही वेगळी. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील संघांना अॅप्सची ओळख देऊ केली किंवा विश्वचषकातील संघ हे अॅप्स असते तर? असा प्रश्न नकळत उपस्थित झाला. विशिष्ट कामासाठी विशिष्ट नावाचे अॅप्स प्रसिद्ध आहेत. अशाच काही बहुचर्चित ‘अॅप्स’ची तत्वे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात गुणधर्मी साम्यपणा आहे. अॅप्सची तत्वे संघांना लागू केली असता क्रिकेट संघ पुढीलप्रमाणे ओळखले गेले असते…

indiafaecbook
टीम इंडिया- फेसबुक

अॅप्सच्या नावे संघांची ओळख असती तर, टीम इंडिया फेसबुकच्या नावाने ओळखली गेली असती. येथे केवळ फेसबुक अॅपचे आयकन निळ्या रंगाचे असल्यामुळे टीम इंडियाचा फेसबुक अॅप म्हणून विचार करण्यात आलेला नाही. यामागे बहुतेक मिळतेजुळते गुणधर्म आहेत. टीम इंडियाप्रमाणेच सध्या सोशल नेटवर्कींगच्या जालात फेसबुक हे बहुचर्चित अॅप आहे. दोघांनाचेही कोटींच्या घरात फॉलोव्हर्स आहेत आणि दोघांच्याही चाहत्यांमध्ये लहरीपणा असलेला मोठा गट आहे. फेसबुकवर माणसाचा केवळ तासंतास वेळ वाया जात असल्याचे आपण ऐकतो मात्र, अॅप डिलीट करण्यास दुर्लक्ष करतो किंवा फेसबुक डिलीट करण्याचा धीर होत नाही. टीम इंडियाच्या चाहत्यांमध्येही अगदी असाच साम्यपणा आहे. एखाद दुसऱया वाईट कामगिरीमुळे टीम इंडियाची चाहत्यांकडून चुहूबाजूंनी कुचंबणा केली जाते पण, संघाबाबतचे प्रेम कधीच कमी होत नाही आणि होणारेही नाही.

australiatwitter
ऑस्ट्रेलिया- ट्विटर

ट्विटर हा सोशल नेटवर्किंग जालातील सर्वात जास्त उपयुक्ततेची क्षमता ठेवणारा अॅप असल्याची नेटकरांची विचारसरणी. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटसंघाच्या बाबतीतही हेच साम्यपण आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आजवर ऑस्ट्रेलियाने आपल्यातील उपयुक्ततेच्या क्षमतेने चाहत्यांच्या अपेक्षांचे घडे नेहमी काठोकाठ भरते ठेवले. क्षणीक अपडेट्स मिळणाऱया वेगवान ट्विटरप्रमाणेच फलंदाजी असो वा गोलंदाजी वेग हा ऑस्ट्रिलियन क्रिकेटचा अग्रक्रमच. ट्विटरची जशी उपयुक्तता अधिक तितकेच त्रासदायक आणि घातक देखील. त्यामुळे ट्विटरकरांना जसे ट्विट करताना उमटणाऱया प्रतिक्रियांचा अंदाज घेऊन सावधपणे मोजक्याशब्दांत वर्मी लागणारे ट्विट करण्याची शक्कल लढवावी लागते. तसेच इतर संघांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पदोपदी परिणाम ओळखून रणनीती आखावी लागते. इतकेच नव्हे तर, फेसबुक (टीम इंडिया) आणि ट्विटर(ऑस्ट्रेलिया)मधील कडवा संघर्ष जगजाहीर आहेच.

pakistanangrybirds
पाकिस्तान- अँग्री बर्ड्स

मनोरंजक, नाविण्यपूर्ण आणि भांडणासाठी सदैव उत्सुक (अगदी आपापसांतही). अँग्री बर्ड्सप्रमाणे पाकिस्तान क्रिकेटचीही अशीच ओळख आहे. मैदानात प्रत्येकवेळी पाकिस्तान संघाचा दृष्टीकोन आक्रमक दिसतो पण, रणनीती कधीच यशस्वी होताना दिसत नाही. ज्याप्रमाणे अँग्री बर्ड्समध्ये प्रत्येकवेळी सातत्य राखणे कठीण तसेच पाकिस्तान संघ देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कामगिरीत सातत्य राखू शकलेला नाही. पण, जशी अँग्रीबर्ड्समध्ये प्रत्येकवेळी अचूक नेम साधण्याची उत्सुकता असते त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीचीबाबतही चाहत्यांमध्ये नेहमी उत्सुकता असते.

englandyahooइंग्लंड- याहू
इंटरनेटच्या जालात ‘गुगल’ सर्च इंजिनचा जन्म होण्याआधीपासूनच अस्तित्व असूनही ‘याहू’ला आपलेपण टीकवण्यासाठी धडपडकरावी लागत आहे. त्याचप्रमाणे क्रिकेटचे ‘लॉर्ड्स’ समजले जाणाऱया इंग्लंड संघाचीही अवस्था मिळतीजुळती आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय शैलीदार फटक्यांचा दबदबा निर्माण होण्याआधी इंग्लंडच्या फलंदाजी शैलीची क्रिकेटविश्वावर भुरळ होती. पण, काळानुरूप बदलत्या इंटरनेट युगात स्पर्धात्मक वाटचाल करण्यासाठी ‘याहू’ला स्वत:मध्ये काही नाविण्यपूर्ण बदल करण्याची गरज जाणवली आणि तशी इंग्लंडच्या क्रिकेटलाही.
‘याहू’ने आपल्यात काही नाविण्यपूर्ण जबरदस्त बदल केले देखील. तसेच इंग्लंडच्या संघानेही उत्कृष्ट कामगिरी करत २०१० साली ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदावर नाव कोरले पण, सरतेशेवटी ‘याहू’ आणि इंग्लंडचा संघ या दोन्ही गोष्टी आपापल्या क्षेत्रात अजूनही आपले बलाढ्य ज्येष्ठपण सिद्ध करण्यातच झगडताना दिसतात.   

southafricatemplerun
दक्षिण आफ्रिका- टेम्पल रन

मोठ्या शर्थीनीशी न सापडणाऱया लक्ष्याचा पाठलाग करणाऱया बहुचर्चित ‘टेम्पल रन’ गेमींग अॅप त्यातील कल्पकता, कसरती आणि उत्साहवर्धक गुणांनी जसा प्लेस्टोअरवर नेहमी ट्रेंडमध्ये आहे. अगदी तसेच विलक्षण, अप्रतिम आणि उत्कृष्ट…अशा एकना अनेक उपमांचा धनी असूनही दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ विश्वचषक स्पर्धेत आजही चोकर्स म्हणून ओखळला जातो. आपल्यातील जेतेपदाची कुवत सिद्ध करूनही विश्वचषकावर अद्याप दक्षिण आफ्रिकेला नाव कोरता आलेले नाही. एका चोकर्सप्रमाणे आफ्रिकन संघ वर्षोनवर्ष आपल्या लक्ष्याचा परिश्रमी वृत्तीने पाठलागच करतो आहे. आखूड रस्त्याच्या मर्यादा जशा ‘टेम्पल रन’मध्ये पाळाव्या लागतात नाहीतर घात होतो. त्याचप्रमाणे आफ्रिकन संघाच्या विश्वचषक स्पर्धेत वेळोवेळी मोक्याच्या क्षणी मर्यादा स्पष्ट होऊन चाहत्यांच्या अपेक्षांचा घात झाला आहे.

srilankawhastapp
श्रीलंका- व्हॉट्स अॅप

संक्षिप्त परंतु, सर्वव्यापी अशी ओळख असलेल्या व्हॉट्सअॅप प्रमाणेच श्रीलंकेचा संघाही सर्वव्यापी खेळाडूंचा असला तरी संघाचे संक्षिप्तपण उघड आहे. “वुई जस्ट डिलिव्हर्ड” या व्हॉट्सअॅपच्या गुणधर्माप्रमाणेच श्रीलंकन खेळाडूही आजवर घाम गाळून भक्कम कामगिरी करत राहिले…’नॉट ग्रेट, बट ऑलवेज देअर’ अशीच काहीशी विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका संघाची ओळख राहिली आहे.

newzealandopera
न्यूझीलंड- ओपेरा
ब्राऊझर
इतरांप्रमाणे बहुचर्चितपणा जरी नसला तरी, संकेतस्थळ जलदगतीने उघडण्यासाठी ओपेरा या ब्राऊझरला मोबाईलमध्ये इतर सर्च इंजिनपेक्षा जास्त पसंती असते. ओपेरा ब्राऊझर प्रत्येकवेळी आपल्यात नीटनेटका नाविण्यपण घेऊन आला आहे. असाच काहीसा न्यूझीलंडचा संघ सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बहुचर्चितपणा नसला तरी लक्षवेधून भाग पाडणारा राहिला आहे. ओपेरा ब्राऊझरप्रमाणेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्पर्धात्मक ओळख आजवर न्यूझीलंड क्रिकेटने राखलेली आहे. ज्याप्रमाणे मोबाईल अॅप्स डाऊनलोड्स करण्याच्या यादीत आपण ओपेरा ब्राऊझरला दुय्यम स्थान देतो पण, एकदा का ओपेरा ब्राऊझर डाऊनलोड करून वापर सुरू केला की, त्याची सवय होऊन जाते. तसेच काहीसे सध्या न्यूझीलंड संघाचेही आहे.

westindiesinsta
वेस्ट इंडिज- इंस्टाग्राम

कॅरेबियन संस्कृतीत इंस्टाग्रामप्रमाणेच बहुरंगी, बहुढंगीपण आहे. पण, जसे इंस्टाग्रामवर कोणत्या रंगाचा शेड छायाचित्राला उत्कृष्ट दिसेल हे आपणास उमगत नाही. त्याचप्रमाणे वेस्ट इंडिजचा नेमका कोणता खेळाडू मैदानावर सर्वोत्तम कामगिरीचे रंग उधळेल याचा काहीच अंदाज बांधता येत नाही. ख्रिस गेल आपल्या गडद रंगांच्या फिल्टरने(जोरकस फटक्यांनी) सामना विजयाच्या सप्तरंगात रंगवून काढेल की, एकाच रंगात रंगविलेल्या चित्राप्रमाणे काहीच नवे पाहण्यास न मिळता सामना अगदी फिका होईल? याचा काहीच नेम नाही.