आतापर्यंत दोन्ही सामने जिंकत आम्हाला कमी लेखण्याची चूक करू नका, हे आर्यलडने दाखवून दिले आहे. वेस्ट इंडिज आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही संघांवर विजय मिळवल्यावर त्यांची परीक्षा असेल ती बलाढय़ दक्षिण आफ्रिकेबरोबर. आतापर्यंत भारताविरुद्धचा पराभव सोडल्यास आफ्रिकेने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आर्यलडला बाद फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने हा सामना महत्वाचा असेल.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए बी डी’व्हिलियर्सला सूर गवसला असून, त्याचे आर्यलडपुढे मोठे आव्हान असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने धडाकेबाज फलंदाजी करत ‘मी परतलो आहे’, अशी डरकाळी फोडली होती. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या सर्वच फलंदाजांनी चांगल्या धावा करून आपण फॉर्मात आल्याचे दाखवून दिले आहे. आफ्रिकेला फलंदाजीचे जास्त दडपण नसले तरी गोलंदाजीचे मात्र नक्कीच असेल. कारण त्यांचा गोलंदाजीतला हुकमी एक्का डेल स्टेनला अजूनही लय सापडलेली नाही. कारकिर्दीतील शंभराव्या सामन्यात स्टेन चमकदार कामगिरी करतो का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. फिरकीपटू इम्रान ताहीरने गेल्या सामन्यात पाच बळी मिळवले होते, त्याने कामगिरीत सातत्य ठेवावे, अशीच त्याच्याकडून अपेक्षा असेल.
आर्यलडने आतापर्यंत लौकिकापेक्षा वरचढ कामगिरी केलेली आहे. पॉल स्टर्लिग, इड जोयस आणि निआल ओ’ब्रायन यांनी दमदार फलंदाजीचा नमुना पेश केला आहे. अ‍ॅलेक्स क्युसॅक, जॉर्ज डॉकरेल आणि स्टर्लिग यांनी गोलंदाजीमध्ये अचूक मारा केला आहे.
दोन्ही संघांचा विचार करता दक्षिण आफ्रिकेचा संघ नक्कीच वरचढ असला, तरी आर्यलडमध्ये कोणत्याही संघाला नमवण्याची धमक आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका गाफील राहिल्यास त्यांचा घात होऊ शकतो.

स्टेनचा शंभरावा एकदिवसीय सामना
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनचा आर्यलडविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील शंभरावा सामना खेळणार आहे. त्यामुळे स्टेन या खास सामन्यामध्ये कशी कामगिरी करतो, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसांपूर्वी स्टेन तापामुळे आजारी होता, त्यानंतर त्याला सर्दीचा त्रासही जाणवत होता. त्यामुळे या सामन्यात तो पूर्णपणे तंदुरुस्त पाहायला मिळेल का, याचीही उत्सुकता असेल.

दुखापतींचा वेढा कायम
दक्षिण आफ्रिका संघाभोवतीचा दुखापतींचा वेढा अद्यापही सुटलेला नाही. भारताविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त झालेला व्हरनॉन फिलँडर सात दिवसांच्या विश्रांतीनंतरही पूर्ण तंदुरुस्त झालेला नाही. दुसरीकडे अष्टपैलू खेळाडू जे पी डय़ुमिनी बरगडय़ांना झालेल्या दुखापतीतून अद्यापही पूर्ण सावरलेला नाही. त्यामुळे रिले रोसू आणि कायले अ‍ॅबॉट यांना संघात कायम ठेवले जाणार आहे.

सामना क्र. : २४
   द. आफ्रिका वि.  आर्यलड
स्थळ : कॅनबेरा  ल्ल  वेळ : सकाळी ९.०० वा.पासून

संघ
दक्षिण आफ्रिका : एबी डीव्हिलियर्स (कर्णधार), क्विंटन डि कॉक (यष्टीरक्षक), हशिम अमला, फॅफ डू प्लेसिस, जेपी डय़ुमिनी, डेव्हिड मिलर, डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, व्हरनॉन फिलँडर, कायले अबॉट, अल्फान्सो फॅनसिंगो, इम्रान ताहीर, वेन पार्नेल, फरहान बेहराडीन, रिले रोसू.
आर्यलड : विल्यम पोर्टरफील्ड (कर्णधार), अँडी बलबिर्नी, पीटर चेस, अ‍ॅलेक्स क्युसॅक, जॉर्ज डॉकरेल, एड जोयस, अँडी मॅकब्रायन, जॉन मूनी, केव्हिन ओब्रायन, निआल ओब्रायन, मॅक्स सोरेनसेन, पॉल स्टर्लिग, स्टुअर्ट थॉम्पसन, गॅरी विल्सन (यष्टीरक्षक), क्रेग यंग.
थेट प्रक्षेपण
सर्व स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर