उत्तम धावगतीसह बाद फेरीत स्थान पटकावणे, हे ऑस्ट्रेलियाचे उद्दिष्ट आहे. सुरुवातीच्या तीन सामन्यांपैकी एकच विजय मिळवता आल्याने त्यांचे विश्वचषक अभियान विस्कळीत झाले होते. बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध २७५ धावांनी दणदणीत विजयासह ऑस्ट्रेलियाने अपेक्षित सरावासह धावगतीत सुधारणा केली.
डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्हन स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी २६० धावांची मॅरेथॉन भागीदारी केली. वॉर्नरने १९ चौकार आणि ५ षटकारांसह १७८ धावांची खेळी साकारली. स्टिव्हन स्मिथचे शतक अवघ्या ५ धावांनी हुकले. त्याने ८ चौकार व एका षटकारासह ९५ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने ६ चौकार व ७ षटकारांसह ३९ चेंडूत ८८ धावांची वेगवान खेळी साकारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ४१७ धावांचा डोंगर उभारला.
ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर अफगाणिस्तानचा डाव १४२ धावांत संपुष्टात आला. नवरोझ मंगलने ३३ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल जॉन्सनने ४ बळी घेतले. डेव्हिड वॉर्नरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

माझ्या शतकापेक्षा सफाईदार विजय सुखावणारा आहे. प्रमुख फलंदाजांना सूर गवसल्याने आनंदित आहे. अ‍ॅशेस मालिकेतही आमच्या फलंदाजांची कामगिरी अशी झाली होती. वातावरण उष्ण होते तरीही गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली.
डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलिया

४१७   ऑस्ट्रेलियाने केलेल्या धावांची संख्या. विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आता ऑस्ट्रेलियाच्या नावावर. त्यांनी भारताचा बम्र्युडाविरुद्धचा ४१३ धावसंख्येचा विक्रम मोडला.

२६० डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्हन स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेली भागीदारी. ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय प्रकारातील कोणत्याही विकेटसाठीची ही सर्वोत्तम भागीदारी.
स्कोअरकार्ड-