विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियाच्या विजयी अश्वमेधाला अखेर कांगारुंनी लगाम घातला. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यजमान ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर ९५ धावांनी मात करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. यजमानांच्या ३२९ धावांच्या भक्कम आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव २३३ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून जेम्स फॉकनरने सर्वाधिक ३ तर, स्टार्क आणि जॉन्सनने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. कर्णधार धोनीने संघासाठी सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली परंतु, डोंगराएवढ्या आव्हानापुढे टीम इंडियाचे प्रयत्न यावेळी अपयशी ठरले. 
टीम इंडियाची सुरूवात मात्र आशादायक झाली होती. शिखर धवन आणि रोहितने ७१ धावांची चांगली सुरूवात संघाला करून दिली. धवनने ४५ धावा ठोकून माघारी परतल्यानंतर विराट कोहली तर आल्या पावलांनीच माघारी परतला. कोहली केवळ १ धाव ठोकून नाहक फटकेबाजीचा शिकार झाला. यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजीवर भलतेच दडपण निर्माण झाले. आपल्या नजाकती फटक्यांनी दुसरी बाजू लावून धरलेला रोहित शर्मा देखील ३४ धावांवर माघारी परतला. शंभर धावसंख्येच्या आतच तीन फलंदाज माघारी परतल्याने टीम इंडियावर दबाव निर्माण करण्यात कांगारुंना यश आले. गेल्या दोन सामन्यांत चांगल्या फॉर्मात असलेला रैना देखील स्वस्तात तंबूत दाखल झाल्याने धोनीवर संघाचा डाव सावरण्याची कर्णधारी जबाबदारी आली. धावांची निकड लक्षात घेता धोनीने अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली खरी परंतु, डोंगराऐवढे आव्हानापुढे एकट्या धोनीची फटकेबाजी अपुरी पडली. अखेर धोनी देखील ६५ धावांवर धावचीत बाद झाला. धोनी तंबूत दाखल झाल्यानंतर
टीम इंडियाचा डाव पूर्णपणे कोसळला आणि कांगारुंच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱया ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्हन स्मिथने दमदार खेळी करत ९३ चेंडूत १०५ धावांची सर्वाधिक खेळी केली. तर, फिंचने संयमी खेळीने ८१ धावा केल्या.
गोलंदाज उमेश यादवने सुरूवातीला भेदक मारा करत वॉर्नरला स्वस्तात बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. मात्र, यानंतर फिंच आणि स्मिथने डाव सावरत शतकी भागीदारी रचली. दोघांनीही मैदानात चांगलाच जम बसवल्याने टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली होती. धावसंख्येची गती पाहता एका क्षणी ऑस्ट्रेलिया ३५० चा आकडा सहज गाठेल असेच चित्र होते. परंतु, फलंदाजी पॉवरप्लेमध्ये संघाला दुसरे यश मिळाले. स्मिथ माघारी परतल्यावर मोठी धावसंख्या उभारण्याच्या उद्देशाने धाडण्यात आलेल्या मॅक्सवेलला अश्विनने माघारी धाडले. यानंतर अरोन फिंच देखील उमेश यादवच्या उसळी चेंडूवर शिखर धवनला झेल देऊन बसला. यामुळे टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. उमेश यादवने अखेरच्या षटकांत चांगली गोलंदाजी केली. मायकेल क्लार्क, वॉटसनला भारतीय गोलंदाजांनी मैदानात जम बसवू दिला नाही आणि स्वस्तात चालते केले. सुरूवातीच्या तीस षटकांची गती पाहता पन्नास षटकांच्या अखेरीस झालेली ऑस्ट्रेलियाने दिलेले लक्ष्य भक्कम असले तरी, बऱयाच प्रमाणात भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आवर घालण्यात यश आले होते. 

सामनावीर- स्टिव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया)