भारत व वेस्ट इंडिजविरुद्ध मानहानीकारक पराभवाला सामोरे गेलेल्या पाकिस्तानचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात येणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र झिम्बाब्वे आणि संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध विजय मिळवून पाकिस्तानने बाद फेरीच्या आशा जिवंत राखल्या आहेत.
नासीर जमशेद बाद झाल्यानंतर अहमद शेहझाद व हॅरिस सोहेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी केली. सोहेल ७० धावा करून तंबूत परतला. पाठोपाठ शेहझादनेही आपली विकेट गमावली. त्याने ८ चौकार व एका षटकारासह ९३ धावांची खेळी केली. सोहेब मकसूद आणि मिसबाह उल हक यांनी चौथ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी केली. मकसूद ४५ धावांवर बाद झाला. यानंतर मिसबाहने उमर अकमलच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या. मिसबाहने ६५ धावांची खेळी साकारली. पाकिस्तानने ३३९ धावांची मजल मारली. अमिरातीतर्फे मंजुला गुरुगेने सर्वाधिक ४ बळी घेतले.
अमिरातीने चिवट खेळ करत २१० धावा केल्या. शैमान अन्वरने ६२ धावांची खेळी केली. पाकिस्तानतर्फे शाहिद आफ्रिदी, सोहेल खान, वहाब रियाझ यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीपूर्वी सूर गवसल्याने मी समाधानी आहे. मिसबाह आणि हॅरिस यांच्या खेळींमुळेच मोठी धावसंख्या उभारता आली. सर्व प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश आहे.
– अहमद शेहझाद, पाकिस्तानचा फलंदाज
स्कोअरकार्ड-