दक्षिण आफ्रिकेच्या ४०८ धावांच्या भक्कम आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची संघाची १५१ धावांवरच भंबेरी उडाली. फिरकीपटू इमरान ताहीरने ४५ धावांत ५ विकेट्स मिळवल्या. तर, अॅबॉट आणि मॉर्केल यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडले.
वेस्ट इंडिजकडून कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. मात्र, डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा दबाव स्पष्टपणे वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजीवर दिसून आला. वेस्ट इंडिजची सुरूवातच निराशाजनक झाली. कॅरेबियन फलंदाजीचा ख्रिस गेल नावाचा बुरूज अवघ्या तीन धावांवर कोसळला. डिव्हिलियर्सच्या विस्फोटक खेळीनंतर ख्रिस गेलच्या प्रत्युत्तराकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, द.आफ्रिकेच्या कायले अ‍ॅबॉटने गेलला त्रिफळाचीत करून माघारी धाडले. त्यांनतर सॅम्युअल्सला भोपळा ही न फोडू देता अॅबॉटने संघाला दुसरे यश मिळवून दिले. फिरकीपटू इमरान ताहीरने स्मिथ, सिमन्स आणि आंद्रे रसेलला बाद केले. यानंतर विंडीजचा संपूर्ण डाव कोसळली आणि संघाला २५७ धावांच्या मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करत आफ्रिकन संघाने अपेक्षेप्रमाणे कॅरेबियन गोलंदाजांचा समाचार घेत ४०८ धावांचा डोंगर उभारला. तुफान फटकेबाजीच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या ए.बी.डी’व्हिलियर्सचा जलवा या सामन्यात पहायला मिळाला. डीव्हिलियर्सने केवळ ६६ चेंडूत १६२ धावांची दमदार खेळी साकारली. सामन्याच्या अखेरच्या षटकांमध्ये डीव्हिलियर्सने कॅरेबियन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरच्या १० षटकांमध्ये आफ्रिकन फलंदाजांनी तब्बल १०४ धावा कुटल्या. डीव्हिलियर्सने अवघ्या ५२ चेंडूत शतक गाठले. त्यानंतरच्या प्रत्येक चेंडूवर डीव्हिलियर्स तुटून पडला आणि संघाला चारशेचा आकडा पार करून दिला.
दरम्यान, सलामीवीर हशिम अमलाने ६५ धावा ठोकून संघाला चांगली सुरूवात करून दिली. फॅफ डू प्लेसिसने अमलाला साथ देत ६२ धावा ठोकल्या तर, रिले रोसू यानेही मिळालेल्या संधीचे सोने करत ६१ धावा ठोकल्या.
स्कोअरकार्ड-