बांगलादेशचा मध्यमगती गोलंदाज अल अमीन हुसेनला संघाच्या हॉटेलात परतायला मध्यरात्र झाली. विश्वचषकातील खेळाडूंसाठी हॉटेलात परतण्यासाठी, जास्तीतजास्त रात्रीच्या दहाची मुदत दिलेली. ती wclogoसंचारबंदीची चौकट मोडायची म्हणजे काय? बांगलादेशनं तडकाफडकी निर्णय घेतला, हुसेनला शिक्षा ना ताकिदीची, ना डॉलर्समधील दंडाची. शिक्षा एकदम देहदंडाची, देहांत प्रायश्चित्ताची. लक्षात घ्या, रामशास्त्री प्रभुणेंचे वारसदार आजही बांगलादेशमध्ये हयात आहेत! त्यांनी फतवा काढला की, भले बांगलादेशचा एकच सामना संपलेला असो, हुसेनने लगेच मायदेशी परतलं पाहिजे. त्यानुसार त्याला ढाक्याच्या विमानात बसवलं गेलंही.

हुसेन एकटय़ाने अपरात्री-मध्यरात्री नाइट क्लबमध्ये रमला, यातील कळीचा शब्द कोणता? हुसेन? मध्यरात्र? नाइट क्लब? नाही महाराज, यातील कळीचा शब्द ‘एकटय़ाने’! अल अमीन हुसेन ‘एकटय़ानं’ गेला होता, ही गोष्ट निर्णायक. कारण त्यामुळे पिंजऱ्यात उभं केलं जाऊ शकलं ते एकटय़ाला. गुन्हेगार ठरवू शकलं ते एकटय़ाला आणि शिक्षा देऊ शकली ती एकटय़ाला.

संचारबंदी मोडणारा हुसेन हा ना पहिला विश्वचषकवीर आणि अशा शिस्तभंगाला वठणीवर आणू पाहणारा, बांगलादेश हा ना पहिला देश. असाच गोंधळ घातला होता पाकिस्तानी खेळाडूंनी. शाहीद आफ्रिदी, उमर अकमल, शेहझाद आदी आठ खेळाडूंनी संचारबंदीचा भंग केला. पाकिस्तानने तेव्हा कोणती कारवाई केली होती? तीनशे ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या दंडाची. त्या साऱ्यांना मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय वा विचार का झाला नव्हता?

यामुळेच ‘एकटय़ाने’ शब्द निर्णायक ठरतो. एक तर हुसेन हा काही मुर्तझा, शाकीब, रहीम वा तमीम इक्बाल यांसारखा आघाडीचा वा अव्वल खेळाडू नाही. त्याचं असणं व त्याचं नसणं फारसं न जाणवणारं! दुसरी बाब म्हणजे एकटय़ाला घरी धाडणं परवडण्याजोगं. पण १५ खेळाडूंच्या संघातील आठ खेळाडूंना परत आणणं म्हणजे संघच निकालात काढणं! ‘एकटय़ानं’च्या एका शब्दात शिक्षा-शिक्षा ठोठावण्यात केवढा निर्णायक फरक पडू शकला!

पाणी मुरतंय!
पण खरा मुद्दा पुढेच येतो. संचारबंदी मोडणं शिस्तभंग व त्याबद्दल कारवाई करणं योग्यच. त्याबाबत मतभेदास वाव नाही. पण विश्वचषक मोहिमेतील केवळ पहिलाच सामना संपल्यावर आणि साखळीतील पाच सामने बाकी असताना शिस्तभंगाबद्दल कशा पद्धतीनं विचार व्हावा? आगळीक पहिलीच. तीही रात्री परतण्याबाबतची. त्यावर कडक ताकीद, आर्थिक दंड असे काही टप्पे, न्यायदानाच्या प्रक्रियेतून कसे साफ वगळले गेले? शिवीगाळ वा खिसे कापणे या गुन्ह्य़ांना दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा देणं उचित ठरतं का?

इथेच काहीतरी पाणी मुरतंय!
संचारबंदीभंगाच्या पहिल्या आगळिकीबद्दल खेळाडूला घरी धाडणं, ही शिक्षा अती-अतीच. हे काय बांगलादेशमधल्या बुजुर्गाना कळत नसेल? असा गुन्हा कोणता असू शकतो? सौदेबाजीचा? किंवा सौदेबाजांना साथ देण्याचा? किंवा सौदेबाजांची संगत राखण्याचा? किंवा सौदेबाजांशी संपर्क साधण्याचा? किंवा सौदेबाजांशी संपर्क साधला, त्याबाबत आपल्या बांगलादेश क्रिकेट मंडळाला विश्वासात न घेतल्याचा?

सट्टेबाजांशी ओळखपाळख
सट्टेबाजांशी ओळखपाळख असल्याची कबुली हुसेनने दिलेली होती. गोलंदाजीची शैली तपासण्यासाठी, चकर नसल्याची शहानिशा करून घेण्यासाठी, विश्वचषकाआधी हुसेन गेला होता चेन्नईला. तिथे भारतीय सट्टेबाजांशी तो संपर्कात आला होता. हुसेनची उलटतपासणी बांगलादेश व्यवस्थापनाने केली. त्यात उघडकीस आला त्याचा खोटारडेपणा. सुरुवातीस तो सांगू लागला की मोबाइलचं सिमकार्ड त्याला बदलायचं होतं. पण त्याच्याकडे एक सिमकार्ड होतंच, मग एवढी घाई त्याला का व्हावी? मग हुसेनने नवीन पवित्रा घेतला. आपण नाइट क्लबमध्ये गेलो होतो, असं तो सांगू लागला. पण बांगलादेश व्यवस्थापनास तेही पटेना. नाइट क्लबमध्ये कोणी सहसा एकटे-एकटे जात नाहीत. संघातील सहकाऱ्यांना, मित्र-मैत्रिणींना टाळून कोणी एकटय़ानं नाइट क्लबमध्ये जावं, हेही त्यांच्या बुद्धीस पटेना! मग मुद्दा उरला, तो त्यानं पायी पायी परतण्यावर. वातावरण खराब, पावसाळी. मग त्यानं टॅक्सी न करता पायपीट का करावी?

बांगलादेशचे काही पत्रकार सांगतात, पण बांगलादेश क्रिकेट मंडळ अजून मान्य करत नाही की, त्या रात्री हुसेन (साहजिकच एकटय़ानं!) एका सट्टेबाजाला भेटायला गेला होता. कदाचित चेन्नईत पूर्वी भेटलेल्या सट्टेबाजाला किंवा त्याच्या टोळीमधील एखाद्या सट्टेबाजाला. त्या व्यक्तीनं त्या रात्री हुसेनला टॅक्सीतून सोडलं हॉटेलजवळपास. ती टॅक्सी नजरेआड झाल्यावरच हुसेन गुपचूप पायी पायी परतला.

पण ही लबाडी एवढय़ापुरती मर्यादित नाही. हुसेनला मायदेशी परत धाडण्याआधी, त्याच्या बदली शफीउल इस्लामचा समावेश करण्याची संमती, बांगलादेश मंडळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून मिळवली होती. वरपांगी ही संमती मागाहून दिल्याचं दाखवलं जातं, ते खरं नाही. पण ही संमती मागाहून दिलेली असली, तरी परिस्थिती बदलत नाही. फारशा गंभीर नसलेल्या शिस्तभंगावरून कोणाला घरी पाठवलं जावं आणि त्याला बदली खेळाडू आणण्याची परवानगी दिली जावी हे आयसीसीच्या नियमात बसतं का? कोणत्याही संघाला, फॉर्म गमावणारा खेळाडू नकोसा झाला, तर त्याच्या बदली खेळाडू ते आता हक्काने मागू शकतील! त्या खेळाडूने एकटय़ानं शिस्तभंग केलाय असं सांगू शकतील!

उघडच दिसतंय की, हुसेनची सौदेबाजी दडपून टाकण्यासाठी, लपवाछपवी करण्यासाठी बांगलादेश मंडळ आणि आयसीसीनं आपापसात सौदेबाजी केली. आयसीसीनं त्याला परत धाडण्याची अट घातली, त्याला बदली खेळाडू देण्यास अपवादात्मक परिस्थितीत मान्यता दिली. पण कोंबडं झाकून ठेवल्याने सूर्योदय कधी कुणाला टाळता आलाय? विश्वचषकाला डाग दिसू नये, वाईट प्रसिद्धी टाळावी यासाठी किती खराब तडजोड?