आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) २०१५ च्या विश्वचषक संघाची घोषणा केली. विशेष म्हणजे, या १२ खेळाडूंच्या संघात एकाही भारतीय खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही. न्यूझीलंडच्या ब्रेन्डन मॅक्क्युलमला आयसीसीच्या विश्वचषक संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा यष्टीरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. या संघात न्यूझीलंडचे पाच, ऑस्ट्रेलियाचे तीन, द.आफ्रिकेचे दोन तर, श्रीलंका आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येकी दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र, भारतीय संघातील एकाही खेळाडूला स्थान मिळालेले नाही.

* समाधानकारक गोलंदाजी पण, लक्षवेधी नाही-
इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहित शर्मा यांनी चांगली कामगिरी केली असली तरी इतर संघाची गोलंदाजी पाहता लक्षवेधी कामगिरी करण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आले. फिरकीपटू आर.अश्विन संघाचे फिरकी अस्त्र सुरूवातीला घातक ठरले खरे परंतु, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यानंतर अश्विनच्याही गोलंदाजीची धार बोथट झालेली पाहायला मिळाली.

* दखल घेण्यासारखी फलंदाजी नाही-
फलंदाजीत देखील कोणत्याही एका फलंदाजाने सातत्य राखून जबाबदारी खेळी करून दाखवलेली नाही. सलामीवीर शिखर धवनने चांगल्या धावा कुटल्या असल्या तरी विश्वचषक संघात त्याचा समावेश व्हावा यादृष्टीने दखल घेण्यासारखी फलंदाजी एकाही भारतीय फलंदाजांकडून यावेळी झालेली नाही.  
आक्रमक खेळी, दमदार आणि प्रभावी नेतृत्व या कौशल्यांच्या बळावर कर्णधार ब्रेन्डन मॅक्क्युलमने न्यूझीलंडला पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीचे तिकीट मिळवून दिले. त्यामुळेच आयसीसीतर्फे विश्वचषक २०१५ च्या संघाचे कर्णधारपद देऊन त्याचा गौरव करण्यात आला. धोनीने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामन्यात कर्णधारी खेळी साकारली खरी परंतु, मॅचविनर ठरणाऱया प्रभावी नेतृत्त्वात यावेळी मॅक्क्युलम धोनीपेक्षा उजवा ठरला. मॅक्युलमने ९ सामन्यांमध्ये ३२८ धावा ठोकल्या, यात ४ अर्धशतकांचाही समावेश आहे.

आयसीसीचा ‘विश्वचषक २०१५’चा १२ खेळाडूंचा संघ पुढीलप्रमाणे-
मार्टीन गप्तील (न्यूझीलंड),
ब्रेन्डन मॅक्क्युलम- कर्णधार, (न्यूझीलंड),
कुमार संगाकारा – यष्टिरक्षक, (श्रीलंका),
स्टीव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया),
एबी डीव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका),
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया),
कोरी अँडरसन (न्यूझीलंड),
डॅनियल व्हेटोरी (न्यूझीलंड),
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया),
ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड),
मॉर्ने मॉर्कल (दक्षिण आफ्रिका),
बारावा खेळाडू- ब्रेन्डन टेलर (झिम्बाब्वे)

दरम्यान, विश्वचषकाचा सर्वोत्तम खेळाडूंचा संघ निवडताना उमेश यादव, मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांचा आणि फिरकीपटू आर. अश्विनचा विचार करण्यात आला होता, मात्र अंतिम संघ निवडताना त्यांना स्थान मिळू शकले नसल्याचे आयसीसीकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महमदुल्लाह (बांगलादेश), अन्वर (यूएई), वहाब रियाझ (पाकिस्तान), इम्रान ताहीर (दक्षिण आफ्रिका) यांच्या नावावरही विचार झाल्याचे सांगण्यात आले.