‘‘सदोष पंचगिरीमुळे बांगलादेशची हार झाली आणि त्यामुळेच भारतीय संघ जिंकू शकला,’’ हे उद्गार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष मुस्तफा कमाल यांना चांगलेच अडचणीत टाकणारे ठरले. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम लढतीला कमाल उपस्थित होते. त्यांच्या हस्तेच विजेत्या संघाला जेतेपदाचा चषक देण्यात येणार होता. मात्र आयसीसीच्या नवीन संरचेनुसार कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याकडे संघटनेचे सर्वाधिकार आहेत. भारतावर टीकेमुळे संतप्त झालेल्या श्रीनिवासन यांनी कमाल यांच्या हस्ते जेतेपदाचा चषक देण्यात येऊ नये, असा निर्णय घेतला. अध्यक्ष या नात्याने मिळणारा बहुमान मिळणार नसल्याने कमाल यांनी अंतिम लढत होण्यापूर्वीच मैदान सोडले. मैदानात असलेल्या आयसीसीसी पदाधिकाऱ्यांच्या कक्षातही कमाल बसले नाहीत. अध्यक्ष असूनही अपमान झाल्यामुळे कमाल यांनी अंतिम लढत पूर्ण होण्यापूर्वीच मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.