विश्वविजेतेपदासह मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०११च्या विश्वचषकानंतर अलविदा केला. क्रिकेटविश्वातले अनोखे विक्रम नावावर असणाऱ्या सचिनचा खेळाचा अभ्यास सखोल आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. २०१५च्या विश्वचषकात कोणते संघ उपांत्य फेरीत असतील याचे अचूक भाकित सचिनने वर्तवले होते. विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच सचिनने भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ उपांत्य फेरीत खेळतील, असे म्हटले होते. या चार संघांबाबतचा सचिनचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.
‘प्लेइंग इट माय वे’ आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी सचिनने हा अंदाज वर्तवला होता. विश्वविजेता कोण होईल, या प्रश्नाचे उत्तर सचिनने टाळले. इंग्लंडचा संघ उपांत्य फेरी गाठेल का, यावर सचिनने तात्काळ ‘नाही’ असे म्हटले होते. सचिनचा हा अंदाजही बरोबर ठरला आणि इंग्लंडने प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळला.