कुमार संगकाराने आतापर्यंत यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत केलेली कामगिरी अद्वितीय आहे. त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनी सांगितले.
संगकाराने विश्वचषक स्पर्धेत लागोपाठ चार शतके झळकावण्याचा विक्रम नोंदवला. त्याने बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व स्कॉटलंड यांच्याविरुद्ध ही शतके झळकावली होती. त्याच्या या कामगिरीबाबत जयसूर्या म्हणाले, ‘‘खरोखरीच आश्चर्यजनक अशीच ही कामगिरी आहे. त्याची ही चारही शतके पाहण्याचा आनंद मी लुटला. निवड समितीचे अध्यक्ष या नात्याने माझी इच्छा आहे की, त्याने ही स्पर्धा संपेपर्यंत अशीच कामगिरी करीत राहावे. आमच्या देशाचा तो महान खेळाडू आहे. तो जरी कसोटी सामन्यांमध्ये भाग घेणार असला तरीही त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये आणखी काही वर्षे खेळत राहावे. २०००पासून तो यष्टिरक्षण व फलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर प्रभावी कामगिरी करीत आहे. मनाने अत्यंत खंबीर खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे.’’
दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक रसेल डॉमिंगो यांनीही संगकाराच्या खेळाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, ‘‘संगकाराने खरोखरीच कमालीची फलंदाजी केली आहे. त्याला रोखणे हेच आमचे मुख्य ध्येय राहील. त्याकरिता मी संघातील खेळाडूंबरोबर खूप चर्चा करीत आहे. पहिल्या फळीतील फलंदाजांना झटपट बाद करण्याचा आमचा प्रयत्न राहील.’’