नानौक, हुडहुड , निलोफर, प्रिया, नीलम अशी वादळांची अनेक नावे कुप्रसिद्ध आहेत. या यादीत आता ‘ख्रिस्तोफर’ या नावाची भर घालण्यास निदान क्रिकेटविश्वाची तरी हरकत नसावी. जेथे तापमान जास्त wclogo77असते, तेथे हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि खाली जमिनीवर किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली तर वादळाचा जन्म होतो. हवामानशास्त्राच्या मदतीने वादळ कधी आणि कसे येईल. त्याची एकूण तीव्रता आणि शेवट याविषयी पूर्वकल्पना मिळते. पण क्रिकेटविश्वात ‘ख्रिस्तोफर’ नावाचे हे जे वादळ घोंगावते, त्याचा कोणताही अदमास कुणालाच आजतागायत लावता आलेला नाही. क्रिकेटमधील सर्व गणिते, साऱ्या चाणक्यनीतीला हात टेकायला लावणाऱ्या या रहस्यमय वादळाचे संपूर्ण नाव आहे ‘ख्रिस्तोफर हेन्री गेल ऊर्फ ख्रिस गेल!
वादळ ही एक नसíगक आपत्ती आहे तर गेल ही क्रिकेटमधील एक रहस्यमय तितकीच विनाशक आपत्ती आहे. रहस्यमय यासाठी म्हणावे लागेल की मदानात एरवी शांत आणि धीरोदात्त पहाडासारखा असणारा हा माणूस नेमके काय होते आणि वादळी रूप धारण करतो हे सांगणे कठीण आहे. समोर कोणत्याही wc07संघाचा कितीही दर्जेदार गोलंदाज असो. एकदा ‘ख्रिस्तोफर’ वादळ घोंगावू लागले की त्यात भले भले पालापाचोळ्यासारखे उडून जातात. या वादळाला आवरणे, मग ना प्रतिस्पध्र्याच्या दर्जेदार क्षेत्ररक्षणाला शक्य होते, ना मोठमोठय़ा मदानांच्या सीमारेषा याच्या चौकार-षटकाराला बांध घालू शकत. त्यात जर वातावरण आणि मदानाने साथ दिली तर हे ‘ख्रिस्तोफर’ नावाचे वादळ अक्षरश: वाळू आणि धूळ उडवत चक्रीवादळाचे रूप धारण करू लागते आणि हा अत्यंत भयानक प्रकार आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजाच्या प्रत्येक चेंडूचा वाळूकण करण्याची ताकद त्याच्या मनगटात आहे. एकदा का या रूपात गेले आला की बडय़ा-बडय़ा गोलंदाजांच्या आलिशान गाडय़ांचे भंगारात रूपांतर होते. प्रत्येक गोलंदाजाला याचा तडाखा असा काही बसू लागतो की साऱ्या वातावरणाचीच धूळधाण होते. मंगळवारी झिम्बाब्वेने गेलच्या याच चक्रीवादळाची अनुभूती घेतली.
गेल जेव्हा काहीही न बोलता बर्फासारखा थंड होत मदानात पाय घट्ट रोवून उभा राहतो, तेव्हा या बर्फाच्या वादळापासून स्वत:चा बचाव करण्याकरिता आपण आज मदानात न उतरता हॉटेलवरच थांबलो असतो तर बरे झाले असते, असे प्रतिस्पर्धी संघाला वाटू लागते.
जमिनीवर कमी दाबाच्या जागेभोवती गोल गोल फिरणाऱ्या हवेमुळे चक्रीवादळसदृश निर्माण होणाऱ्या संरचनेस ‘घूर्णवात’ किंवा ‘टोरनॅडो’ वादळ म्हणतात. घूर्णवातात एका नरसाळ्याच्या आकाराच्या आकाशातून सुरुवात झालेल्या ढगाचे टोक जमिनीला लागलेले असते. हे टोक वेगाने एका ठिकाणापासून दुसरीकडे पळत असते. त्याच्या तडाख्यात आलेल्या घरांचा, झाडांचा आणि इतर वस्तूंचा नाश होतो. घूर्णवात लहान किंवा मोठे असले, तरी त्यांचा जमिनीवरून सरकण्याचा वेग बव्हंशी ताशी १७५ किमीपेक्षा कमी असतो. ख्रिस गेलच्या या ‘घूर्णवात’ वादळाच्या रूपाचा ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसारख्या दिग्गज संघांना तडाखा बसला आहे. या परिपूर्ण असलेल्या संघांना मग ‘दे माय धरणीठाय’ करण्याचा पराक्रम गेल करताना पाहून त्याचे कौतुक करावे की त्याच्यापासून चार हात लांब पळावे, हेच कळत नाही. इतका दरारायुक्त आदर दुसऱ्या कोणत्याच खेळाडूविषयी वाटत नाही, यातच सर्वकाही आले.
धुवाधार पावसासारख्या धावा बरसवणारा झंझावात जेव्हा गेलमध्ये संचारतो, तेव्हा त्या पाऊस-वादळात प्रतिस्पर्धी संघ वाहून जाताना क्रिकेटरसिकांनी अनेकदा पाहिले आहे. या वादळाच्या तडाख्यातून त्याचा स्वत:चा देशही सुटलेला नाही. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने किती तरी वेळा ख्रिस गेलचे ‘मेघगर्जना’ रूपातलं वादळ अनुभवला आहे.
तूर्तास, हे वादळ या विश्वचषकामध्ये भारतीय संघाविरुद्ध घोंगावू नये, एवढीच आपण फक्त प्रार्थना करू शकतो!
ज्ञानेश्वर मर्गज