क्रिकेटच्या पटलावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय सर्वशक्तिशाली आहे. अन्य देशांत क्रिकेट नियंत्रित करणाऱ्या संस्था ते दत्तक घेऊ शकतात, एवढी त्यांची आर्थिक क्षमता आहे. आंतरराष्ट्रीय logo10क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) उत्पन्नापैकी ८० टक्के वाटा भारतातून येतो. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात सामना असला तरी तिथे भारतीय संघाचे चाहते मोठय़ा प्रमाणावर असतातच. कोणत्याही मोठय़ा स्पर्धेत भारतीय संघाची लढत म्हणजे संयोजकांना भरभरून खजिना भरून देणारा कार्यक्रम. ‘गुगल’वरही सर्वाधिक शोध घेतल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडू अग्रणी आहेत. देशभरात अब्जावधी चाहते या खेळाचे पारायण करतात. प्रत्येक घरात क्रिकेटचा किमान एक तज्ज्ञ असतो. मात्र क्रिकेटमधल्याच एका महत्त्वाच्या क्षेत्रात आपण नाममात्र आहोत, ते म्हणजे पंचगिरी. विश्वचषकाच्या निमित्ताने ही नाममात्र नगण्यता प्रकर्षांने अधोरेखित झाली आहे.
विख्यात फिरकीपटू श्रीनिवासाराघवन वेंकटराघवन यांनी खेळाडू म्हणून अलविदा केल्यानंतर पंचगिरी या उपेक्षित क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केले. खेळाचा सखोल अभ्यास, तांत्रिक गोष्टींची तपशीलवार माहिती, सतत प्रवास आणि अनियमित वेळापत्रकाची तयारी आणि अपवादात्मक तंदुरुस्ती हे वेंकटराघवन यांच्या कारकिर्दीचे गुणवैशिष्टय़. मायदेशातून या कामासाठी कोणतेही प्रोत्साहन नसताना वेंकटराघवन यांनी १९९३ ते २००४ या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकवत ठेवला. पंचांसाठी निर्धारित केलेला प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार केल्याने आयसीसीने त्यांना एलिट पंचांच्या यादीत समाविष्ट केले. एलिट पंचगटाची निर्मिती झाल्यापासून हा बहुमान पटकावणारे वेंकटराघवन हे आजही एकमेव भारतीय पंच आहेत. या बहुमानासह वेंकटराघवन यांना विश्वचषक, चॅम्पियन्स करंडक, अॅशेस मालिका अशा मोठय़ा स्पर्धामध्ये, त्यातील सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कामाविषयी अतीव निष्ठा असलेल्या वेंकटराघवन यांनी आयसीसीचा विश्वास सार्थ ठरवला. २००४मध्ये ते सन्मानपूर्वक निवृत्त झाले आणि त्यानंतर उरली आहे, एक मोठी पोकळी.
वेंकटराघवन निवृत्त झाल्यानंतर एकाही भारतीय पंचाला एलिट गटापर्यंत पोहोचता आलेले नाही. २००७मध्ये वेस्ट इंडिज येथे झालेल्या विश्वचषकात तर एकाही भारतीय पंचाला काम करण्याची संधी देण्यात आली नाही. विश्वचषकात एलिट गट पंचांच्या बरोबरीने अन्य पंचांचीही नियुक्ती करण्यात येते. छोटय़ा देशांचे आणि प्राथमिक फेरीच्या सामन्यांची जबाबदारी अन्य पंचांवर सोपवण्यात येते. मात्र त्यासाठीही भारतीय पंचांचा विचार करण्यात आला नाही. चार वर्षांनी विश्वचषकाचे आपण सहयजमान होतो. त्या वेळी अमिश साहेबा आणि शवीर तारापोर यांना काम करण्याची संधी मिळाली. अर्थातच साखळी सामन्यांपुरती. यंदाच्या विश्वचषकात पंचांमध्ये आपले एकमेव प्रतिनिधी आहेत, ते म्हणजे सुंदराम रवी. त्यांची प्राथमिक फेरीच्या तीन सामन्यांकरिता नियुक्ती झाली. बाद फेरीसाठी केवळ १२ पंचांच्याच नियुक्तीचा निर्णय आयसीसीने घेतल्याने साखळी फेरीतच रवी यांचा प्रवास संपुष्टात आला.
एलिट गटाच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय पंचांच्या एका मंडळाची स्थापना आयसीसीने १९९४ केली. या मंडळात नव्या पंचांची भर पडत असते. वेंकटराघवन निवृत्त झाल्यानंतर आतापर्यंत या यादीत सुधीर असनानी आणि शवीर तारापोर हे भारताचे केवळ दोन पंच आहेत. टीव्ही पंच म्हणून विनीत कुलकर्णी, एस. रवी यांना मान्यता मिळाली आहे. वेंकटराघवन निवृत्त झाल्यानंतर साधारण २० भारतीय पंचांनी कसोटी तसेच एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र यांच्यापैकी बहुतांशी पंचांची मायदेशात होणाऱ्या सामन्यांमध्ये स्थानिक पंच म्हणून नियुक्ती झाली होती. आंतरराष्ट्रीय सामन्यात तटस्थ पंचांच्या भूमिकेपासून ते दूरच राहिले आहेत. मुळातच पंचगिरी ही स्वतंत्र कारकीर्द होऊ शकते, हा विचार
भारतात रुजलेला नाही आणि म्हणून त्याला लोकप्रियताही नाही. स्थानिक क्रिकेटमध्ये पंचांना झालेल्या मारहाणीच्या प्रसंगांमुळे या क्षेत्राकडे वळणाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यताच
जास्त आहे.
बीसीसीआयची पंच होण्यासाठी शिस्तबद्ध यंत्रणा आहे. लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा असे त्याचे स्वरूप असते. स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पंच होण्यापर्यंतची प्रक्रिया अनेक टप्प्यांची असते. अनेक जण या परीक्षांना बसतात, परंतु वेंकटराघवन यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीचा एकही पंच क्रिकेटमधल्या महासत्ता असलेल्या भारताला देता आलेला नाही. हे लक्षात घेऊनच बीसीसीआयने नागपूरमध्ये पंचांसाठी अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. २०१०मध्ये या अकादमीची स्थापना झाली. मात्र नागपूर हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांचा बालेकिल्ला. श्रीनिवासन कंपूकडे बीसीसीआयची सूत्रे हाती आल्यानंतर या अकादमीला राजकारणाचा फटका बसला. आता तर बंगळुरूमध्ये सर्व अकादम्यांचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय झाल्याने पंच अकादमीचेही स्थलांतर झाले. भारतीय पंच इंग्रजी भाषेतून संवाद साधण्यात कमी पडत असल्याचे लक्षात घेऊन आयसीसी सर्वोत्तम पंच पुरस्काराची हॅट्ट्रिक करणाऱ्या सायमन टॉफेल आता भारतीय पंचांना पंचगिरीसह भाषेचेही मार्गदर्शन करणार आहेत. सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर २०१९च्या विश्वचषकात तरी भारतीय माणूस महत्त्वाच्या सामन्यांत पंचगिरी करताना पाहण्याची संधी मिळू शकते.