पाकिस्तानातील निर्वासितांच्या छावण्यांमध्ये समिउल्लाह शेनवारीचं बालपण गेलं. अफगाणिस्तानमध्ये ‘नेमेचि आम्हां युद्धाचा प्रसंग’ अशीच परिस्थिती होती. युद्ध आणि दहशतवादामुळे आयुष्याचं जगणं आणि wc09मृत्यू हे हातात हात घालून वावरत होते. अनेक निरपराध आणि निष्पाप कुटुंबं उद्ध्वस्त झाली होती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बऱ्याच कुटुंबीयांनी शेजारील पाकिस्तानच्या सीमारेषा ओलांडून तिथे आश्रय घेतला होता. यापैकीच एक होतं शेनवारी कुटुंब. छोटा समिउल्लाह आपल्या आई-वडिलांचा हात पकडून या काफिल्यात सामील झाला होता. कोणतंही वाहन नसताना पायी प्रवास करणाऱ्या या जथ्याला मोठमोठे डोंगर पार करावे लागले. परंतु अखेर पेशावरला त्यांना आश्रय मिळाला. याबद्दल तो स्वत:ला नशीबवान समजतो. समिउल्लाहचं शिक्षण इथेच झालं आणि क्रिकेटचे धडेही त्याने याच ठिकाणी गिरवले. कारण पाकिस्तानामधील निर्वासितांच्या छावण्यांमध्ये क्रिकेट चांगलंच लोकप्रिय होतं. १९९५मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाची स्थापना झाली. मग निर्वासित अफगाणींनी देशात परतल्यावरही हा खेळ चालू ठेवला. अन्य खेळांप्रमाणेच क्रिकेटला तालिबानींची बंदी होती. परंतु २०००मध्ये या एकमेव खेळाला बंदिवासातून वगळण्यात आले. मग अफगाणिस्तान क्रिकेट महासंघाला आयसीसीची मान्यता मिळाली. क्रिकेट तिथं खऱ्या अर्थानं रुजू लागलं. २००४मध्ये समिउल्लाहचं कुटुंब पुन्हा आपल्या देशात परतलं.
एकीकडे अफगाणिस्तान हा देश युद्धजन्य परिस्थिती मागे टाकून सावरत असताना क्रिकेटमध्ये ही मंडळी आपली छाप पाडण्यासाठी धडपडत आहेत. आतापर्यंत तीन ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धापैकी एकमेव विजय गतवर्षी हाँगकाँगविरुद्ध त्यांच्या खात्यावर होता. परंतु वर्षभरापूर्वी बांगलादेशमध्ये झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पध्रेत अफगाणिस्तानने कमाल केली. चक्क यजमान बांगलादेशला त्यांनी पराभवाचा धक्का दिला. त्यावेळीसुद्धा समिउल्लाहच अफगाणी विजयाचा शिल्पकार होता. निम्मा संघ ९० धावांत माघारी परतला असताना समिउल्लाहने अजगर स्टॅनिकझाईच्या साथीनं सहाव्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी रचली होती. या विजयामुळे क्रिकेटविश्व अफगाणिस्तानची दखल घेऊ लागले. यंदा हा संघ प्रथमच विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या विजयाचा सूत्रहारही समिउल्लाहच होता. समोरून एकेक फलंदाज तंबूची वाट धरत असताना तो मात्र खचला नाही, मैदानावर धीरानं उभं राहून त्यानं अशक्यप्राय विजय आवाक्यात आणला. विश्वचषकातील पहिल्यावहिल्या विजयाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
मधल्या फळीत फलंदाजी आणि लेग ब्रेक गोलंदाजी ही समिउल्लाहची खासियत. तो आता संघातील एक अनुभवी खेळाडू म्हणून गणला जातो. याचप्रमाणे आपल्या देशातही त्याला मोठी लोकप्रियता आहे. अफगाणिस्तानकडून सर्वाधिक एकदिवसीय धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या पंक्तीत समिउल्लाह (४७ सामन्यांत ३८.५१च्या सरासरीने ११९४ धावा) दुसऱ्या स्थानावर आहे, तर गोलंदाजांच्या पंक्तीत ४१ बळींसह अग्रस्थानावर आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही तो फलंदाजांमध्ये तिसऱ्या आणि गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
२०१०मध्ये ‘आऊट ऑफ द अ‍ॅशेस’ नावाचा एक ब्रिटिश चित्रपट आला होता. युवकांचा समावेश असलेल्या अफगाणिस्तानी राष्ट्रीय क्रिकेट संघानं विश्वचषकाचं जोपासलेलं स्वप्न या चित्रपटात रेखाटण्यात आलं आहे. पारंपरिक पोशाखात सुरुवात करीत मग देशाच्या गणवेशात आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणारी ही अफगाणी यशोगाथा आता प्रत्यक्षात स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करीत आहे. समिउल्लाहप्रमाणे असंख्य तरुणांनी ही क्रिकेटज्योत देशातील अंधकारमय प्रवासातसुद्धा तेवत ठेवली आहे. अफगाणिस्तानचा संघ कुठवर वाटचाल करेल, याबाबत जरी साशंकता असली तरी त्यांची गुणवत्ता आणि पाकिस्तानी खेळाडूंप्रमाणे नसानसांत भिनलेली झुंजार वृत्ती त्यांचं स्थान निश्चितपणे अधोरेखित करेल.