antविराट कोहली भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अन् एकदिवसीय क्रिकेटमध्ये उपकर्णधार, तू हे काय केलंस? तुझी बॅट जरूर तलवारीसारखी चालवत राहा, पण तोंडावर आवर घालायला आता तरी शिक! एका सर्वस्वी निरपराध, बुजुर्ग क्रीडा पत्रकाराला अर्वाच्य शिव्या हासडत राहिलास. त्यांची उशिराने का होईना बिनशर्त माफी माग, मुख्य म्हणजे मनापासून माफी माग! लक्षात ठेव, एका विशाल देशाने लोकप्रिय खेळाचे नेतृत्व तुझ्यावर विश्वासाने सोपविलं आहे!
आणि तीच गोष्ट मला सांगावीशी वाटते, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बुजुर्गाना. अध्यक्षपदावरून पदच्युत झाल्यावरही दक्षिण विभागातील पाचपैकी पाच राज्य संघटनांना आपल्या पकडीत ठेवणाऱ्या श्रीनिवासन यांना. नवे अध्यक्ष जगमोहन दालमिया, माजी अध्यक्ष शरद पवार व शशांक मनोहर, आजी-माजी चिटणीस अनुराग ठाकूर व संजय पटेल आदी साऱ्या पुढाऱ्यांना. प्रसिद्धी माध्यमांचा आदर ठेवण्याची, कदर करण्याची सवय लावून घ्या. त्याबाबत कर्णधार (सध्या श्रीनींच्या चेन्नई सुपर किंग्जचा धोनी) व प्रसारमाध्यम संपर्क अधिकारी यांना स्पष्ट, सुसंस्कृत आदेश द्या!
महेंद्रसिंग धोनीने आजवर तरी कधीही क्रीडा पत्रकारांना शिवीगाळ केलेली नाही, पण त्याचं वागणं मात्र कमालीच्या बेपर्वाईचं असतं. सामना संपल्यावरच्या वार्तालापासाठी क्रीडा पत्रकारांना खुशाल ताटकळत ठेवण्याची खराब खोड त्याला लागलेली आहे. गेल्या शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) व बीसीसीआय यांचे प्रसारमाध्यम व्यवस्थापक त्याला पुन्हापुन्हा विनवीत होते, पण त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणारा, भारतीय क्रिकेट कर्णधार तेव्हा काय होता? खुशाल फुटबॉल खेळत राहिला. आता बोला! इंग्लंड व श्रीलंका दौऱ्यातही क्रीडा पत्रकारांना असंच दीर्घकाळ वाट बघायला लावणाऱ्या कर्णधार धोनीने उपकर्णधार कोहलीवर कोणते संस्कार केले?
झारखंडसारख्या मागासलेल्या भागातून आलेल्या धोनीत समंजसपणा आहे, पण राजधानी दिल्लीच्या वातावरणात वाढलेला विराट तापट स्वभावाचा, गरम डोक्याचा आहे. विराट व त्याच्यापेक्षाही बेताल होऊ शकणारा प्रवीण कुमार यांच्या मस्तीचा चटका छायाचित्रकारांना बसलेला आहे. प्रसंग २०१२-१३ मधील कुकच्या इंग्लिश संघाच्या भारतीय दौऱ्याचा. भारतीय संघातील इतर सगळे जण सराव करीत असताना, विराट व प्रवीण यांनी कोणती जागा आग्रहाने निवडावी? छायाचित्रकारांसाठी खास ठेवलेल्या जागेसमोर ते घुसले. कोहलीने फटकवलेला चेंडू पत्रकाराच्या लॅपटॉपवर आदळला. तरीही विराट-प्रवीण हटेनात. बाचाबाची, शब्दाशब्दी झाली. मग तर विराट-प्रवीण हे छायाचित्रकारांच्या, पत्रकारांच्या दिशेने चेंडू फटकवत राहिले!
झिम्बाब्वेच्या छोटय़ा दौऱ्यातही विराटला आपल्या भावना काबूत ठेवता आल्या नव्हत्या. हाही प्रसंग २०१३मध्ये दुसऱ्या कसोटीतला. हरारेच्या सामन्यात विराटची शैलीदार फ्लिक माल्कम वॉलने छान झेलली. पंचांनी झेलबाद दिल्यावर विराटने अपील केलं, पण टीव्ही पंचांनीही, त्याला बाद ठरवल्यावर विराट हुज्जत घालत राहिला, मैदानातील दोन्ही पंचांशी.
तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील सिडनी कसोटीत विराट सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करीत होता. त्याच्यासमोरील काही टारगट प्रेक्षकांच्या एका गटाने, त्याला उद्देशून अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. तरुण विराटने त्यांना त्यांच्या भाषेत कसं उत्तर द्यावं? त्यांच्या दिशेने मधलं बोट तो खाली वाकवत राहिला. टीव्हीला त्याच्या वागण्याचं चित्रण मग दिवसभर दाखवलं गेलं.
असे चाळे करणारा विराट ना पहिला, ना शेवटचा भारतीय. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात सतत टोमणेबाजी करणाऱ्या एका प्रेक्षकाला, बडोद्याच्या युसूफ पठाणने थोबाडीत मारली नव्हती का? गतसाली रणजी अंतिम सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध बचावात्मक क्षेत्रव्यूह लावण्याबद्दल, कर्नाटक कर्णधार विनय कुमार याला पत्रकारांनी छेडले तेव्हा त्यानं अपशब्द वापरले नव्हते का? दोन वर्षांपूर्वी बंगळुरूमधील आयपीएल सामन्यात, विराट व गौतम गंभीर यांची गरमागरमी टीव्हीने दाखविली होती ना?
चालू विश्वचषकात ज्याची तेजोमय बॅट झकास तळपतेय, आणि देशी-विदेशी खेळाडूंची वाहवा मिळवतेय, त्याच विराटच्या व्यक्तित्वाच्या दुसऱ्या व गलिच्छ बाजूविषयी. आपल्याशी विराट कसा वागला, ते ‘हिंदुस्तान टाइम्स’ या सुप्रसिद्ध दैनिकाचे क्रीडा प्रतिनिधी जसविंदर सिंधू यांच्या शब्दांत सांगतो-
पर्थच्या मरडोक ओव्हलवर, आमच्या नाश्त्याची व्यवस्था पाहणाऱ्या दोघांशी मी बातचीत करीत होतो आणि भारतीय सराव व डग आऊट यावरही मी नजर ठेवून होतो. अचानक डग आऊटच्या बाजूस उभा असलेला विराट आम्हाला उद्देशून काही तरी सांगताना दिसू लागला. मला प्रथम वाटलं की, आमच्यामागे उभे असणाऱ्यांना तो रागाच्या भरात खडसावतोय. कारण माझा त्याच्याशी कधीच तंटा झालेला नव्हता. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मी त्याच्या दिशेनं नजर फिरवली. पाहतो तो विराट माझ्यावरच खेकसत होता. ‘ब आणि भ’च्या बाराखडीत शिविगाळ करीत अंगठय़ाजवळचं बोट माझ्यावर रोखत होता. तरीही शंकानिरसन करून घेण्यासाठी मी माझा अंगठा छातीवर टेकवत त्याच्याकडे विचारणा केली. त्यानेही बोट खाली-वर करीत मला लक्ष्य बनविल्याचं स्पष्ट केलं. ‘‘तू इथेही पोहोचला आहेस!’’ असं ओरडत त्याने पुन्हा ब, अन् भ अन् मची बाराखडी सुरू केली.
मी स्वत:ला सावरण्याआधी, त्याने त्याची किट-बॅग उचलली. माझ्याकडे एकटक बघत, अर्वाच्य शिव्या हासडत, ड्रेसिंगरूममध्ये तो निघून गेला. माझे सहकारी पत्रकार बंधू मला विचारू लागले, पण काय घडलं ते मलाच उमगत नव्हतं, तर मी त्यांना काय सांगणार? सारं घडलं सुमारे १५ मिनिटांत! मागाहून मला सांगितलं गेलं की, दुसऱ्या कुठल्या पत्रकाराचा राग, तो चुकून माझ्यावर काढत होता.
दहा मिनिटांनी विराट ड्रेसिंग रूमबाहेर आला. हसत हसत माझ्या दिशेने हात हलवू लागला. मी अधिकच गोंधळलो, पण त्याला मुळीच प्रतिसाद दिला नाही. मग माझा जुना पत्रकार मित्र सुमित घोष याच्यामार्फत त्याने दिलगिरी व्यक्त केली. मी सुमितला म्हणालो की, असं वागणं कसोटीवीराला शोभत नाही, असा माझा निरोप विराटला पोहोचव! मला नमूद करावंसं वाटतं की, विराटने अद्याप (मंगळवारी रात्रीपर्यंत) माझ्याकडे माझी माफी मागितलेली नाही. विराट! माफी माग. मुख्य म्हणजे मनापासून माग! अगदी मनापासून.
वि. वि. करमरकर