इंग्लंडने विजयासाठी ठेवलेले ३१० धावांचे आव्हान अवघ्या एक गड्याच्या मोबदल्यात पूर्ण करून श्रीलंकेने इंग्लंडवर ९ गडी राखून विजय मिळविला. श्रीलंकेकडून लाहिरू थिरीमन्ने आणि कुमार संगकारा यांनी शतके झळकाविली.
इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.  इंग्लंडच्या सलामीवीरांनी ६२ धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात केली. पण मोईन अली मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर १५ धावांवरच बाद झाला. त्यानंतर आलेला बलांसही फार वेळ मैदानावर टिकला नाही. अवघ्या ६ धावांवर हेरथने त्याला बाद केले. बेलने मात्र दुसरी बाजू लावून धरलेली होती. मात्र अवघ्या एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले. लकमलने ४९ धावावंर त्याची विकेट घेतली. त्याच्या सोबत खेळत असतानाच रूटने मैदानावर जम बसवला होता. बेल बाद झाल्यानंतर त्याने सामन्याची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि यशस्वीपणे पार पाडली. त्याने शतकी खेळी केली. १२१ धावांच्या त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. मॉर्गन, टेलर आणि बटलर यांनीही धावसंख्येला हातभार लावल्याने, इंग्लंडने ५० षटकांत ६ बाद ३०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या श्रीलंकेने अत्यंत सावध पण चांगली सुरुवात केली. दिलशान आणि थारमाने दोघांनीही चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. ४४ धावांवर असताना दिलशान अलीच्या चेंडूवर बाद झाला.  थिरिमनेने नाबाद (१३९) आणि संगकाराने नाबाद (११७) धावा केल्या. दोघांनी इंग्लिश गोलंदाजांना अजिबात दाद न देता चौफेर फटकेबाजी केली आणि धावा वसूल केल्या. इंग्लंडला दिलशानच्या रुपाने श्रीलंकेचा फक्त एकमेव गडी बाद करता आला.