शिस्तभंगाची शिक्षा म्हणून घरी परत धाडलेल्या अल अमीन हुसेन या क्रिकेटपटूऐवजी बदली खेळाडू देण्याचा नवा पायंडा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ११व्या विश्वचषकात पाडला आहे. ही उपाययोजना योग्य नव्हे, हे त्यांनाही समजतं. म्हणूनच ‘अपवादात्मक परिस्थिती’ची ढाल पुढे करून, या घातक wclogoपायंडय़ाला रंगसफेदी केली जात आहे. रोगापेक्षा इलाज घातक, निदान रोगाइतकाच इलाज घातक, ही साधी बाब आयसीसीच्या नेतृत्वाने कशी नजरेआड केली? अशी कोणती मजबुरी वा परिस्थिती निर्माण झालेली होती?
विचार करा : आज एखाद्या संघास, फॉर्म गमावलेला एखादा खेळाडू नकोसा झाला. उदाहरणापुरतं बोलायचं तर समजा पाकिस्तानला युनिस खान किंवा भारताला अंबाती रायुडू नकोसा झाला. मग भले त्यांना असह्य़ दुखापतींनी भंडावलेले नसेलही, त्यांच्या बदली खेळाडू मिळविण्यासाठी आता चोरवाट शोधण्याची गरज नाही, आयसीसीनेच राजमार्ग मोकळा करून दिलेला आहे. अशा खेळाडूंवर रात्री दहापर्यंत हॉटेलात न परतल्याबद्दल, त्या खऱ्या-खोटय़ा किंवा आपापसांतील संगनमतातून शिस्तभंगाची कारवाई, त्या संघानं करावी. आयसीसीने परिस्थिती ‘अपवादात्मक’ असल्याचं सांगावं. बस्स, बदली खेळाडू मंजूर!
यंदा विश्वचषकात भारत-श्रीलंका-पाकिस्तान यांना आधी त्यांनी जाहीर केलेल्या संघातील एकेक खेळाडू बदलण्यास आयसीसीने हिरवा कंदील दाखवलाय. त्यानुसार इशांत शर्माची जागा मोहित शर्माने घेतली. जीवन मेंडीसच्या जागी उपुल थरंगा श्रीलंका संघात सामील झाला. पाकिस्तान संघातून मोहम्मद हाफिझची गळती विश्वचषकाआधीच अशीच मंजूर झाली व नासीर जमशेद दाखल झाला; पण हे सारे व्यवहार पूर्णपणे पारदर्शक होते. बदली खेळाडू मागण्यासाठी सोयीस्कर कारणं पुढे करण्याची कोणतीही चाल तेव्हा खेळली गेली नव्हती. मग आता ही लपवाछपवी कशासाठी?
चिंता जाहिरातदारांची!
उघडच आहे की, रात्री दहापर्यंत परतण्याची संचारबंदी मोडणं हा बांगलादेशच्या हुसेनचा असली गुन्हा नाही. रात्री उशिरा परतण्याच्या पहिल्या शिस्तभंगाबद्दल, घरी परत धाडण्याची सर्वोच्च शिक्षा दिली जात नसते, मग गंभीर गुन्हा कोणता? बांगला पत्रकारांच्या माहितीनुसार, हा गुन्हा सट्टेबाजांशी संपर्कात राहण्याचा आणि त्याबाबत बांगलादेश मंडळाला अंधारात ठेवण्याचा. विश्वचषकाला सौदेबाजीची, निकाल निश्चितीची कीड लागत्येय अन् तीच गोष्ट आयसीसी लपवू पाहत्येय. अगदी श्रीनिवासन व अरुण जेटली व शरद पवार यांच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या धर्तीवर!
जनसामान्य खेळांच्या दुनियेकडे कोणत्या अपेक्षेने बघतात? शिक्षण व क्रीडा ही क्षेत्रं निर्भेळ ज्ञानोपासनेची व निर्भेळ आनंदाची मानली जात. क्रीडा क्षेत्रातील अनेक कुलंगडी- सौदेबाजी (मॅच-फिक्सिंग व स्पॉट-फिक्सिंग) व नियमबाह्य़ उत्तेजकांचे सेवन चव्हाटय़ावर आल्यावरही क्रीडा क्षेत्राची काही झळाळी टिकून आहे. त्यामुळेच जाहिरातदारीचा फार मोठा वर्ग क्रीडा क्षेत्रास चिकटून आहे. आयसीसीला चिंता वाटत्येय ती या जाहिरातदारांची व पुरस्कर्त्यांची. म्हणूनच हुसेनबाबत फक्त शिस्तभंगाचा गुन्हा नोंदवला गेलाय. मग सौदेबाजांशी संपर्काचे काय? तोबा-तोबा! सौदेबाजी कुणी केलेली नाही, कुणी पाहिलेली नाही. तमाम जाहिरातदारांनो, निर्धास्त राहा! देवाशपथ सारं काही अकलंकित आहे? सट्टेबाज व सौदेबाज? कोण, कुठे असतात ते? इतर अनेक खेळांप्रमाणे क्रिकेटलाही सौदेबाजीनं ग्रासलंय. अगदी अकारण, सौदेबाजीचे प्रयत्न, प्रसिद्धीमाध्यमांपासून दडपू पाहणारी आयसीसी कोणत्या दुनियेत वावरत आहे?
दंड, बंदी लपवली नाही!
सट्टेबाजांशी संपर्क साधणं, सट्टेबाजांच्या कारवायांत सामील होणं आदी गुन्ह्य़ांबाबत, राजीव मूलचंदानी या ब्रिटिश नागरिकाला ऑस्ट्रेलियात १२०० डॉलर्सचा दंड झाला. त्याने गुन्हा केल्याचा कबुलीजबाब दिल्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही सामन्यांना हजर राहण्याबद्दल बंदी घातली गेली. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न केले नव्हते!
सट्टेबाज, सौदेबाज यांचं अस्तित्व व धोका मान्य करून, गेल्या विश्वचषकाआधीपासून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काही पावलं उचलली. मैदानातील खेळाचं चित्रण, टी.व्ही. प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात काही सेकंद जातात. त्या १०-१२ सेकंदांत, स्टेडियममधून सट्टेबाजांना मोबाइलवरून माहिती देणारे हस्तक पेरलेले असतात सौदेबाजांनी. त्यांना कसं ओळखायचं? त्याबद्दल ऑस्ट्रेलियन यंत्रणेने काही आडाखे बांधले. सीसीटीव्ही कॅमेरे आणि भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या शक्तिशाली दुर्बिणी रोखल्या जातात प्रेक्षकांच्या गर्दीवर. गर्दीतही आडोसा शोधणाऱ्या प्रेक्षकांवर. मोबाइल अगदी ओठांना व कानांना चिकटवून बोलणाऱ्यांवर व ऐकणाऱ्यांवर, तसेच लॅपटॉप चालू ठेवणाऱ्यांवर.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासाठी भ्रष्टाचारविरोधी पथकाला जोड दिली ती सचोटी पथकाची (इंटिग्रिटी युनिट). सट्टेबाजी करणाऱ्यांवर नजर ठेवणाऱ्या एका स्वायत्त कंपनीसाठी या उपक्रमात भागीदार करून घेतलं. ऑस्ट्रेलियात सट्टेबाजी कायदेशीर आहे. साऱ्या कॉर्पोरेट सट्टेबाजी संस्था त्यामुळे अधिकृतरीत्या खुल्लम् खुल्ला व्यवहार करतात. या उपक्रमासाठी त्यांचंही सहकार्य मिळवलं. या गोष्टी काय आयसीसीला माहिती नाहीत? गेल्या चार वर्षांत ऑस्ट्रेलियानं ही पावलं जाहीरपणे टाकली. त्यांनी कधी जाहिरातदारांचा धसका घेतला नव्हता ना? क्रिकेट वा क्रीडा आणि नाना तऱ्हेचे गैरव्यवहार याचं सहअस्तित्व जुनं आहे. खरं तर सनातन आहे. गंगाजल पवित्र, पण त्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे राम तेरी गंगा मैली! मग सट्टेबाजांशी संपर्क साधणाऱ्या हुसेनला सहीसलामत सोडण्यासाठी, बेशिस्तीच्या निंदनीय गुन्ह्य़ाचा गैरवापर वा सोयीस्कर वापर का करीत आहे? बेशिस्तीबद्दल बदली खेळाडू मंजूर करीत रोगापेक्षा जहरी इलाज का स्वीकारीत आहे?