बुलढाणा : विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या व अलीकडे गुन्हेगारीने कळस गाठलेले मलकापूर शहर एका थरारक घटनेने हादरले! मोबाईल देण्यास नकार दिल्याने न्यायालयात काम करणाऱ्या तरुणीच्या कथित मित्राने तिच्यावर चाकूने वार केला. यावेळी उपस्थित रक्तबंबाळ तरुणीच्या बहिणीने धाडस करीत बचाव केल्याने तरुणी ती बालंबाल बचावली!

दरम्यान कथित मित्र असलेल्या युवकाने स्वतःवर देखील चाकूने वार करून घेतल्याने तो देखील जखमी झाला. या घटनेत जखमी युवतीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर मलकापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

या थरारक घटना क्रमामुळे मलकापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. कथित मित्र असलेल्या युवकाने मोबाईल देण्यास नकार दिल्याने २५ वर्षीय तरुणीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, त्यानंतर आरोपीने स्वतःच्याच गळ्यावर वार करून स्वतःलाही जखमी केले. ही धक्कादायक घटना मलकापूर शहरातील गोकुळधाम नगर परिसरात घडली.या प्रकरणी जखमी तरुणीची बहीण व अभियांत्रिकीचे विध्यार्थिनी हिने पोलिसांत तक्रार दिली. आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी युवतीचे कुटुंब सुशिक्षित असून तीचे आई वडील हे शिक्षक असून गंभीर जखमी युवती मलकापूर न्यायालयात कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोशनी रविंद्र साळी (वय १९, रा. गोकुळधाम नगर, मलकापूर) हिची बहीण जखमी जानवी रविंद्र साळी आणि आरोपी शुभम विलास झनके (वय अंदाजे २९, रा. मधुवन नगर, मलकापूर) हे दोघे मित्र आहे.

घटनेच्या वेळी शुभम हा त्यांच्या घरी आला. त्याने जानवीकडे मोबाईल फोन मागितला. मात्र तिने मोबाईल देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या शुभमने रागाच्या भरात चाकूने जानवीच्या चेहऱ्यावर व गळ्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले.

यानंतर, स्वतःच्या कृत्याचा परिणाम पाहून घाबरलेल्या शुभमने तोच चाकू स्वतःच्या गळ्यावर फिरवून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेनंतर तातडीने दोघांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी फिर्यादी रोशनी रविंद्र साळी हिने तक्रार दिल्यानंतर आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कौळासे करीत आहेत.