बुलढाणा : अनेक निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या राजधानी दिल्ली मधील स्फ़ोटा नंतर महाराष्ट्र राज्यातही हाय अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे. वर्षभर दररोज हजारो आबालावृद्ध भाविकांची वर्दळ असणाऱ्या विदर्भ पंढरी शेगाव मध्येही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मंदिर परिसरासह शेगाव नगरीवर पोलीस यंत्रणा करडी नजर ठेवून आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करून शेगाव पोलीस व पूरक यंत्रणा “अलर्ट मोड’वर असल्याचे चित्र आहे. वरिष्ठ पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली.संत गजानन महाराज संस्थान मंदिरावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची तसेच संशयित व्यक्तीची मंदिराचे प्रवेशद्वारात पोलीसांकडून तपासणी केली जात आहे.

भाविक आणि त्यांच्या साहित्याची तपासणी करूनच त्यांना दर्शनास आत सोडण्यात येत आहे. मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे. श्रींचे मंदिराची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात आहे. नेहमी प्रमाणे संस्थानचे सुरक्षा रक्षक सदैव भक्तांचे सुरक्षे साठी कार्यरत आहेत.

मंदिर सुरक्षा व्यवस्थेचे पोलीस निरीक्षक पितांबर जाधव व पोलिस उपनिरीक्षक संजय पहूरकर, ग्पोलिस उपनिरीक्षक भांदुरगे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हुसेन पटेल, गजेंद्र रोहणकार, प्रशांत कुलकर्णी, पोलीस हवालदार गजानन गीते, पोलीस जमादार उद्धव कंकाळे, तुकाराम इंगळे यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी मंदिर परिसर मध्ये सुरक्षा व्यवस्थासाठी तैनात आहेत. तसेच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी शहरात ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. लहान मोठ्या संशयास्पद हालचाली व बाबी वर यंत्रणा बारकाईने लक्ष ठेऊन असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.

रेल्वे पोलीसही दक्ष

वर्षभर हजारो भाविक, पर्यटकांची रेलचेल असणाऱ्या शेगाव रेल्वे स्थानकावरही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.. दिल्लीच्या घटनेनंतर शेगाव तीर्थक्षेत्र असल्याने येथील रेल्वे स्थानकावर येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांमधून उतरणाऱ्या व येथून चढणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर तपासणी करण्यात येत आहे. या साठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठलीही अनुचित घटना प्रकार घडू नये याची सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.