कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामात महत्वपूर्ण बदल केला. आतापर्यंत झालेल्या सामन्यात कर्णधारपद, यष्टीरक्षक आणि फलंदाजी अशा तिहेरी भूमिका बजावणाऱ्या दिनेश कार्तिकने कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेत इंग्लंडच्या मॉर्गनकडे कर्णधारपद सोपवलं. फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करता यावं यासाठी कार्तिकने हा निर्णय घेतल्याचं समजतंय. आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत KKR ची कामगिरी संमिश्र स्वरुपाची राहिलेली आहे. पण कर्णधारबदलाचा संघाच्या कामगिरीवर फारसा परिणाम झालेला दिसला नाही. मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्याक कोलकाता नाईट रायडर्सला पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागलं.

हंगामाच्या मध्यावधीतच दिनेश कार्तिकला KKR चं कर्णधारपद का सोडावं लागलं याचा आज आपण आढावा घेणार आहोत.

दिनेशने कर्णधारपद सोडलं कारण…

कोलकाता नाईट रायडर्सने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रीत करता यावं आणि संघाच्या विजयात अधिक सक्रीय सहभाग नोंदवता यावा या कारणासाठी दिनेशने कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत झालेल्या ३ सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकने फक्त १०८ धावा काढल्या आहेत ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.

कर्णधारपदी मॉर्गनच का??

ओएन मॉर्गन हा अनुभवी कर्णधार आहे. विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाचं त्याने नेतृत्व केलं आहे. दिनेश कार्तिकनंतर संघात सर्वात अनुभवी खेळाडू मॉर्गनच असल्यामुळे त्याच्याकडे संघाची सूत्र सोपवली जाणार हे स्पष्ट होतं. शुबमन गिलनंतर मॉर्गननेच KKR कडून सर्वाधिक धावा काढल्या आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत मॉर्गनच्या अनुभवाचा फायदा KKR ने करुन घेत त्याच्याकडे संघाची कमान सोपवली.

मागच्या हंगामात प्ले-ऑफ गाठण्यात KKR अपयशी, तरीही यंदा कार्तिककडेच नेतृत्व का सोपवलं??

KKR ने कर्णधारपदात बदल करण्याऐवजी प्रशिक्षक वर्गात बदल करण्याचं ठरवलं. मुख्य प्रशिक्षक जॅक कॅलिजच्या जागेवर कोलकाता नाईट रायडर्सने न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलमला संधी दिली. “संघात नवीन विचार आणि नव्या पद्धती घेऊन येईल असा उमेदवार आम्हाला हवा होता. आमच्या संघात सर्वाधित तरुण खेळाडू आहेत. या तरुण खेळाडूंसोबत काम करुन त्यांना योग्य मार्गदर्शन करणारा प्रशिक्षक आम्हाला हवा होता. यासाठी मॅक्युलमची संघाचा मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.” KKR चे CEO वेंकी मैसूर यांनी काही महिन्यांपूर्वी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली होती. त्यामुळे KKR आपल्या प्रशिक्षण वर्गात बदल करणार होता हे स्पष्ट होतं.

हाय प्रोफाईल कोच आणि लो प्रोफाईल कर्णधार हे समीकरण यंदाच्या हंगामात चालतंय का?

कोलकाता नाईट रायडर्सव्यतिरीक्त किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांनी यंदा हे समिकरण अवलंबलं आहे. पंजाबचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे असून कर्णधार लोकेश राहुल आहे. तर दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींग असून कर्णधार श्रेयस अय्यर आहे. पंजाबसाठी यंदाचा हंगाम अतिशय खराब गेला असून सध्या हा संघ गुणतालिकेत सर्वात तळातल्या स्थानावर आहे. पण दुसरीकडे दिल्लीचा संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करत गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. KKR ची यंदाच्या हंगामातली कामगिरी वाईट झालेली नसली तरीही त्यांना आपल्या कामगिरीत सुधारणेला प्रचंड वाव आहे.

कार्तिक दडपणाखाली होता का??

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील प्रतिक्रीया पाहिल्या तर दिनेश कार्तिकवर कर्णधारपद सोडण्याचा दबाव वाढत होता हे नक्की आहे. समालोचन करत असताना काही अनुभवी माजी खेळाडूंनीही दिनेशच्या कर्णधारपदाच्या शैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. श्रीसंतने आपल्या ट्विटर अकाऊंटवर थेट मॉर्गनसारख्या खेळाडूला KKR चं कर्णधारपद सोपवायला हवं असं म्हटलं होतं. त्यातच ढासळणारा फॉर्म पाहता दिनेश कार्तिकला कर्णधारपद सोडावं लागेल अशी चिन्ह दिसतच होती.

संघाची मोट बांधून ठेवण्यात कार्तिक कितपत यशस्वी??

कार्तिकने KKR चं यशस्वी पद्धतीने नेतृत्व केलं आहे असं म्हणता येणार नाही. मागच्या हंगामातही आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिकमध्ये बेबनाव असल्याच्या काही बातम्या समोर आल्या होत्या. रसेलचा फलंदाजीतला क्रम नक्की न झाल्यामुळे त्याने उघड नाराजी व्यक्त केली होती. “आमचा संघ खूप चांगला आहे, पण चुकीचे निर्णय घेतले गेले तर तुम्ही सामना हरणारच आणि आता नेमकं हेच होतंय”, अशा शब्दांमध्ये रसेलने मागच्या हंगामात आपली नाराजी बोलून दाखवली होती. यंदाच्या हंगामातही रसेलच्या फलंदाजी क्रमाचा तिढा KKR सोडवून शकलेली नाही. आतापर्यंत राजस्थान आणि दिल्ली या दोन सामन्यांमध्येच रसेलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीचा संधी मिळाली.