रामकृष्ण अभ्यंकर
सर्वसाधारणपणे डाव्या सोंडेची गणेशस्थाने बहुतांश ठिकाणी उपलब्ध आहेत. उजव्या सोंडेची मात्र फारच थोडी मंदिरे आहेत. त्यापैकी एक आहे, महाराष्ट्रातील खानदेशमधे. येथे जळगाव जिल्ह्य़ातील एरंडोल तालुक्यात पद्मालय व प्रवाळ गणेशस्थान आहे. या गणेशस्थानाचे वेगळेपण म्हणजे इथे डाव्या व उजव्या सोंडेच्या अशा दोन्ही प्रकारच्या गणेश मूर्ती आहेत. मंदिरात  प्रवेश केल्यावर एका दगडी उंच बठकीवर डाव्या बाजूस उजव्या सोंडेची तर उजव्या बाजूस डाव्या सोंडेची दगडी मूर्ती  ठळकपणे दिसते. या दोन्ही मूर्तीना चांदीचे मुकुट आहेत. सभामंडपात मूर्तीच्या शेजारी पायाशी चार फूट उंचीच्या दगडाचा प्रशस्त उंदीर असून त्यास १४ बोटे आहेत. त्याच्या  हातात मोदक आहे. इतरांपेक्षा वेगळे असलेले मंदिर पूर्ण दगडी असल्याने साहजिकच तेथे नैसर्गिक गारवा  जाणवतो.

मंदिराच्या प्रवेशद्वारीच मोठा फलक दृष्टीस पडतो. त्यातील मजकूर वाचल्यावर मंदिराचा इतिहास समजतो. मंदिराभोवती अनेक छोटी-मोठी मंदिरे आहेत. मंदिर परिसरात गणेशाच्या एकूण २१ मूर्ती आहेत. या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार वाईस्थित गोिवदस्वामी बर्वे या गणेशभक्ताने १९१५ ते १९३४ दरम्यान केला. त्यावेळी त्यांचा मुक्काम येथेच होता. मंदिर जीर्णोद्धारासोबत त्यांनी भक्त सभामंडपदेखील बांधला. गोिवद महाराजांच्या पादुका मंदिरासमोर आहेत. त्यांचे दर्शन घेऊनच भक्तमंडळी आंत दर्शन करतात. या पादुकांजवळ एक ११ किलो वजनाची मोठाली घंटा आहे. गोिवद महाराजांच्या आदेशानुसार  बाळकृष्ण वामन कुलकर्णी यांनी ही महाकाय पंचधातूची घंटा काशीक्षेत्री बनवून श्रीना अर्पण केल्याचे समजते. या घंटेचा नाद  दोन-तीन मलापर्यंत पसरत असे. ही घंटा शीतल प्रसाद व विश्व्ोश्वर या सिद्धहस्त कारागिरांनी बनविली आहे. सध्या धातूच्या लोलकाजागी लाकडाची बसविली आहे. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेरून अष्टकोनी गणेश यंत्र आहे. गाभाऱ्यात वर दगडी पाकळ्यांनी शोभा  आली आहे. सरोवराच्या काठाला दगडी घाट बांधला असून मंदिर प्रवेश करून मग पूजा संपन्न होते. मंदिरात अखंड नंदादीपाची सोय केली आहे. मंदिरात  देवाला भाविक कमळे वाहतात. भाद्रपद व माघ शुद्ध चतुर्थीस  देवाचा मोठा जन्मोत्सव होतो. कार्तिक पौर्णिमेस मोठी यात्रा भरते. कार्तिकस्वामी गणेशाच्या भेटीस येत असल्याची भक्तांची भावना आहे. अंगारकी चतुर्थी विशेष मानली  जाते.

मंदिरातील दोन्ही मूर्तीच्या उत्पत्तीमागे पौराणिक कथा निगडित आहेत. गणेश पुराणानुसार श्रीगणेशाची कृपा झाल्याचे पौराणिक संदर्भ दिले जातात. त्यापैकी एका कथेनुसार कृतवीर्य राजाने संतान प्राप्तीसाठी खडतर  संकट चतुर्थी व्रत केले. त्यावेळी त्याच्या सुगंध नावाच्या पत्नीस हात व पायविरहित अपंग पुत्राची प्राप्ती झाली. सर्वजण त्यामुळे खूप दु:खी झाले. त्याच्या हुशार प्रधानाने राजाची समजूत घालून मुलाचे जात कर्मादी कार्ये करवून त्याचे कार्तवीर्य व अर्जुन असे  नामकरण केले. या स्थितीत त्याने १२ वर्षे काढली. एकदा प्रत्यक्ष श्री दत्त महाराज मुलाला पाहण्यास आले. त्यांनी दोष नाशासाठी गणेशाचा षडाक्षरी जप करण्यास सांगितले. तदनुसार घोर अरण्यात पर्णकुटीत राहून तो जप करू लागला. खडतर तपाने श्री गणेश प्रकट झाले. त्यांच्या कृपेने मुलास हजार हातांचे बळ व पाय प्राप्त झाले, असे सांगितले जाते. सहस्त्रार्जुनाने या पवित्र क्षेत्री प्रवाळ गणेशाची स्थापना केली. तोच हा विद्रमेस गणेश म्हणजेच प्रवाळ गणेश होय. असे मानले जाते की कैलासावर शंकर-पार्वतीसह विश्रांती घेत होते. सारे देवगण शंकराचे दर्शन घेत असतानाच शेषाला श्रेष्ठ असल्याचा गर्व झाल्याचे पाहून शंकर रागाने उभे राहिले. लगेच शेष धरणीवर कोसळला. त्याचे मस्तक बऱ्याच ठिकाणी फाटल्याने वेदनांनी तो बेजार झाला. त्यापासून मुक्त होण्यासाठी नारदमुनींनी त्यास गणेशचा मंत्र दिला. हजारो वर्षे तप  केल्यावर गणेशाने त्यास विराट स्वरूपात दर्शन देऊन तो दोषमुक्त झाला. पुन शंकराने त्यास धारण केले. पुढे याच पवित्र ठिकाणी शेषाने धरणीधर गणेशाची स्थापना केली.

या स्थानापासून थोडय़ाच अंतरावर भीमकुंड असून तेथे भीम व बकासुर युद्ध झाले, असे मानतात. आजही तेथे सफेद व लाल दगडी खुणा दिसतात. पावसाळा व हिवाळा या ठिकाणी जाण्यास योग्य काळ आहे. येथे  रेल्वेने जायचे झाल्यास मध्य रेल्वेच्या जळगाव व भुसावळदरम्यान असलेल्या म्हसावद या छोटय़ा स्थानकावर उतरून रिक्षा, टांगा व आदी खासगी वाहनाने यावे. विशेष प्रसंगी एरंडोलहून एसटीच्या जादा गाडय़ा सोडल्या जातात. तेथे राहायची सोय आहे.

response.lokprabha@expressindia.com