मागील वर्षी जगभरात झालेल्या एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी ५९ टक्के हल्ले हे केवळ पाच आशियाई देशांमध्ये झाल्याचे अमेरिकेच्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या पाच देशांमध्ये भारत व पाकिस्तानसह अफगाणिस्तान, इराक आणि फिलिपिन्सचा समावेश आहे.

सलग दुसऱ्या वर्षी भारत दहशतवादाची झळ बसणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. इराक आणि अफगाणिस्थान अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ही आकडेवारी जाहीर केली आहे. २०१५ मध्ये दहशतवादग्रस्त देशांच्या यादीत पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेकडून धोकादायक दहशतवादी संघटनांचीही यादी तयार करण्यात आली आहे. जगातील दहशतवादी संघटनांचा विचार केल्यास इस्लामिक स्टेट (आयएस), तालिबान, अल-शबाब यांच्यानंतर सीपीआय-माओवादी संघटना चौथ्या स्थानी आहे. भारतामध्ये ५३ टक्के हल्ले हे सीपीआय-माओवादी या अंतरग्त संघटनाकडून होतात.

२०१७ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर दहशतवादी हल्यामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संखेत तब्बल ८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  २०१७ मध्ये भारतात एकूण ८६० दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामधील २५ टक्के दहशतवदी हल्ले एकट्या जम्मू काश्मीरमध्ये झाले आहेत. अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने अहवालात दिली आहे.

सन २०१७मध्ये भारतातील जम्मू काश्मीर, ईशान्येकडील राज्ये यांना दहशतवादाची झळ बसली आणि मध्य भारतात माओवाद्यांच्या हिंसाचाराचा फटका बसला, असा उल्लेख अहवालात आहे. आपल्या सीमेच्या आत दहशतवादी शोधणे, त्यांचा बीमोड करणे आणि दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्याचे भारताचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

‘ भारतामध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची योजना पाकिस्तानमधून आखली जाते. आणि या हल्ल्यांना पाकिस्तानचा पाठिंबा असतो. पाक यंत्रणा आणि त्यांचं लष्कर या हल्ल्यांना प्रोत्साहन देतं. मात्र पाकिस्तानमध्ये होणाऱ्या हल्ल्यांमध्ये भारताचा हात नसतो.’असं भारतीय लष्करातील एका अधिकाऱ्यानं म्हटलं.