पहिल्याच दिवशी ठाण्यातील अंतर्गत रस्ते वाहतुकीवर ताण

ठाणे : 

ठाणे आणि घोडबंदर भागातील महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामांमुळे गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीला तोंड देणाऱ्या ठाणेकरांना सोमवारी शहराच्या अंतर्गत रस्त्यांवरही कोंडीला सामोरे जावे लागले. ठाणे शहरातील बहुतांश शाळा सोमवारपासून सुरू झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसगाडय़ा रस्त्यावर उतरल्या. त्यामुळे शहराच्या अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्याला सोडण्यासाठी खासगी वाहनाने आले होते. त्यामुळे शाळांच्या परिसरातील रस्त्यांवर शालेय बस आणि पालकांची वाहने यांची गर्दी झाली परिणामी वागळे इस्टेट परिसर, यशोधननगर, सावरकरनगर, ज्ञानेश्वर नगर, हरिनिवास, वसंतविहार, जांभळी नाका, चरई, राम मारुती मार्ग, उथळसर, कॅसल मिल परिसर, वर्तकनगर, मासुंदा तलाव आणि खोपट या भागात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. सकाळचे सत्र सुरू झाल्यानंतर ही वर्दळ कमी झाली. परंतु, दुपारी पुन्हा शालेय बसगाडय़ा रस्त्यावर आल्याने वाहतुकीला फटका बसला.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरात तसेच नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना रात्री ११ ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते ४ या वेळेत अवजड वाहनांना ठाणे तसेच घोडबंदर भागातील महामार्गावरून प्रवेश दिला जातो. शहरातील महामार्गावरील चौकांसह अंतर्गत मार्गावर शालेय बसगाडय़ांमुळे कोंडी झाली होती. त्याच वेळेस शहरातील महामार्गावरून अवजड वाहतूक सुरू झाली. यामुळे कापुरबावडी, माजिवाडा तसेच घोडबंदर भागात कोंडी झाली. ठाणे शहरातील वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला.

‘आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शालेय वाहतूक करणारी वाहने मोठय़ा संख्येने रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी झाली. ही वाहने शहरातील अंतर्गत मार्गावर अनेक ठिकाणी थांबे घेत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याची बाब निदर्शनास आली आहे,’ अशी माहिती वागळे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली. पालकांनी आणि शाळा प्रशासनाने परिसरात शालेय बससाठी एकच थांबा निश्चित केला पाहिजे. जेणेकरून वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. त्यासाठी शाळा प्रशासन आणि पालकांची एक बैठक घेतली जाणार आहे, असेही ते म्हणाले.

कल्याण-बदलापूर रस्त्यावर वाहनांच्या रांगा

अंबरनाथ : रुंदीकरण रखडलेल्या कल्याण-बदलापूर रस्त्यावरील अंबरनाथ मटका चौक ते शास्त्री विद्यालयापर्यंतच्या मार्गावर सोमवारी अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. सोमवारपासून शाळा सुरू झाल्यामुळे शालेय बसगाडय़ा रस्त्यावर आल्या आणि त्यामुळे ही कोंडी झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. त्यात बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर पडली. दुपारी बारा ते एक या वेळेत ही कोंडी झाली होती.

कल्याण-बदलापूर रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळाला असला तरी पावसाळ्यामुळे त्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. त्यात कल्याण-बदलापूर रस्त्यावर अंबरनाथच्या मटका चौक ते अंबरनाथ पोलीस ठाण्यापर्यंत वाहतूक नियोजनासाठी तात्पुरत्या स्वरूपात दुभाजक लावण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी ते काढण्यात आले. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढली आहे. त्याचा फटका शहरातील शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी बसला. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास मटका चौक ते शास्त्री विद्यालयापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या समोरील चौकातून वांद्रपाडा, कोहोजगाव, खुंटवली भागात जाणाऱ्या रस्त्यावर विविध शाळा आहेत.  शाळा सुरू झाल्याने या रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसगाडय़ा मोठय़ा संख्येने आल्या. तसेच नगरपालिका मुख्यालयासमोर असलेल्या महात्मा गांधी विद्यालय आणि मटका चौक परिसरात उड्डाणपुलामुळे मोठी कोंडी झाली होती. याबाबत वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांना विचारले असता, शाळेची वाहने आणि बेशिस्त वाहनचालक यामुळे ही कोंडी झाल्याचे त्यांनी सांगितले.