नागपूर : महिनाभरापूर्वी पोलिसांत तक्रार दिली म्हणून एकाच्या खुनाचा पाच ते सहा जणांनी मिळून एकाच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली.

तेजस साहेबराव बागडे (१९), अनिकेत अनिल राचलवार, प्रवीण श्यामराव गुरनुले (१९) आणि ज्ञानेश्वर विजयराव बेसू (२२) सर्व रा. शिवाजीनगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर शोएब मलिक आणि बॉबी मलिक हे फरार आहेत.

गौरव लक्ष्मणराव नागपुरे (२२) रा. शिवाजीनगर असे फिर्यादीचे नाव आहे. आरोपी व फिर्यादी एकच वस्तीत राहतात. महिनाभरापूर्वी आरोपी हे गौरवकडे एकटक बघत होते. त्यावेळी गौरवने त्यांना हटकले असता आरोपींनी त्याला मारहाण केली होती. त्या प्रकरणी त्याने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. तेजस बागडे काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटला, तर त्याचा एक मित्र अद्याप कारागृहात आहे. महिनाभरापूर्वी आपल्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याची हिंमत कशी झाली, म्हणून सर्व आरोपींनी रविवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास गौरवला परिसरातील सुलभ शौचालयाजवळ घेरले. त्या ठिकाणी त्याच्यावर चाकूने वार केला. खून करण्याच्या उद्देशाने पोटात चाकू भोसकला व आरोपी पळून गेले. गौरवला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक नरेंद्र निसवाडे यांनी चार आरोपींना अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.