करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा एक मे पासून सुरु होत आहे. या लसीकरण मोहिमेमध्ये लस घेण्यासाठी  कोविन पोर्टलच्या माध्यमातून दोन दिवसांमध्ये २ कोटी २८ लाख भारतीयांनी नोंदणी केली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. देशभरात एकूण १५ कोटी २१ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचेही मंत्रालयाने सांगितलं आहे. २८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजल्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. म्हणजेच केवळ ५३ तास ३० मिनिटांमध्ये २ कोटी २८ लाखांहून अधिक जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केलीय.

समजून घ्या : Cowin वरुन लसीकरणासाठी कशापद्धतीने करायचं रजिस्ट्रेशन

“आज दिवसभरात देशात २० लाख जणांचे लसीकरण करण्यात आलं. हा आकडा सायंकाळी आठ वाजेपर्यंतच आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी कोविन पोर्टलवरुन २ कोटी २८ लाख लोकांनी दोन दिवसात नोंदणी केली आहे. रात्री साडेनऊ वाजेपर्यंतच्या माहितीनुसार २ कोटी २८ लाख ९९ हजार १५७ जणांनी करोना लसीकरणासाठी कोविन पोर्टलवरुन नोंदणी केलीय,” असं मंत्रालयाने गुरुवारी रात्री जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

रात्री आठ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार १५ कोटी २१ लाख पाच हजार ५६३ जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आल्याचा उल्लेख या पत्रकात आहे. “यापैकी ९३ लाख ८३ हजार ६७६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ६१ लाख ८९ हजार ६३५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्याचप्रमाणे पहिल्या फळीत काम करणाऱ्या १ कोटी २४ लाख १२ हजार ९०४ करोनायोद्ध्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या पहिल्या फळीतील करोनायोद्धांची संख्या ६७ लाख चार हजार १९३ इतकी आहे. ४५ ते ६० वयोगटातील ५ कोटी १७ लाख २३ हजार ६०७ जणांनी लसीचा पहिला डोस घेतलायत. तर याच वयोगटातील ३४ लाख २ हजार ४९ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. ६० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या ५ कोटी १८ लाख ७२ हजार ५०३ जणांनी लसीचा पहिला तर १ कोटी ४ लाख १४ हजार ९९६ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत,” असं या पत्रकात म्हटलं आहे.

गुरुवारी दिवसभरामध्ये २० लाख ८४ हजार ९३१ जणांचे देशात लसीकरण करण्यात आलं. मागील १४० दिवसांपासून लसीकरण सुरु आहे असंही मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.