आंध्र प्रदेशातील राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. तेलगू देशम पार्टीचे चंद्रबाबू नायडू यांनी वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.  नायडू यांनी ” जगन मोहन हटाव- आंध्र बचाव” ही नवी घोषणा दिली आहे. चंद्राबाबू नायडू, सरकारवर टीका करताना म्हणाले की” इथल्या सरकारने असह्य कर लावून आंध्र प्रदेशातील लोकांची लूट केली आहे. सर्वांगीण विकासाचे गाजर दाखवून त्यांचा विश्वासघात केला आहे.  

महानाडू संकल्प संमेलन

७२ वर्षीय माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशातील ओंगोल येथे दोन दिवसीय टीडीपी ‘महानाडू’ हे पक्षाचे वार्षिक संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात बोलताना त्यांनी जगनमोहन सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. ते पुढे म्हणाले जगन मोहन यांच्या पक्षात सर्वात जास्त भ्रष्ट नेते असून त्यांना यापुढे राज्य करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी केलेले लोककल्याणकारी दावे फसवे असल्याचे आता स्पष्ट होत आहे. 

जगन मोहन रेड्डी यांनी राजकारण सोडले नाही तर आंध्र प्रदेशातील लोकांना पुन्हा आनंदाचे दिवस दिसणार नाहीत असे म्हणत त्यांनी ” जगन मोहन हटाव, आंध्र प्रदेश बचाव” ही घोषणा दिली. राज्याला विनाशापासून वाचवायचे असेल तर एकजुटीने “जगन हटाव” ची घोषणा अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले की त्यांचे सरकार असताना ५२% निधी हा लोक कल्याणकारी योजनांनावर खर्च केला होता. आता जगन मोहन यांचे सरकार केवळ ४१% निधी लोककल्याण योजनांवर खर्च करत आहेत. ” आण्णा कँटीन, विदेशी विद्या, पेल्ली कनुका, संक्रांती कनुका या आणि अशा अनेक योजना आम्ही सुरू केल्या आहेत त्याचे श्रेय जगन मोहन यांचे सरकार कसे घेऊ शकते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

आर्थिक वस्तुस्थिती जाहीर करा

राज्य सरकारने राज्याच्या अर्थव्यवस्थेची वस्तुस्थिती काय आहे ते जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्याचा सर्व महसूल जातो कुठे? याचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल असा सवाल चंद्रबाबू नायडू यांनी विचारला आहे. २०१९ मध्ये निवडणुकीत पराभव झाल्यानंतर टीडीपीने ‘ महानाडू’ या संमेलनाचे आयोजन केले होते. यानंतर २०२० आणि २०२१ मध्ये कोविडच्या साथीमुळे नायडू यांनी कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला होता.