08 August 2020

News Flash

मी कवितेचा साजण रे!

कवी डॉ. घनश्याम बोरकर यांच्या ‘खेळिया’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आज ‘ग्रंथाली’तर्फे मुंबई येथे होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

कवी डॉ. घनश्याम बोरकर यांच्या ‘खेळिया’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आज ‘ग्रंथाली’तर्फे मुंबई येथे होत आहे. त्यानिमित्ताने डॉ. बोरकर यांच्या ‘हद्गता’तील कवितेसंबंधीचे मुक्तचिंतन..

आचार्य अत्रे म्हणाले होते की, उगीच काहीतरी खरडून प्रसिद्ध करण्यापेक्षा या जगात वाचण्यासारखे उत्तमोत्तम साहित्य आहे, त्याच्या वाचनात वेळ घालवावा. मराठी, हिंदी, कोंकणी, बंगाली, इंग्रजी व संस्कृत या भाषांमधील आणि या भाषांत अनुवादित झालेल्या असामान्य प्रतिभेच्या साहित्यिकांच्या अनेक अप्रतिम साहित्यकृतींचे आणि कवितांचे वाचन माझ्याकडून घडले आहे. त्यामुळेच आपल्या कविता प्रसिद्ध होऊ नयेत, असे मला मनापासून वाटत होते. पण तरीही ‘यदृच्छेने’ आता ‘खेळिया’ हा माझा कवितासंग्रह प्रकाशित होत आहे.

खरा कवीचा पिंड असलेला माणूस कधीच मुद्दाम कविता करीत नाही आणि लिहीतही नाही. माझे काका, कविवर्य बा. भ. बोरकर म्हणत, ‘‘मी कविता मुद्दाम लिहिलीही नाही आणि केलीही नाही. स्त्रियांना जशी मुले होतात तशी मला कविता येते किंवा होते.’’ कविवर्य आरती प्रभू काव्यप्रतिभेबद्दल आपल्या कवितेत म्हणतात,

‘ती येते आणिक जाते

येताना कळ्या आणिते

जाताना फुले मागते’

कविता म्हणजे काय आणि ती कशी निर्माण होते, याविषयी सांगताना महान कवी वर्डस्वर्थने म्हटले आहे, ‘Poetry is the sponteneous overflow of powerful emotions, recollected in tranquility.’

आपल्या भारतीय परंपरेत आपणास ज्ञात असलेला पहिला महान कवी म्हणजे- वाल्मीकी! क्रौंच पक्षिणीचा आक्रोश पाहून वाल्मीकीच्या मुखातून त्या निषादाला उद्देशून जो शाप निघाला, त्याचाच श्लोक झाला-

‘मा निषाद प्रतिष्ठां त्वां अगम शाश्वती समा:

क्रौंच मिथुनादेकम् अवधी काममोहितम्।’

इथे भावना आणि त्यांचे स्मरण असा कवितेचा प्रकार न होता, भावनेच्या तीव्र संवेगाच्या उत्स्फूर्त उद्गारातून आमच्या भारतीय परंपरेतील कविता प्रकट होते. कविता निर्मितीच्या या प्रक्रियेत भावनेच्या उद्रेकाचे कवितेत रूपांतर होण्यातला काळ हा जवळजळ लुप्त झालेला दिसतो. भावनेचा आवेग आणि कवितेचे उद्गार यामधला कालावधी हा कधी तत्क्षणी होतो, तर कधी तो सुप्तावस्थेत, गुप्तावस्थेत वा प्रदीर्घ असा असू शकतो. ‘निर्मिती’ नावाच्या माझ्या एका कवितेत माझ्याकडून असे उद्गार निघाले आहेत,

‘स्रोतात ऊर्मीच्या कैसे हे दिगंबराचे न्हाणे

मी तुझ्यात विरूनी जाणे, मी मलाच विसरूनि जाणे।’

माझा स्वत:चा अनुभव असा आहे, की जेव्हा तुम्हाला कविता होत असते तेव्हा तुम्ही स्वत:चेच राहिलेले नसता. कवितेच्या ओळी जेव्हा तुमच्याकडे येत असतात तेव्हा स्थळ-काळाचे भान राहिलेले नसते.

मनातील भावातून कविता उमटणे हे भावाची तीव्रता, कवीची काव्यसाधनेतील तयारी, त्याची तपश्चर्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रतिभेच्या दिव्य किरणांनी कवीच्या अंतरात्म्याला मुखरित करण्यावर अवलंबून असते. म्हणूनच कविता का, कशी आणि कुठे प्रकट होईल, हे कवींनाही सांगता आलेले नाही. कवीला कवितेसाठी कोणते शब्द सुचावेत, उपमा-उत्प्रेक्षा सुचाव्यात किंवा कोणत्या प्रतिमांची चित्रे आणि भावनांचा रस साकार व्हावा, हे त्या कवीच्या चित्तसंस्कारावर आणि चित्तप्रसादावर अवलंबून असते.

मला तरी असे वाटते, की माणसाच्या चित्तावर जन्मापासूनच अनेक प्रकारचे संस्कार होत असतात आणि काही गतजन्मीच्या अनुभूतींचेही असू शकतात. माणसाचे चित्त म्हणजे एक महाप्रचंड गुहा. त्या प्रचंड गुहेत पुन्हा शेकडो गुहा. कुठल्या गुहेतून कधी फणा उभारलेले वासनांचे नाग बाहेर येतील, कुठल्या गुहेतून विकारांचे अजगर अक्राळविक्राळ रूप घेऊन प्रकटतील, कुठल्या गुहेतून ज्ञान-विज्ञानाचे शंख-शिंपले आपले सौंदर्य प्रकट करतील आणि कुठल्या गुहेतून विवेकांची हिरे-माणके आपल्या स्वयंभू तेजाने तळपू लागतील, हे स्वतचेच स्वतला माहीत नसते आणि म्हणूनच आधीपासून सांगताही येत नाही.

या अनंत संस्कारांच्या साठवणीतून कुठल्या संस्कारांचे, विचारांचे आणि विकारांचे आपण चिंतन करता किंवा मनन करता, यावर तुमचे चित्तसंस्कार दृढ होण्यास मदत होते. कवीसुद्धा असेच त्याच्या नकळत त्याच्याकडे आलेल्या आणि त्याने स्वत: निवडलेल्या चित्तसंस्कारांनी घडत असतो. अखेरीस याच चित्तसंस्कारांमुळे कवितेच्या भाववृत्तीची जात, प्रत आणि दिशा घडत असते.

आपल्याकडे पूर्वी कवींना मंत्रद्रष्टा असे म्हणायचे. ज्याला मंत्र नुसते ऐकू येत नाहीत तर ते प्रत्यक्ष दिसतात, तो मंत्रद्रष्टा कवी! चित्तसंस्कारांच्या शुचिर्भूततेतून आणि प्रतिभेच्या चित्तप्रसादामुळेच कवी मंत्रद्रष्टा होतो. तनाला तारणारे ते तंत्र आणि मनाला तारणारा तो मंत्र! कविता अशी मनाला तारणारी हवी. रसिकांना जगण्याचा मंत्र देणारी हवी. त्याला भारून टाकणारी हवी. रसिकाचे जीवनातले काही क्षण का होईना, प्रकाशमय करणारी हवी. कवितेतून रसिकाला ‘सत्यम्’, ‘शिवम्’, ‘सुंदरम्’चे किंचित काळ का होईना, दर्शन घडायला हवे.

भगवान पतंजलींच्या अष्टांगयोगात योगाची आठ अंगे सांगितली आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ही बहि:रंग साधने आहेत आणि धारणा, ध्यान, समाधी ही अंतरंग साधने आहेत. कवीलासुद्धा कवितेशी युक्त राहण्यासाठी अशीच बहि:रंग आणि अंतरंगसाधना करावी लागते.

अंतरंग साधनेतूनच कवितेला अभिजातता प्राप्त होते. ‘स्वधम्रे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:’प्रमाणे कवीला सर्वप्रथम आपल्या कवित्विपडाचा शोध घ्यावा लागतो. त्यातूनच त्याची कवितेविषयीची स्वत:ची धारणा आणि धर्म ठरतो. एखाद्या भावप्रत्ययाशी त्या धारणेतून एकतानता पावणे हेच कवीचे ध्यान असते.. प्रत्ययकतानता ध्यानम्! यापुढची अवस्था असते कवीची समाधी लागणे. काव्यभावाच्या आणि रसाच्या आनंदात कवी इतका डुंबून जातो, की मग काही क्षण स्थळ-काळाचे आणि स्वत:चेही भान त्याला राहत नाही. अशा भावसमाधीच्या अवस्थेत, प्रतिभेच्या दिव्य किरणांनी त्याच्या अंतरंगात प्रवेश केला, तर मग त्या क्षणी कवीच्या वाणीतून जे उद्गार निघतात, त्यांची एक सुंदर कविता होते. अशी कविताच मंत्रमयी होते. म्हणजेच कवीने कवित्वशक्तीच्या प्राप्तीसाठी कितीही बहि:रंग आणि अंतरंग साधना केली तरी प्रतिभेचा प्रसाद मिळाल्याशिवाय अभिजात कवितेची निर्मिती होऊ शकत नाही.

कवितेच्या बारूपापेक्षा मी नेहमीच तिच्या अंतरंगावर प्रेम करीत आलो. कवितेतील शब्दकळा आणि रचनाचातुर्य यापेक्षा तिचे भावसौंदर्य माझ्या मनाला अधिक आनंद देते. ‘चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा’ याची एकदा अनुभूती आली, की कवितेतील भावसौंदर्य, आत्मसौंदर्य हे तुमच्याही अंत:करणात उदयाला येते.

कवितेत जर हे आत्मिक सौंदर्य प्रकट व्हायला हवे असेल तर खऱ्या कवीला हे सौंदर्य आपल्या अंतरंगात शोधावे लागते. आपल्याच मनातील भावभावनांना ‘सुंदरतेच्या सुमनावरचे दंव चुंबून’ घ्यावे लागते. कारण कवितेचा जन्म हा भावनेतून होत असतो, बुद्धीतून नाही. या परमअर्थाने भावना हीच कवितेची जननी असते.

म्हणूनच अभिजात कवितेच्या निर्मितीसाठी कवीला योग्य ते चित्तसंस्कार निवडावे लागतात आणि अंतरंगातील भावसौंदर्याचे अखंड उन्नयन करीत अंतरंगसाधना करावी लागते. परंतु तरीही प्रतिभेच्या कृपेशिवाय, तिच्याकडून चित्तप्रसाद मिळाल्याशिवाय कविता स्फुरत नाही हे कवीला जाणवते. त्याला समजून चुकते, की कविता हे आपल्या अहंकृत प्रयत्नांचे फळ नव्हे. भावाचे तादात्म्य कवितेतून प्रकट होण्यात आपल्या कर्तृत्वाचे स्थान नगण्य आहे, हे त्याचे त्यालाच समजते वा समजले पाहिजे. ‘मी’ कवितेला निवडले नसून ‘कविते’ने मला निवडले आहे याचा प्रत्यय त्याला येऊ लागतो. ‘काय म्यां पामरे बोलावी उत्तरे, परी विश्वंभरे बोलवली’ ही जाणीव होऊन कवीचा उरलासुरला अहंकार गळून पडतो. शारदेबद्दल असीम कृतज्ञतेचा भाव दाटून येतो.

शारदेच्या अस्तित्वाची त्याला प्रचीती येते. शारदा किंवा सरस्वती म्हणजे काव्य-संगीताची उद्गात्री देवता! शब्द, स्वर, भाव, रस या सगळ्या शक्तींच्या अनंत साठय़ाचे प्रतीक! शारदा म्हणजे शब्दसृष्टीचा सागर, रसवृष्टीचे आगर! शारदा म्हणजे भावाचे चिदाकाश, स्वरांचे लयाकाश! शारदा म्हणजे ऊर्मीचा चिरंतन मूल स्रोत! शारदा म्हणजे उत्स्फूर्ततेचा मंत्रघोष आणि ऊर्जेचा अक्षय, अखंड कोष! कवीच्या अंतरंगसाधनेतून त्याला या शारदेचे अस्पष्ट, अंधुक का होईना, दर्शन घडू लागते.

म्हणूनच मला सदैव असे जाणवत राहिले आहे, की काव्यसंबंधातील अंतरंगसाधना ही एक प्रकारची आध्यात्मिक साधनाच आहे. हा कवीचा अंतरंगातील प्रवास आहे. स्वत:मधल्या कवीला जाणिवेपासून नेणिवेपर्यंत नेणारी ही अंतर्यात्रा आहे. व्यक्ताकडून अव्यक्ताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, आकारातून निराकाराकडे कवीला घेऊन जाणारी ही एक शुभंकर, अनंत अशी अंतर्वाट आहे. काव्यसाधना ही म्हणूनच एका विलक्षण अर्थाने अज्ञाताचा शोध आहे. आत्मशोधाची साधना आहे व आत्मबोधाचीही. ही आत्माविष्काराचीही साधना आहे आणि आत्मविस्ताराचीही. काव्यसाधना ही म्हणूनच आध्यात्मिक, अनंताची साधना आहे.

‘निर्विचार वैशारद्ये अध्यात्मप्रसाद:।

ऋतंभरा तत्र प्रज्ञा।’

अशी ऋतंभरा प्रज्ञा आपल्याला प्राप्त व्हावी आणि अशी प्रज्ञेने पावन झालेली कविता आपल्या परावाणीतून स्फुरावी हीच कुठल्याही कवीची प्रार्थना असायला हवी.

कलाकाराच्या वा कवीच्या अंतरंगात, विचारांत ही निर्मितीची बीजे येतात कुठून, हा प्रश्न मला नेहमीच अचंबित करीत आला आहे. गझलचा बादशाह गालिबचा यावर एक सुंदर शेर आहे –

‘आते हैं गैबसे ये मज़ामीं खयालमें

ग़ालिब सरीरेखामा नवा-ए-सरोश है।’

गालिब त्याच्या कवित्वशक्तीचे श्रेय स्वत:कडे घेत नाही. तो म्हणतो, ही निर्मितीची बीजे माझ्या ‘खयालमें’ अनंताकडून, अज्ञात ठिकाणाहून (गैब) येतात. तो म्हणतो, तुम्ही जी गालिबची गझल ऐकता तो म्हणजे त्या सरोशचा, स्वप्नात ज्याने कुराण सांगितले त्या देवदूताचा आवाज आहे. तो बोरुच्या (खामा) कुरकुरीतून, आवाजातून (सरीर) तुम्हाला ऐकू येत आहे.

ही अज्ञाताची हाक, ही साद, हा आवाज ज्या कवीला ऐकू येतो आणि त्याच्या कवितेतून मुखरित होतो, तो खरा प्रतिभावंत कवी, प्रज्ञावंत कवी. बाकीचे माझ्यासारखे इतर सामान्य कवी म्हणजे ‘म्हणोनी काय कुणी चालावेचि ना’ या जातीचे!

सुदैवाने माझ्या कवितेतील प्रतिभेचा स्तर, शब्दकळेची प्रत, रचनांचे आकृतिबंध यातील मर्यादा मला उमगलेल्या आहेत. माझ्या कवितेतील दोष, त्रुटी, उणिवा तसेच बलस्थाने यांचेही मी वस्तुनिष्ठतेने मूल्यमापन केले आहे. परंतु तरीही, स्वरांनी आणि कवितेने मला गेली ५०-५५ वष्रे अखंड आणि अतूट सोबत दिली आहे. मी त्यांचा अनुनय न करताही, त्यांनी माझ्यावर प्रेम केले आहे. कविता आणि संगीत हे दोन्ही एक प्रकारची प्रकाशदायी, आनंददायी ऊर्जा बनून माझ्या जीवनात रुजल्या. कवितेने आणि संगीताने मला आजन्म आनंद दिला. फक्त निभ्रेळ आनंद. शब्द आणि स्वरांच्या असीम अवकाशात विहरण्याचा आनंद. वासनांच्या उत्सर्गाचा आनंद. विकारांच्या विसर्गाचा आनंद. वृत्तींच्या नर्तनाचा, लास्याचा आनंद. मनातील भावनांच्या उन्नयनाचा आनंद. नवरसांच्या परिपोषाचा आनंद. नादाच्या गुंजनाचा आनंद. लयतालाच्या अद्भुत क्रीडेचा आनंद. चित्ताच्या शुचिर्भूततेचा आनंद. मनात दाटून आलेली कृतज्ञता व्यक्त होण्यातला आनंद. विश्वकरुणेने डोळ्यांतून पाझरणाऱ्या अश्रूंचा आनंद. विश्वात्मक विश्वेश्वराच्या स्मरणाचा आनंद आणि सगळ्यात विलोभनीय व दैवी असा ईश्वरी वंशातील निर्मितीक्षमतेचा अंश आपल्यातही आहे या शुभंकर, मंगल जाणिवेचा आनंद!

कविता आणि संगीताने, माझ्या आयुष्यात जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये मला अहोरात्र साथ देऊन आनंद तर दिलाच; पण क्वचित कधीतरी अवचितपणे ‘तुरीयावस्थे’तील आनंदाचीही अनुभूती दिली. द्वैत, विशिष्टाद्वैत आणि अद्वैताच्या क्रीडांगणातील, स्वतच्याच स्वतशी चाललेल्या खेळातील निगूढ क्रीडेच्या अर्थगर्भतेचा आनंदही मला कविता आणि संगीतानेच प्रदान केला. मानवी जीवनातील मूलभूत, तलस्पर्शी प्रश्नांना भिडण्याच्या प्रेरणेतला आनंदही मला कवितेनेच दिला. मला तरी असे वाटते, की माझ्या आयुष्यातील परिपूर्णतेच्या तीर्थक्षेत्राकडे जाणारी दुर्गम वाट, कविता आणि संगीताच्या चांदण्यानेच प्रकाशमय होत राहिली आहे, उजळत राहिली आहे.

म्हणूनच कवितेचे आणि संगीताचे माझ्यावर अपरंपार ऋण आहे. ‘कविता-स्वर माझे सोयरे सांगाती’ ही माझी दृढ भावना आहे. आणि म्हणूनच माझी कविता कशीही असली तरी मी तिच्या ऋणातही आहे आणि प्रेमातही

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 12:22 am

Web Title: article about granthali upcoming poetry collection book
Next Stories
1 स्वसंवादाचा वेलू
2 स्त्रियांच्या विचारक्षमतेचा पट
3 नटाचे नटत्व
Just Now!
X