19 February 2020

News Flash

थरार आणि मनोरंजन

एकंदरीत २०१६ चा तिसरा शुक्रवार बॉलीवूडला हवा असलेला सुपरडूपर हिट शुक्रवार ठरू शकेल.

नवीन वर्षांचा पहिला शुक्रवार सिनेमाच्या दृष्टीने कोरडाच गेला. सर्वसाधारणपणे नववर्षांच्या पहिल्या शुक्रवारी गेल्या दोन वर्षांत ‘जो भी करवालो’,  ‘टेक इट ईझी’, ‘मुंबई कॅन डान्स साला’ असे चित्रपट प्रदर्शित झाले होते. नाताळची सुट्टी आणि नववर्ष पूर्वसंध्येची धमाल संपल्यानंतर नोकरी-व्यवसायात लोक नव्या हुरूपाने कामाला लागतात. त्यामुळे पहिल्या शुक्रवारी चित्रपट पाहायला प्रेक्षक गर्दी करणार नाहीत, असे बॉलीवूडवाल्यांना वाटत असावे. म्हणूनच दुय्यम कलावंत, नवीन कलावंत तसेच नवीन दिग्दर्शक आणि ‘हटके’ विषय यांवरील चित्रपट वर्षांच्या पहिल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेले दिसतात. परंतु, यंदा २०१६ च्या पहिल्या शुक्रवारी एकही हिंदी आणि मराठी चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. ५२ शुक्रवारांपैकी पहिलाच शुक्रवार कोरडाच जावा याचे कारण यंदा १ जानेवारीलाच शुक्रवार होता असेही असू शकते. आता ‘वझीर’ हा बिगबजेट, बडय़ा कलावंतांचा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी ‘बॉलीवूड ब्लॉकबस्टर’च्या यादीतला मात्र तो नाही. त्यामुळे बिगबजेट, बडय़ा कलावंतांचा आणि किमान अडीच तास कालावधीचा आणि महत्त्वाचे म्हणजे बॉलीवूडच्या दुनियेला अपेक्षित अशा कोटीच्या कोटी उड्डाणे पार करणाऱ्या गल्लाभरू चित्रपटासाठी नववर्षांच्या तिसऱ्या शुक्रवारची वाट पाहावी लागणार आहे. बॉलीवूडच्या पहिल्या फळीतील सुपरहिट कलावंतांपैकी एक असलेला अक्षयकुमार याचा ‘एअरलिफ्ट’ हा चित्रपट यंदाच्या वर्षीचा सुपरडूपर हिटचा फलक झळकावण्याची शक्यता आहे. अक्षयकुमारचा प्रचंड चाहतावर्ग हे एक कारण अशी शक्यता वर्तविण्यास कारणीभूत ठरत असले तरी या आगामी चित्रपटाचा विषय हेही एक कारण ठरू शकेल. १९९० साली इराकने कुवैतवर आक्रमण केले होते. त्या वेळी कुवैतमध्ये राहणारे तब्बल १ लाख ७० हजार भारतीय लोक बेघर झाले. तेव्हा त्यांना विमानाने भारतात आणण्याची प्रक्रिया एअर इंडिया नागरी विमानसेवांद्वारे करण्यात आली. युद्धजन्य परिस्थितीत अशा प्रकारे नागरी विमानांनी भारतीय लोकांना सुरक्षित मायदेशी घेऊन येण्याचे हे ‘ऑपरेशन’ याची नोंद गिनीज बुकात करण्यात आली आहे. आतापर्यंत इतक्या मोठय़ा संख्येने लोकांना स्थलांतरित करण्याची ती घटना ठरली. यावरच ‘एअरलिफ्ट’ हा सिनेमा आधारित आहे. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अक्षयकुमार आणि पूरब कोहली यांनी अरबी भाषा शिकून घेतली आहे. ‘लंचबॉक्स’ या चित्रपटातून दिसलेली निम्रत कौर अक्षय कुमारची नायिका म्हणून झळकणार असून ‘फिल्मिस्तान’ या चित्रपटाद्वारे झळकलेला उत्तम अभिनेता इनाम उल हक हाही यात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील शहर तसेच राजस्थानमध्ये बहुतांशी चित्रीकरण झालेल्या या सिनेमाचे बजेट केवळ ३० कोटी रुपये इतके आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सिनेमाचा वेगळा विषय असल्यामुळे प्रचंड व्यस्त असूनही अक्षय कुमारने या सिनेमात प्रमुख भूमिका करण्याचे ठरविले आणि त्याचबरोबर निर्मितीखर्च आटोपशीर असल्यामुळे अक्षयकुमारने मानधन घेण्याऐवजी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर झालेल्या नफ्यातील वाटा मानधन म्हणून घेण्याचे ठरविले आहे.

२२ जानेवारीलाच ‘एअरलिफ्ट’ या बडय़ा सिनेमासोबत ‘क्या कुल है हम थ्री’ हा एकता कपूर निर्मित चित्रपट तसेच ‘जुगनी’ हा संगीतमय रोमॅण्टिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘क्या कुल है हम थ्री’ हा सेक्स कॉमेडी प्रकारातील चित्रपट असला आणि या सीक्वलचे आधीचे दोन भाग गाजले असले तरी आता त्यांना गल्लापेटीवर अक्षय कुमारच्या चित्रपटाशी स्पर्धा करावी लागणार.

‘क्या कुल है हम थ्री’मध्ये पहिल्या दोन भागांप्रमाणे रितेश देशमुख दिसणार नाही. त्याऐवजी आफताब शिवदासानी असेल. सेक्स कॉमेडी प्रकारातील चित्रपट असल्यामुळे प्रेक्षकवर्ग नक्की लाभणार असला तरी यात रितेश नसल्यामुळे सिनेमाच्या लोकप्रियतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. ‘कॉमेडी सर्कस’फेम कृष्णा अभिषेक हा अभिनेताही यात असून मंदाना करिमी आणि दाक्षिणात्य चित्रपटांची अभिनेत्री मेघना नायडू हे आहेत.

‘जुगनी’ हा चित्रपट अतिशय निराळ्याच विषयावरचा असून शेफाली भूषण या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करतील. ‘माय नेम इज खान’, ‘तेरे बिन लादेन’, ‘जाने तू या जाने ना’ या गाजलेल्या चित्रपटांमधील अभिनेत्री सुगंधा गर्ग ‘जुगनी’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. जुगनी म्हणजेच विभावरी ऊर्फ विब्स ही संगीतकार आहे. एक अलौकिक आणि वैशिष्टय़पूर्ण आवाज असणाऱ्या गायिकेचा शोध घेण्यासाठी ती पंजाबमधील गावात जाते. तिथे तिची भेट एका गायक तरुणाशी होते. या कथेवर चित्रपट बेतलेला आहे.

एकंदरीत २०१६ चा तिसरा शुक्रवार बॉलीवूडला हवा असलेला सुपरडूपर हिट शुक्रवार ठरू शकेल.
सुनील नांदगावकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on January 15, 2016 1:22 am

Web Title: akshay kumar movie airlift
Next Stories
1 सनीचा दिग्दर्शकीय ‘घायल’
2 भावनिक आणि नाटय़पूर्ण ‘वझीर’
3 महोत्सवांत गाजलेला सिनेमा
Just Now!
X