अलीकडे ‘बायोपिक’ अर्थात चरित्रात्मक चित्रपटांची संख्या वाढतेय. आपल्या देशात राजकीय क्षेत्रात गाजलेल्या व्यक्तींवर चित्रपट करण्याची परंपरा पाहायला मिळते. ‘आंधी’ या चित्रपटात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखी दिसणारी राजकीय व्यक्तिरेखा दाखविण्यात आली होती. गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांसारख्या दिग्गज लोकनेत्यांवरील चरित्रात्मक चित्रपटही चांगलेच गाजले. आता महाराष्ट्राचे चौथे आणि प्रदीर्घ काळ मुख्यमंत्रिपदी राहिलेले वसंतराव नाईक यांच्यावरील चरित्रात्मक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, अतिशय अल्पकाळ म्हणजेच केवळ नऊ दिवस केंद्रीय ग्रामीण विकासमंत्रिपद भूषविलेले गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनाची संघर्षयात्रा चितारणारा ‘संघर्षयात्रा’ याच नावाचा चित्रपट ११ डिसेंबर म्हणजेच मुंडे यांच्या दुसऱ्या जयंतीदिनाच्या एक दिवस आधी प्रदर्शित होत आहे.

गोपीनाथ मुंडे यांनी संघर्षयात्रा काढली होती हे सर्वानाच ठाऊक आहे. त्यांचा राजकीय जीवनप्रवास रेखाटणाऱ्या या चित्रपटात वैयक्तिक आयुष्यातील वादळी प्रसंग जे लोकांना माहीत आहेत तेही या चित्रपटात चितारले असण्याची शक्यता आहे.

हिंदीतील अभिनेता शरद केळकर हा गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेत दिसणार असून, श्रुती मराठेने मुंडे यांच्या कन्या व राज्याच्या विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांची भूमिका साकारली आहे. ओमकार कर्वे या कलावंताने प्रमोद महाजन यांची भूमिका साकारली असून, प्रवीण महाजन या भूमिकेत गिरीश परदेशी दिसणार आहे. तर दीप्ती भागवत यांनी मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे यांची, खासदार प्रीतम मुंडे यांची भूमिका प्रीतम कांगणे या अभिनेत्रीने साकारली आहे.

मुंडे यांचा अपघाती मृत्यू, त्यापूर्वी त्यांचे नातेवाईक प्रमोद महाजन यांचा मृत्यू, मुंडे यांचे नाटय़पूर्ण राजकीय-वैयक्तिक आयुष्य, यामुळे या चित्रपटाबद्दल निश्चितच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ओम सिद्धिविनायक मोशन पिक्चर्सचे सूर्यकांत बाजी, राजू बाजी यांनी भाजप चित्रपट शाखेचे संदीप घुगे, मुकुंद कुलकर्णी यांच्यासह चित्रपटाची निर्मिती केली असून, नव्या दमाचा दिग्दर्शक साकार राऊत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

ऊसतोडणी कामगाराचा मुलगा ते राज्याचे उपमुख्यमंत्रिपद, खासदारकी आणि केंद्रातील ग्रामीण विकासमंत्रिपदापर्यंतचा मुंडे यांचा प्रवास यात चितारण्यात आला आहे.

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या चित्रपटातील एक गाणे गायले आहे. त्यांनी गायलेले गाणे प्रथमच सिनेमात येणार असून ते चित्रपटाचे शीर्षकगीत आहे.

विराज मुळे आणि विशाल घारगे यांनी एकत्रितरीत्या ‘संघर्षयात्रा’ चित्रपटाची कथा-पटकथा आणि संवादलेखन केले आहे. हा मजकूर लिहीपर्यंत शरद केळकरचे गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेतील चित्रपटातील छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. प्रदीप पेमगिरीकर यांनी शरद केळकरचा मेकअप करून हुबेहूब गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा तो दिसेल याची काळजी घेतली आहे, असे चित्रपटकर्त्यांनी सांगितले. शीर्षक गीत मंदार चोळकर यांनी लिहिले असून एक पोवाडाही यात आहे. हा पोवाडा शाहीर मोरेश्वर मेश्राम यांनी लिहिला असून अनिरुद्ध-अक्षय या जोडीने संगीत दिले आहे. सनीश जयराज यांनी ‘संघर्षयात्रा’चे छायालेखन केले आहे. मुंडे यांचे ३ जून २०१४ रोजी निधन झाले होते. त्यानंतर अवघ्या दीड वर्षांच्या आतच त्यांच्यावरील चित्रपट येऊ घातला आहे, हेही या चित्रपटाचे आणखी एक विशेष म्हणावे लागेल.

सुनील नांदगावकर – response.lokprabha@expressindia.com