News Flash

महोत्सवांत गाजलेला सिनेमा

चित्रपट समीक्षक असलेले बिकास रंजन मिश्रा यांनी ‘डिअर सिनेमा’ या संकेतस्थळाची स्थापना केली.

भारतात ‘इंडिपेण्डन्ट सिनेमा’ म्हणजेच कोणत्याही मोठय़ा बॅनर, निर्माता, कंपनीच्या छत्रछायेखाली सिनेमा न बनविता स्वतंत्रपणे सिनेमा बनविण्याकडे गेल्या काही वर्षांत दिग्दर्शकांचा कल वाढला आहे. निर्मात्याला शरण जाऊन बाजारपेठेच्या प्रचलित पद्धतीनुसार सिनेमा बनविण्यासाठी आशय-विषय, कलावंत तसेच बऱ्याचदा दिग्दर्शकाच्या कलात्मक स्वातंत्र्यावर बंधन येऊ शकते. त्यामुळे ‘इंडिपेण्डन्ट सिनेमा’ किंवा ‘इंडी सिनेमा’ बनविण्याकडे दिग्दर्शकांचा कल वाढत असून नवे विषय, बडय़ा कलावंतांना न घेता नवोदित पण दमदार कलावंत, मुख्य म्हणजे विषय वैविध्य हिंदी सिनेमामध्ये येऊ लागले आहे. यशराज फिल्म्ससारख्या बडय़ा बॅनरनेही दिग्दर्शकांना स्वातंत्र्य देऊन नवे विषय सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. याच इंडी सिनेमा गटातील असा बिकास रंजन मिश्रा लिखित-दिग्दर्शित ‘चौरंगा’ हा नव्या विषयावरील हिंदी सिनेमा नवीन वर्षांच्या सुरुवातीला प्रदर्शित होतोय.
मूळचे चित्रपट समीक्षक असलेले बिकास रंजन मिश्रा यांनी ‘डिअर सिनेमा’ या संकेतस्थळाची स्थापना केली. ‘इंडी फिल्म’ बनविणाऱ्या स्वत: मिश्रा यांच्यासारख्या गोष्ट सांगण्याची कला अवगत असणाऱ्या परंतु सिनेमा बनविण्यासाठी साधनसंपत्ती नसलेल्या दिग्दर्शकांसाठी या संकेतस्थळाद्वारे सिनेमा बनविण्यासाठी साहाय्यभूत ठरेल अशी माहिती मिश्रा यांनी द्यायला सुरुवात केली. अल्पावधीत हे संकेतस्थळ लोकप्रिय झाले. ‘चौरंगा’ हा बिकास रंजन मिश्रा यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांनी यापूर्वी ‘डान्स ऑफ गणेशा’ हा लघुपट बनविला आहे. हा लघुपट बूसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तसेच रॉटरडॅम चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आला आहे.
‘चौरंगा’ या चित्रपटाची कथा एका गावात घडणारी आहे. संतू हा छोटा मुलगा आपल्या आईसोबत गावात राहतो. त्याच्यापेक्षा २-३ वर्षांनी मोठा असलेला भाऊ बजरंगी शिकण्यासाठी शहराच्या ठिकाणी असतो. आपल्या भावासारखेच संतूलाही शहरात जाऊन शाळेत शिक्षण घ्यायचेय, पण परिस्थितीमुळे ते शक्य नाही. त्याचबरोबर घरातील डुक्कर सांभाळण्याची जबाबदारी संतूवर आहे. संतूची आई ही गावच्या सरपंचाच्या घरी गोठय़ात काम करते. तिचे सरपंचाशी संबंध आहेत. आपल्या धाकटय़ा मुलालाही शिक्षणासाठी सरपंचांनी मदत करावी यासाठी ती प्रयत्न करतेय. पौगंडावस्थेतील संतूचा एकच छंद आहे. गावातील जांभळाच्या झाडावर चढून बसून राहायचे आणि स्कूटरवरून जाणाऱ्या मोनाला न्याहाळत बसायचे. पौगंडावस्थेतील संतूला मोनाचे आकर्षण वाटते. संतूचा भाऊ बजरंगी शाळेला सुट्टी लागल्यावर गावी येतो तेव्हा संतूच्या मनातले तो चटकन ओळखतो. मोनाला प्रेमपत्र लिहून आपल्या भावना कळव असे बजरंगी सांगतो. संतू आणि बजरंगी हे दलित कुटुंबातील आहेत; तर सरपंच, मोना हे उच्च जातीतील आहेत. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या सिनेमात लेखक-दिग्दर्शकाने संतूची प्रेमपत्राची गोष्ट सांगताना आपसूकच गावातील परिस्थिती, जातीची उतरंड या गोष्टी दाखविल्या आहेत.
मात्र दिग्दर्शक बिकास रंजन मिश्रा यांचे ठाम म्हणणे आहे की मला गोष्ट सांगायची होती. मी माझाच शोध घेत असताना माझ्या गावच्या आठवणी मनात आल्या आणि शहरात राहिलो असलो तरी शहरातले घर म्हणजे तात्पुरते वास्तव्य आणि गावातील घर म्हणजे खरे घर असेच मनावर ठसले आहे. त्यामुळे आपसूकच गावच्या परिसरात पाहिलेली, अनुभवलेली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात मुद्दामहून भारतातील जातिव्यवस्था दाखवावी, त्यावर काही भाष्य करावे असे काहीच ठरवले नव्हते. मला सुचलेली, भावलेली गोष्ट पडद्यावर मांडावी इतकेच मनात होते आणि तेच करण्याचा प्रयत्न केला आहे, असे बिकास रंजन मिश्रा यांनी सांगितले. हा चित्रपट ८ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
मामि तसेच लोकॅनरे महोत्सवात त्याचप्रमाणे बर्लिन महोत्सवातील टॅलेण्ट कॅम्पसमध्येही या चित्रपटाची निवड झाली होती.
सुनील नांदगावकर
response.lokprabha@expressindia.com  @suneel2020

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 1:30 am

Web Title: hindi movie review chauranga
Next Stories
1 पुन्हा एकदा ‘दिलवाले’ची धूम
2 मुंडेंची संघर्षयात्रा पडद्यावर
3 सुपरहिट जोडीचा ‘तमाशा’
Just Now!
X