नवीन वर्षांतील हिंदी सिनेमांविषयी मोठे कुतूहल नेहमीच असते. अमिताभ बच्चनने मागील वर्षांत ‘पिकू’ सिनेमातून अस्सल बंगाली म्हाताऱ्याची भूमिका साकारून अभिनयातील शहेनशहा आपणच असल्याचे पुनश्च सिद्ध केले आणि तो भाव खाऊन गेला. प्रेक्षकांनीही ‘पिकू’मधील बिग बीच्या उत्तम भूमिकेला तितकाच उत्तम प्रतिसादही दिला. त्यामुळेच नवीन वर्षांच्या दुसऱ्याच आठवडय़ात झळकणार असलेल्या ‘वझीर’ या हिंदी सिनेमातील बिग बीच्या भूमिकेबाबत आणि पर्यायाने एकूणच सिनेमाविषयी निश्चितच औत्सुक्य निर्माण झाले आहे.
बिग बीची यात प्रमुख भूमिका असली तरी फरहान अख्तर हा सिनेमाचा नायक आहे. आणि त्याशिवाय महत्त्वपूर्ण परंतु पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत जॉन अब्राहम आणि नील नितीन मुकेश हे कलावंतही झळकणार आहेत. त्यामुळे बडी स्टारकास्ट हा या सिनेमाचा आणखी एक पैलू म्हणता येईल.
‘वझीर’चे ट्रेलर पाहिल्यावर अमिताभ आणि फरहान हे एकमेकांचे मित्र असल्याच्या भूमिकेत बुद्धिबळ खेळताना दिसतात. राजा किंवा बादशहा ही व्यक्ती प्रभावशाली आणि ‘कॅप्टन ऑफ दी शिप’ अशीच असते. मात्र राजाच्या वतीने वझीर अनेक चाली खेळतो, युद्ध आणि राजकारण याबाबतचे निर्णय घेतो आणि राज्यशकट हाकण्यात यशस्वी ठरतो, असे आपल्याला कथा-कादंबऱ्या, पौराणिक कथा, दंतकथा या माध्यमातून ठाऊक असते.
ट्रेलरवरून तरी एटीएस अधिकारी असलेला फरहान अख्तर हा वझीरला संपविण्यासाठी सज्ज झालेला आहे. एक दहशतवादी कट उधळून लावून वझीरला पकडण्याच्या प्रयत्नात हा अधिकारी आहे. त्यात खलनायक अनेक कारस्थाने करून दानिश अली म्हणजेच फरहान अख्तरला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. त्याला संपविण्यासाठी अनेक कट रचतात हे सारे दोन ट्रेलर पाहून आपल्याला समजू शकते. त्यावरून हा सिनेमा थरारपट असेल असे वाटते. परंतु फरहान अख्तरने मात्र आपल्या मुलाखतीत हा भावनिक व नाटय़पूर्ण या प्रकारातील सिनेमा आहे असे म्हटले आहे.
एटीएसचा अधिकारी म्हणून दानिश अली खलनायकांच्या मागे लागतो आणि त्यांचे कट उधळून लावून त्यासाठी रणनीती आखतो यात थरार नक्कीच आहे. परंतु रूढार्थाने हा थरारपट नाही, असे फरहानने म्हटले आहे.
भावनिक अंगाचे कथानक हे महत्त्वाचे आहे, असेही फरहानने नमूद केले असून त्यावरून तरी सरसकट सर्वच हिंदी सिनेमांप्रमाणे यातही दानिश अली या नायकाची प्रेमकथा, त्यांचे प्रेम यशस्वी होऊ नये किंवा नायक-नायिकेचे लग्न होऊ नये म्हणून अडचणीची स्थिती निर्माण करण्याचे खलनायकांचे प्रयत्न, त्यावर नायकाने केलेली मात वगैरे तद्दन फिल्मी गोष्टी या सिनेमातही पाहाव्या लागतील, असे मानायला पुष्टी देणारे विधान फरहानने केले आहे.
‘पिकू’मधील वैशिष्टय़पूर्ण भूमिका आणि वेशभूषेनंतर ‘वझीर’ येत असल्यामुळेही यात व्हीलचेअरवर बसलेला अमिताभ ट्रेलरमधून तरी खूपच राजकारण तरबेज, कारस्थानी वगैरे असावा असे वाटते. किंबहुना दानिश अली आणि पंडित ओंकारनाथ धर यांची मैत्री फक्त ट्रेलरमधील बुद्धिबळ खेळण्यात रंगून गेलेल्या दोघांच्या दृश्यांवरून दिसतेय. परंतु खरे तर एटीएस अधिकारी म्हणून दानिश अली खलनायकांविरुद्धची रणनीती आखण्यासाठी आणि एकुणातच पंडित ओंकारनाथ धर यांना ‘फ्रेण्ड, फिलॉसॉफर आणि गाइड’ असे मानणारा वाटतोय.
आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा पंडित ओंकारनाथ धर ही भूमिका साकारणे शारीरिकदृष्टय़ा जिकिरीचे होते असे बिग बीने म्हटले आहे.
दिग्दर्शक बिजॉय नाम्बियार यांनी ट्रेलरमधून तरी फरहान आणि बिग बी यांच्या भूमिका आणि वावर याविषयी एक प्रकारची गूढता जोडली आहे असे वाटतेय. ८ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच हे गूढ उकलणार आहे.
‘शैतान’ आणि ‘डेव्हिड’ असे दोन हिंदी चित्रपट बिजॉय नाम्बियारने दिग्दर्शित केले असून ‘शैतान’ गाजला होता. ‘डेव्हिड’ हा सिनेमा खूप गाजला नसला तरी त्याचा निर्मितीखर्च वसूल झाला होता. नेहमीपेक्षा वेगळी कथावस्तू आणि ‘ट्रीटमेंट’ मात्र नाम्बियार यांच्या दोन्ही सिनेमांमध्ये पाहायला मिळाली होती हे मात्र खरे. त्यामुळेच नाम्बियार यांच्या या तिसऱ्या बिगबजेट, बडे कलावंत असलेल्या सिनेमाकडून अर्थातच अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
अदिती राव हैदरीने फरहान अख्तरच्या नायिकेची प्रमुख भूमिका साकारली असून जॉन अब्राहम हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत तर नील नितीन मुकेश ‘वझीर’ या खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.