ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांचे स्वगतहे आत्मचरित्र डिंपल पब्लिकेशनतर्फे नुकतेच प्रकाशित झाले. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश..

एक दिवस थोर साहित्यकार रणजित देसाई यांची ‘राजा रविवर्मा’ ही कादंबरी माझ्या हातात पडली. ती कादंबरी भन्नाट होती. मी सुधाताई (करमरकर) आणि पंतांना (प्रभाकर पणशीकर) यावर उत्तम नाटक होईल म्हणून सांगितलं. फक्त रणजित देसाईंची आधी परवानगी मिळाली तर मी लिहायला घेईन. तोवर मला कादंबरीतून नाटक शोधता यायला लागलं आणि लिहिताही यायला लागलं होतं. सुधाताई म्हणाल्या, ‘‘तू आधी नाटक लिही, मग परवानगीचं बघू.’’ सुधाताई, पंत आणि डॉ. काशिनाथ घाणेकर हे रणजित देसाईंचे मित्र होते. मी नाटक लिहायला घेतलं आणि एका महिन्यात पहिला ड्राफ्ट पुरा केला. मला पंतांचा फोन आला, ‘‘आज ऑफिसवर शिवाजी मंदिरला ये.’’ त्यांचा ‘तो मी नव्हेच!’चा प्रयोग ‘शिवाजी’ला होता. नाटक सात-साडेसातला सुटणार होतं. मी माझं ऑफिस करून शिवाजी मंदिरात गेलो. तर मेकअपरूममध्ये सुधाताई होत्या. आम्ही दोघं जाऊन मागच्या पॅसेजमध्ये बसलो. त्या म्हणाल्या, ‘‘तुझं नाव मी ‘मला काही सांगायचं आहे’ या नाटकातल्या ‘बाप्पाजी’ या रोलसाठी सुचवलंय. तो रोल ज्येष्ठ अभिनेते जगन्नाथ कांदळगावकर करायचे. पण ते ‘चंद्रलेखा’त गेल्यामुळे पंतांनी नाटक पुनर्जीवित करताना त्या व्यक्तिरेखेसाठी तुझा विचार केला.’’ ‘तो मी नव्हेच!’चा प्रयोग संपला. पंत प्रेक्षकांना भेटत होते. तोपर्यंत राजा कराळे (आमचा ‘नाटय़संपदा’चा मेकअपमन आणि आमचा मित्र) बाप्पाजीचा पांढरा विग, मिशी, भुवया घेऊन माझ्याजवळ आला आणि माझ्यावर त्याने विग, मिशी, भुवया ट्राय केल्या. ‘अशोक परफेक्ट बाप्पाजी दिसतोय!’ असे त्याने सर्टिफिकेट दिलं. एवढय़ात पंत आले आणि माझ्याकडे बघून ‘वा!’ म्हणाले. त्यांनी सांगितलं, ‘‘दोन प्रयोग मुंबईत करून कोल्हापूर, बेळगाव दौऱ्यावर आपण जाणार आहोत.’’ अर्थात, डॉक्टर (काशिनाथ घाणेकर) या नाटकात होतेच. माझी तालीम सुधाताई आणि पंत यांनी घेतली. ताईने मला ‘राजा रविवर्मा’चं स्क्रिप्ट दौऱ्यावर आठवणीने घेऊन येण्यास सांगितलं. मुंबईचे सर्व ‘हाऊसफुल्ल’ प्रयोग करून आम्ही कोल्हापूरला व नंतर बेळगावी गेलो. प्रयोग रात्री होता. सुधाताई, मी, पंत, डॉक्टर आम्ही रणजित देसाईंच्या घरी सकाळी दहा वाजता गेलो. फोन केल्यामुळे माधवीताईने छान पापलेट केले होते. डॉक्टर त्यांचा खूप लाडका होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सुधाताई रणजितदादांना म्हणाल्या, ‘‘हा अशोक समेळ. यांनी ‘डोंगर म्हातारा झाला’ लिहिलं होतं. छान लिहिलं होतं. आता यांनी तुमच्या ‘राजा रविवर्मा’वरून नाटक लिहिलंय.’’ तसे दादा कुत्सित हसले आणि म्हणाले, ‘‘त्या प्रा. मधुकर तोरडमलांनीही ‘रविवर्मा’वर नाटक लिहिलंय. त्यात दोन बायकांत सापडलेला दादला म्हणजे रविवर्मा त्यांनी लिहिला आहे. तुझा काही वेगळा असेल असं मला वाटत नाही.’’ त्या थोर माणसाने एकदम रोखठोक बोलून टाकलं. मी निराश न होता, न घाबरता त्यांना सांगितलं, ‘‘माझा रविवर्मा- ज्याने फक्त आपल्या चित्राचा ध्यास घेतलाय आणि सुगंधाकडे तो फक्त एक मॉडेल, एक वस्तू म्हणून पाहतोय आणि पुरुतार्थीकडे फक्त पत्नी म्हणून पाहतो.’’ दादांनी माझ्याकडे रोखून पाहिलं आणि सुधाताईंना विचारलं, ‘‘तुमचा दौरा कसा आहे?’’ पंतांनी बेळगावचा मुक्काम सांगितला. दादा म्हणाले, ‘‘उद्या माझ्या संस्थानी कोवाडला ये, येताना सुधा या अशोकला घेऊन ये!’’

बेळगावजवळ तासावर ‘कोवाड’ हे रणजितदादा देसाईंचं संस्थान. ते राजे होते. बिचाऱ्या ताई मला घेऊन दुसऱ्या दिवशी एसटीने कोवाडला गेल्या. तिथे दादांनी एक प्रवेश ऐकला आणि मला म्हणाले, ‘‘तुला अजून काही रीराइट करायचं असेल ते कर आणि चार दिवस सुट्टी काढून इथे ये. लिहिताना घाई करू नकोस. मी तुझं नाटक ऐकल्यावर सुधाशी बोलेन. तोपर्यंत ‘रविवर्मा’ कुणाला देणार नाही.’’ आमचं काम झालं! आम्ही मुंबईत परत आलो. डॉक्टरांनी मला सगळे रणजितदादांकडे झालेले डिटेल्स विचारले आणि म्हणाले, ‘‘बच्चा, नाटक चांगलं लिही.’’ जर मला तुझं नाटक आवडलं तर मी तुझ्या ‘रविवर्मा’त काम करेन.’’ हा मला सुखद धक्का होता. पंत लगेच म्हणाले, ‘‘डॉक्टरांनी काम केलं तर मी हे नाटक नाटय़संपदेतच करेन.’’ मी पटकन् त्यांना ‘नाटक दिलं’ म्हटलं!

‘रविवर्मा’चं लिखाण चालू होतं. एका महिन्याने मी सुधाताईंना ‘नाटक छान लिहून झाले’ म्हणून सांगितलं. ताई म्हणाल्या, ‘‘मी बालनाटकाच्या शिबिरात बिझी आहे. तू कोवाडला जा. मी दादांना कळवते. सध्या माधवीताई तिथं राहत नाहीत, त्या गोव्याला ‘शांता दुर्गा’ला राहतात!’’ माधवीताई देसाई हे व्यक्तिमत्त्व म्हणजे चित्रपती भालजी पेंढारकरांच्या कन्या. त्यात उत्तम साहित्यिक, सावळा रंग, सात्त्विक चेहरा आणि सर्व पांढरे केस, त्यामुळे त्यांचं पावित्र्य उठून दिसायचं. काही मतभेदांमुळे माधवीताई रणजितदादांपासून दूर गेल्या होत्या. जेव्हा मी कोवाडला गेलो तेव्हा दादा एकटे होते. प्रेमाने माझं त्यांनी स्वागत केलं. आम्ही नाश्ता केला आणि नाटक वाचायला सुरुवात केली. पानागणिक येणाऱ्या प्रत्येक संवादावर ‘श्रीमान योगी’कार रणजितदादा माझा हात धरून ढसढसा रडत होते. सकाळी दहा वाजता सुरू केलेलं नाटकाचं वाचन, मला पुन्हा पुन्हा वाचायला लावत होते त्यामुळे रात्री नऊ वाजता ते संपलं. त्यांना शेवट खटकत होता. म्हणाले, ‘‘त्या सुगंधा मुळगांवकरला विष पिऊन शेवटी झोपवू नकोस, नाही तर नाटक झोपेल!’’ तसे दादा प्रचंड मिश्किल आणि रसिकही. घरात दोन कोपऱ्यांत एक एक तंबोरा होता. एकाची तार छेडली की दुसरा वाजत असे. अनेक अ‍ॅन्टिक पीस त्या ‘कोवाड’च्या भव्य वाडय़ात होते. रात्री आम्ही ‘आनंदपान’ करताना ते फक्त नाटकाबद्दल बोलत होते. एवढंच नव्हे, तर सुधाताई आणि डॉ. घाणेकरांना फोन करून ‘या पोराने सुंदर नाटक लिहिलंय’ म्हणून पुन्हा पुन्हा माझं कौतुक करत होते. रात्री मला ‘गेस्ट रूम’ दिली. सकाळी आठ वाजता उठलो आणि पाहतो तर दादा मी उठण्याची वाट बघत बसले होते. मी उठल्यावर मला लगेच बाजूला बसवून म्हणाले, ‘‘नाटकाचा शेवट कसा करायचा?’’ मग दोन-तीन पर्याय ठरवले. पुन्हा नाटकावर चर्चा केली. मी निघालो तेव्हा दादा रडायला लागले. ‘अजून राहा रे’ म्हणत सतत आग्रह करत होते. माझ्या नोकरीची अडचण त्यांना सांगितली. तसं म्हणाले की, ‘‘मी मुंबईला डॉक्टरला घेऊन तुझ्या घरी येईन, तोपर्यंत तुला लिहून ठेवायचे ते ठेव!’’

मी मुंबईत आलो. पंतांना सगळी हकिगत सांगितली. ते म्हणाले, ‘‘नाटक खर्चिक आहे. डॉक्टर काम करायला तयार आहे, पण त्याला वाचून दाखवायला लागेल! ते तू कर आणि हा पावसाळा जाऊ  दे, आपण हे नाटक शांतपणे पण वैभवात करू!’’ त्याप्रमाणे मी सर्वाना कळवलं. त्याच आठवडय़ात डॉक्टर माझ्या घरी आले. मी वाचन केलं. डॉ. घाणेकरांची अवस्थाही दादांसारखीच झाली. सहा महिन्यांत नाटक करायचं ठरलं!

दरम्यान, सर आल्फ्रेड हिचकॉक यांचा ‘सायको’ हा सिनेमा त्यावर मी नवीन नाटक लिहावं, म्हणून मला हॉन्ट करत होता. मी ‘सायको’चा मूळ लेखक रॉबर्ट ब्लॉच याची कादंबरी विकत घेतली आणि दोन-तीनदा वाचली. ‘परकाया प्रवेश’ ही संकल्पना ब्लॉचने जी कादंबरीत वापरली होती ती अफलातून होती. सिनेमा या माध्यमात ते शक्य होतं, पण नाटक लिहिणं कर्मकठीण होतं. हे आव्हान मी स्वीकारलं व अ‍ॅन्थनी पर्किन्स या नटाने केलेल्या भूमिकेचा- ‘नॉर्मन’चा मी ‘नामदेव इस्माईल भाटवडेकर’ केला आणि आई नॉर्मा- प्रेक्षकांसमोर दृश्य स्वरूपात आणली. ‘पिंजरा’ हे ते नाटक. ते बाळ रणखांबेला दिग्दर्शनाला दिलं. ‘पिंजरा’ नाटक जोरात चालू होतं. जेव्हा जेव्हा डॉ. घाणेकरांना वेळ मिळायचा तेव्हा ते ‘पिंजरा’ला यायचे आणि विंगेत बसून प्रचंड दाद द्यायचे. शेवटी मी त्यांचा शिष्य होतो. त्यांनी ते नातं कधीच मानलं नाही. मी त्यांच्या लेखी त्यांचा फक्त जिवलग मित्र होतो. त्यांचा ‘बच्चा’ होतो.

एक दिवस सकाळी डॉ. घाणेकरांचा मला फोन आला, ‘‘रणजितदादा देसाई आले आहेत आणि संध्याकाळी आम्ही तुझ्या घरी ‘रविवर्मा’संदर्भात येतोय. आपण वाचन करू. रात्री आम्ही तुझ्याच घरी राहणार आहोत.’’ एवढी दोन मोठी माणसं येणार म्हणून मी त्यांच्या पाहुणचाराची माझ्या परीने उत्तम सोय केली. त्या रात्री रणजित देसाईंना घेऊन डॉ. घाणेकर माझ्या घरी आले. डॉक्टर घरी यायचे, पण आज विशेष दिवस होता. नाटकाचं वाचन झालं. रणजितदादा प्रचंड रडत होते आणि डॉक्टर भारावून ‘वा! वा!’ अशी दाद देत होते! नाटक दोघांना प्रचंड आवडलं आणि करायचं ठरलं. डॉक्टर ‘रविवर्मा’ नाटकाने पछाडले गेले आणि परत परत माझ्या घरी येतच राहिले. पुन्हा पुन्हा काही बदल मला सुचवले. ‘‘बच्चा, माझी एन्ट्री कशी असते माहीत आहे ना तुला?’’ डॉक्टरांची प्रत्येक नाटकातली एन्ट्री, आधी आतून ते ओरडतात आणि मग एन्टर होतात. त्यांचा आवाज ऐकला की प्रेक्षकांच्या टाळ्या सुरू होतात आणि त्या टाळ्या घेत डॉक्टर एन्ट्री घ्यायचे. ‘रविवर्मा’ची एन्ट्रीही त्यांनी तशीच लिहून घेतली. डॉक्टर ‘रविवर्मा’ हे नाटक त्यांच्या सर्व मित्रांना वाचून दाखवत असत. तो मनस्वी कलाकार स्वत:ला राजा रविवर्माच समजू लागला होता.

मी हे सर्व पंत पणशीकरांना सांगितलं, पण त्यांनी नाटक लगेच करायचं मनावर घेतलं नाही. कारण त्यांना माहीत! मी डॉक्टरांना सांगितलं तसे ते भडकले, ‘‘मी करेन हे नाटक!’’ आणि त्या दोघांच्या भांडणात मी भरडलो गेलो. मला काय करावं सुचेना. त्या दरम्यान डॉक्टर ‘तुझं आहे तुजपाशी’च्या मराठवाडा/नागपूर दौऱ्यावर गेले होते. अमरावतीचा प्रयोग रात्री झाला. तेव्हा फोन लागणं मुश्किल होतं. त्यात डॉक्टर माझ्यावर चिडले होते. शेवटी मी मिसेस घाणेकर, कांचनताईंना सकाळी फोन केला आणि म्हणालो, ‘‘डॉक्टरांचा फोन आला तर त्यांना सांगा ‘राजा रविवर्मा’ नाटकाचे संपूर्ण हक्क मी तुम्हाला दिले आहेत!’’ त्यादेखील खूष झाल्या. मीदेखील शांत झालो! पणशीकरांची समजूत मी घातली असती, घालणार होतो. कधी कधी पंत विचित्र वागायचे! आता डॉ. घाणेकर दौऱ्याहून परत येण्याची वाट पाहत होतो.

एवढय़ात एका तासाने सुधाताई करमरकरांचा फोन आला, ‘‘अशोक, आपला काशिनाथ हार्ट अटॅक येऊन अमरावतीला वारला.’’ माय गॉड! माझ्या डोक्यावर सगळं आभाळ कोसळलं. फक्त ५६ वय, हे काय मरण्याचं वय? मी ताईंना पुन्हा पुन्हा विचारलं. बातमी खरी होती. माझा ‘रविवर्मा’ मला पोरका करून कायमचा निघून गेला होता. मी प्रचंड नव्‍‌र्हस झालो. पण त्याच रात्री डॉक्टर स्वप्नात येऊन ओरडले, ‘‘कम ऑन बच्चा! शो मस्ट गो ऑन.’’