29 February 2020

News Flash

हलकाफुलका सिनेमा

मराठी चित्रपटांमध्ये अनेक नवनवीन कलावंत, तंत्रज्ञ, निर्माते-दिग्दर्शक काम करण्याचे प्रमाण वाढले आहे.

मराठी चित्रपटांमध्ये अनेक नवनवीन कलावंत, तंत्रज्ञ, निर्मातेदिग्दर्शक काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. हिंदूीतील बडे कलावंत, दिग्दर्शक, निर्माते मराठी चित्रपटांकडे वळले की त्याची खूप चर्चा केली जाते. हिंदूी सिनेमापेक्षा निराळ्या सिनेमांतील कलावंत, तंत्रज्ञ, दिग्दर्शक मराठी चित्रपटात आले तर मात्र त्याची तितकीशी चर्चा होत नाही. कार्तिक शेट्टी हे यांपैकीच एक नाव घेता येईल. मुंबईत जन्मलेला, वाढलेला कार्तिक शेट्टी कानडी असला तरी मराठी भाषेशी, मराठी लोकांशी आणि म्हणून मराठी चित्रपटांशी त्याचे नाते जुळले आहे.

फिल्म प्रॉडक्शनचे रीतसर शिक्षण घेतल्यानंतर कार्तिक शेट्टीने अवघ्या १९ व्या वर्षी २००६ साली ‘भक्ती हीच खरी शक्ती’ या नावाचा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यानंतर तो कन्नड चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून दाखल झाला. आता कार्तिक शेट्टीने ‘ठण ठण गोपाळ’ हा दुसरा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला असून ३० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

अभिनय, दिग्दर्शनाबरोबरच कार्तिकने मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे कन्नड अ‍ॅक्शनपट ‘युवा’ या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी त्याची निवड झाल्याचे त्याने सांगितले.

ठण ठण गोपाळ’ या चित्रपटाविषयी बोलताना कार्तिक म्हणाला की, एका अंध मुलाची ही गोष्ट आहे. सर्वसाधारणपणे शारीरिक व्यंग असलेल्या मुलांना लोक सहानुभूतीने वागवतात. अंध, मूकबधिर किंवा शारीरिक अपंगत्व असलेल्या लहान मुलांना, व्यक्तींनाही आपल्या समाजात दयेची वागणूक मिळताना दिसते. अनेक चित्रपटांतूनही अशीच दयेची, सहानुभूतीच्या व्यक्तिरेखा रंगविण्यात आल्याचे प्रेक्षकांनी पाहिले असेल; परंतु ‘ठण ठण गोपाळ’ या चित्रपटात आमचा नायक गोपाळ हा अंध असला तरी त्याला कुणाच्या सहानुभूतीची, दयेची गरज नाही असा आहे. अंध असला तरी तो खूप खेळकर, खोडकर आणि अतिशय डँबिस म्हणता येईल अशा स्वभावाचा मुलगा आहे. आईवडिलांचे निधन झाल्यामुळे लहान वयातच त्याचा सांभाळ त्याचा मामा करत असतो. चाळीतील गोपाळच्या वयाच्या बच्चेकंपनीला गोपाळ आवडत नाही. कारण तो खूप खोडकर असतो. गोपाळ आणि त्याचा मामा यांच्यातले नाते निराळ्या छटेचे या चित्रपटात पाहायला मिळेल, असेही कार्तिकने नमूद केले.

गोपाळला चाळीत नव्याने राहायला आलेला एक त्याच्या मामाच्या वयाचा माणूस भेटतो जो वारली चित्रकार आहे. तो भेटल्यानंतर गोपाळशी त्याची गट्टी जमते आणि गोपाळचे आयुष्य बदलून जाते तो चित्रपटाचा गाभा आहे.

चित्रपटाच्या शीर्षकावरून चित्रपट विनोदी असावा असे वाटते, असे विचारल्यावर कार्तिकने सांगितले की, ठण ठण गोपाळ हे शब्द आपण मराठीत निरनिराळ्या अर्थाने उच्चारतो. चित्रपटातून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचा विषय गंभीर असला तरी तो एकदम हलक्याफुलक्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अंध मुलगा हाच चित्रपटाचा नायक आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा चित्रपट करताना खूप उपदेशामृत पाजल्यासारखे पडद्यावर हा चित्रपट पाहतो आहोत असे प्रेक्षकांना अजिबात वाटू नये हाच मुख्य उद्देश होता. त्यामुळे आम्ही अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने चित्रपटाला ‘ट्रीटमेंट’ दिली आहे.

एका चित्रपटाच्या सेटवर अंशत: अंध असलेल्या एका तरुणाशी भेट झाली होती. त्याच्याशी चांगली मैत्रीही झाली होती. त्याचे व्यक्तिमत्त्व जसेच्या तसे आपण गोपाळ या व्यक्तिरेखेत उतरविले आहे, असेही प्रांजळपणे कार्तिकने सांगितले.

खरे तर पटकथा लिहून झाल्यानंतर चित्रीकरण सुरू करायचे असे ठरल्यानंतर आधी गोपाळ या व्यक्तिरेखेसाठी सुयोग्य बालकलाकार शोधणे आवश्यक होते. म्हणून आम्ही जवळपास ६०७० मुलांच्या ऑडिशन्स घेतल्या. एवढेच नव्हे तर खऱ्याखुऱ्या अंध मुलांच्याही ऑडिशन्स घेतल्या; परंतु मला हवा असलेला ‘गोपाळ’ सापडलाच नाही. चित्रपटाचा नायक सापडत नसेल तर हा चित्रपट करण्यात काय हशील म्हणून चित्रपट न करण्याचा निर्णय मी घेतला. परंतु त्यानंतर दोनतीन दिवसांनी विवेक चाबुकस्वार ऑडिशनसाठी आला. त्याने एक सीनही करून दाखविला आणि त्याच्यातील ‘अ‍ॅटिटय़ूड’ पाहूनच मला हवा असलेला ‘गोपाळ’ सापडला आणि उत्साहाने चित्रपट सुरू केला, असे कार्तिकने आवर्जून सांगितले.

सुझेन बर्नेट ही जर्मन अभिनेत्रीही यात महत्त्वाच्या भूमिकेत असून श्रीनिवास शिंदे आणि राहुल पोटे हे कार्यकारी निर्माते आहेत.

चित्रपटाची कथापटकथा आपली असून संवादलेखन वैभव परब यांनी केल्याची माहिती कार्तिकने दिली. अभिनेता मिलिंद गवळी यांनी वारली चित्रकाराची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी एकदीड महिना वारली चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले असून मिलिंद गुणाजी यांची व्यक्तिरेखाही आतापर्यंतच्या त्यांच्या भूमिकांपेक्षा एकदम निराळी पाहायला मिळेल, अशी माहितीही कार्तिकने दिली.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट कार्तिकने सांगितली ती म्हणजे चित्रपट प्रेक्षकांना आवडेल की आवडणार नाही ही नंतरची बाब आहे. परंतु चित्रपट पाहताना आणि चित्रपटगृहांतून बाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांना विवेक चाबुकस्वारने रंगविलेला गोपाळ जरूर आवडेल आणि लक्षात राहील हे नक्की.

First Published on October 23, 2015 1:32 am

Web Title: than than gopal a marathi film by southern director kartik shetty
Next Stories
1 प्रेम येतोय परत…
2 फॅमिली सागा
3 कपिलची रोमॅण्टिक कॉमेडी!
X
Just Now!
X