19 February 2020

News Flash

रोमान्सचा महिना

यंदाचा फेब्रुवारी हा ‘फिल्मी रोमान्स’चा महिना आहे असे म्हणायला हरकत नाही

फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांपासून फेब्रुवारी महिना जवळ आला महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, सातवी ते दहावी इयत्तांमध्ये शिकणारी मुले-मुली यांच्यापासून ते अगदी विवाह झालेल्या जोडप्यांपर्यंत सर्वानाच १४ फेब्रुवारी या ‘व्हॅलेण्टाइन डे’चे प्रचंड औत्सुक्य वाटू लागते. ‘व्हॅलेण्टाइन डे’ला प्रियकर-प्रेयसी यांच्यासाठी बाजारपेठही असंख्य भेटवस्तू आणि त्यातही गुलाबी रंगांनी सजलेली पाहायला मिळते. प्रियकर-प्रेयसी असलेले अनेक जण ‘व्हॅलेण्टाइन डे’च्या दिवशी विवाहबद्ध होऊन मुहूर्त साधतात, असेही अलीकडे पाहायला मिळते. जगभरात सर्वत्र ‘व्हॅलेण्टाइन डे’चे अप्रूप, अपार कौतुक केले जात असल्यामुळे रुपेरी पडदा तरी हा मुहूर्त साधण्यासाठी सज्ज न झाला तरच नवल. म्हणूनच यंदाचा फेब्रुवारी हा ‘फिल्मी रोमान्स’चा महिना आहे असे म्हणायला हरकत नाही.

यंदाच्या १४ फेब्रुवारीला रविवार असल्यामुळे सिनेमावाल्यांना गल्ला गोळा करण्यासाठी उत्तम दिवस सापडला आहे. बॉलीवूडवाल्यांनी ५ आणि १२ फेब्रुवारी हे दोन शुक्रवार यंदा रोमॅण्टिक सिनेमांचा धडाका लावला आहे. त्यानंतरचा १९ फेब्रुवारीचा शुक्रवारही प्रेमपट प्रदर्शित होणार आहेत.

‘सनम तेरी कसम’ आणि ‘लवशुदा’ हे  चित्रपट ५ तारखेला तर ‘फितूर’ आणि ‘सनम रे’ हे चित्रपट १२ फेब्रुवारीला आणि त्यानंतरच्या शुक्रवारी ‘डायरेक्ट इश्क’, ‘इश्क फॉरेव्हर’ असे चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या २६ फेब्रुवारीच्या शुक्रवारीही ‘लव्ह शगुन’ हा रोमॅण्टिक कॉमेडीपट प्रदर्शित होणार आहे.

खरेतर बॉलीवूडमध्ये प्रेमपट हाच मुख्य चित्रपट प्रकार असतो. प्रत्येक चित्रपटात नायक-नायिकांची प्रेम व्यक्त करणारी गाणी, दृश्ये आणि प्रेमकहाणी या जोडीला अन्य विषयांची फोडणी दिलेली नेहमीच सिनेमात पाहायला मिळते.

lp22एकंदरीत ‘व्हॅलेण्टाइन’ महिन्यात सात प्रेमपट प्रदर्शित होणार असले तरी त्यापैकी ‘फितूर’ हा बडय़ा बॅनरचा आणि बडय़ा कलावंतांचा चित्रपट आहे. यात आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ अशी नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचे कथानक काश्मीरमध्ये घडणारे आहे. कतरिना, आदित्य यांच्याव्यतिरिक्त अभिनेत्री तब्बू या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘आशिकी २’ या गाजलेल्या प्रेमपटात श्रद्धा कपूरसोबत दिसलेल्या आदित्य रॉय कपूरने ‘दावत-ए-इश्क’ या तुलनेने कमी गाजलेल्या चित्रपटात परिणीती चोप्रासोबत प्रेम जमवले होते. आता एकदम कतरिना कैफचा प्रियकर म्हणून तो प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आदित्य-कतरिना या नव्या जोडीला प्रेक्षक स्वीकारतील का, हा खरा प्रश्न आहे.

पुलकित सम्राट हा प्रेक्षकांना दोन-तीन चित्रपटांमुळे माहीत असलेला नट ‘सनम रे’ या चित्रपटातून झळकणार आहे. त्याची नायिका यामी गौतम साकारणार आहे.  ‘यारिया’ या २०१४ साली गाजलेल्या चित्रपटाची दिग्दर्शक दिव्या खोसला कुमारचा हा दुसरा चित्रपट आहे. यामी गौतम आणि पुलकित सम्राट हे दोघेही तुलनेने कमी लोकप्रियता असलेले कलावंत असल्यामुळे ‘सनम रे’बाबत फारशी चर्चा लोकांमध्ये नाही. त्याचबरोबर अद्याप या चित्रपटाची विशेष प्रसिद्धीही झालेली नाही.

त्यापेक्षा अधिक चर्चा ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाची केली जात आहे. कारण तेलुगू अभिनेता हर्षवर्धन राने या चित्रपटाद्वारे हिंदीत पदार्पण करीत आहे. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तेलुगू आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असून पाकिस्तानी मॉडेल, व्हिडीओ जॉकी मावरा हुसैन ही त्याची नायिका म्हणून दिसणार असून तिचाही हा पहिलाच बॉलीवूडपट ठरणार आहे.

‘रमय्या वस्तावय्या’ या २०१३ साली झळकलेल्या चित्रपटाद्वारे पदार्पण केलेला अभिनेता गिरीश कुमार हा ‘लवशुदा’ या दुसऱ्याच चित्रपटातून प्रमुख भूमिकेत दिसणार असून नवनीत कौर धिल्लाँ ही मॉडेल या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.

एकंदरीत फेब्रुवारी महिन्यात दर शुक्रवारी दोन किंवा एक प्रेमपट झळकणार आहेत. सर्वसाधारणपणे प्रेमपटातून पदार्पण करण्याचा मोठा ट्रेण्ड पूर्वीपासूनच बॉलीवूडमध्ये दिसून येतो. नंतर गाजलेल्या अनेक कलावंतांनी खासकरून अभिनेत्यांचा पदार्पणातील चित्रपट हा प्रेमकथेचाच असतो. एक-दोन चित्रपटांत काम केलेल्या अभिनेत्यांना नवोदित अभिनेत्रीसोबत काम करणे सोपे जाते. मात्र अनेक चित्रपटांत काम केल्यानंतर कतरिना कैफ-आदित्य रॉय कपूर या जोडीला प्रेक्षक स्वीकारतील का याबाबत उलटसुलट चर्चा बॉलीवूडमध्ये रंगली आहे.
सुनील नांदगावकर –

First Published on January 22, 2016 1:29 am

Web Title: valentine day 3
टॅग Love,Valentine Day
Next Stories
1 थरार आणि मनोरंजन
2 सनीचा दिग्दर्शकीय ‘घायल’
3 भावनिक आणि नाटय़पूर्ण ‘वझीर’
Just Now!
X