06 July 2020

News Flash

देता देता घेत जावे..!

‘देता देता मलाच किती उदंड मिळालं आहे’ असं वाटत आहे.

प्रत्यक्ष ‘आश्वासक जगणं’ म्हणजे काय ते दाखवणारी अनेक माणसं ही मला ‘आजचे पसायदान’ लिहिण्यासाठी मिळालेली शिदोरी होती. ती शिदोरी असंख्य विचारी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम बनता आलं याचा आनंद वाटतो. म्हणूनच ‘देता देता मलाच किती उदंड मिळालं आहे’ असं वाटत आहे.

मला खात्री आहे की, लेखाचे शीर्षक वाचल्यावर ज्यांनी विंदांची ‘देणाऱ्याचे हात घ्यावे’ कविता वाचली आहे अशा अनेकांना ‘छपाईची काही चूक झाली आहे का?’ असा प्रश्न पडेल. विशेषत: ‘देता-घेता’ या शब्दाची उलटापालट कशी काय झाली असेल असा; पण ती मुद्दामच केली आहे. का तेही विस्तारानं सांगते. ‘आजचे पसायदान’मधील सदरलेखनाला सुरुवात केली, ती गेल्या काही वर्षांत या विषयानं मनावर जे गारूड केलं होतं ते यानिमित्तानं शब्दांत पकडण्याचा प्रयत्न करावा म्हणून.
ओघाओघात वाचकांपर्यंत त्यातलं काही ना काही पोहोचेल अशी माफक कल्पना होती. हा विषय कदाचित थोडा बोजड वाटेल, एकदा वाचून दाद देण्यापुरता ठीक आहे; उदाहरणं, प्रयोगसुद्धा बहुतांश परदेशातले असल्यानं वाचकांना काहीसा परकेपणा वाटेल, अशा शंका कुरतडत होत्या, पण मला त्यानं इतकं मोहून टाकलं होतं की, ‘हे लिहायचंय!’ असं ठरवलं होतं. प्रत्यक्षात अनुभव असा आला की, प्रत्येक लेखाबरोबर जबाबदारीची जाणीव वाढतच गेली. अगदी पहिल्या लेखापासूनच वाचकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यात परिचयाची, स्नेही मंडळी तर होतीच, पण अक्षरश: ‘चांद्यापासून बांद्यापर्यंत’ म्हणतात तसं भारतापासून ते ‘ई-वृत्तपत्रामधून’ मातृभूमीची नाळ जोडती ठेवणारी परदेशस्थ महाराष्ट्रीय मंडळीही होती. ज्या शनिवारी लेख प्रसिद्ध व्हायचा त्या सकाळी आठपासूनच मोबाइलचा एसएमएस िरगटोन चालू व्हायचा. बरेचदा ‘छान जमलाय/ मस्त/ आवडलाच’ अशा प्रतिसादांमुळे सकाळ अजून प्रसन्न उत्साही वाटायची, तर कधी ‘थोडा अवघड आहे या वेळचा’ अशाही दिशा दाखवणाऱ्या टिप्पण्या असायच्या, ज्या सिग्नलसारखं काम करायच्या!
मुळात हा विषय घ्यावा असं मला का वाटलं, ते थोडं या समारोपाच्या लेखाच्या निमित्तानं सगळ्यांपर्यंत पोहोचवायला हवं, असं मला वाटतं. गेली पंचवीसेक वष्रे मानसशास्त्राची अभ्यासक म्हणून काम करताना या विषयानं मला अंतर्बाहय़ झपाटून टाकलं आहे. आपण पुढे पुढे जात राहावं आणि समोरचं क्षितिजही पुढे सरकत राहावं तसं हे शास्त्र! जितकं खोलात जाऊ तेवढी पुढची दरी दाखवणारं! मग रोजच्या जगण्यातली मनाची गुंतागुंत निरखायचा चाळाच लागला. इतरांच्या वागण्या-विचारांचं निरीक्षण जास्त तटस्थपणे, पण बारकाईनं व्हायला लागलं आणि जोडीला स्वत:च्याही! जेव्हा कुणी मन मोकळं करण्यासाठी यायचं तेव्हाही कळायचं की, आपण फक्त साधन म्हणून समजून घ्यायचंय. अधूनमधून मनातले प्रश्न/विचार व्यक्त केले तरी समोरची व्यक्ती तिचे प्रश्न सोडवायला पूर्ण सक्षम असते, यावरचा विश्वास वाढत गेला आणि तिथंच ‘आश्वासक मानसशास्त्राची’ प्रचीती यायला लागली.
जेव्हा यावरचे लेख, पुस्तकं, काही प्रयोग वाचनात यायला लागले तेव्हा त्याची व्यापकता समजायला लागली आणि मग म्हटलं तर हा विषय किती सोपा आहे, रोजच्या जगण्यात अनुभवता येणारा आहे ते कळायला लागलं. मग आपल्याला जे आणि जेवढं कळतंय ते अल्पस्वल्प का असेना इतरांसोबत वाटून घेऊ या विचारानं हे लेखन घडलं.
कुठलंही साहित्य वाचताना (मग ते ललित असो वा वैचारिक) जर आपल्याला आपलं प्रतििबब त्यात दिसायला लागलं, तर ते तात्कालिक मनोरंजन किंवा बौद्धिक व्यायामाच्या पलीकडे नेऊन आपल्या अनुभवजगात प्रवेश करतं. लुईसा मे अल्कॉटच्या ‘लिटिल वुमन’बद्दल असं म्हणतात की, ते प्रकाशित व्हायच्या आधी लुईसाच्या मुलीनं ते वाचायला घेतलं आणि तिची जी समाधी लागली, त्यातल्या बहिणींच्या सुखदु:खाशी ती छोटी पोर जी काही एकरूप झाली, की ते बघून लुईसाला आपल्या लेखनाचा खरा प्रतिसाद मिळाला. माझी अशी इच्छा होती की, हे सदर जरी एका शास्त्रीय/सद्धांतिक विषयाला धरून असलं तरी ते वाचकांना आपलं वाटावं. तसा प्रामाणिक प्रयत्न केला. कधी जमला, कधी विषयाच्या किंवा माझ्या मर्यादेमुळे तितकासा नाही जमला. पण ज्या प्रकारचे वाचकांचे प्रतिसाद मिळाले, त्यामुळे लेखनाचा आनंद आणि हुरूप नक्कीच वाढला.
‘दु:ख हवे मज..’वाचून दुर्धर आजाराशी धर्यानं दोन हात करणाऱ्या एका समुद्रापार राहणाऱ्या मत्रिणीनं केलेलं हितगुज.. ‘नियम पाळावे..’ वाचून अनेक विद्यार्थ्यांनी – (सर्व वयांतल्या) लिहिलेलं स्वत:चंच परखड परीक्षण, ‘भले-बुरे जे घडून गेले..’ नंतर किती तरी जणांनी वाटून घेतलेले स्वत:चे हृदयाच्या तळाशी ठेवलेले अनुभव.. असं किती तरी प्रकारे माझ्याशी या लेखनबंधातून जोडले गेलेले- ‘स्व’चा जाणीवपूर्वक विचार करणारे काही ओळखीचे, काही प्रथमच भेटणारे वाचकस्नेही मला लाभले. माझी मानसशास्त्राची जाणीव तर त्यामुळे कैकपटींनी समृद्ध झालीच, पण इतक्या लोकांच्या विश्वासाला मी पात्र ठरले, या कल्पनेनं जबाबदारीची जाणीवही शतपटींनी वाढली.
एक-दोन प्रसंग मात्र तपशिलात सांगितल्यावाचून राहावत नाही. बऱ्याचदा चित्रपटात आपण लहानपणानंतर दीर्घकाळानं अत्यंत फुटकळ योगायोगानं अचानक भेटलेले भाऊ/बहीण पाहातो आणि त्यातल्या ‘चमत्कारा’ला हसतो. ‘आजच्या पसायदाना’मुळे मला खरंच माझा एक भाऊ तब्बल बत्तीस वर्षांनंतर भेटला. नुसता भेटला नाही तर मधे खूप काळ गेलाच नाही असा आमचा स्नेह त्या भेटीनं पुन्हा एकदा ताजातवाना झाला. त्यासाठी या ‘योगा’चे आभारच मानले पाहिजेत. असाच सुखद धक्का बसला जेव्हा मुंबईतील ‘शिवशक्ती गणेश मंडळ’ (कांजूरमार्ग)च्या संदीप सारंग यांचा मेल आला तेव्हा! त्यांच्या गणेशोत्सवाच्या देखाव्यासाठी ‘कृतज्ञ मी – कृतार्थ मी’ या लेखाची संकल्पना त्यांनी वापरली आणि त्याच्या छायाचित्रणाची प्रत मला पाठवली. खरोखर त्या लेखाचा आशय इतका सुंदर पद्धतीनं दृक्-श्राव्य माध्यमातून त्यांनी जिवंत केला आहे की, डोळे भरून यावेत. लेखातील मर्यादित आशयापलीकडे जाऊन त्यांनी किती तरी व्यापक मांडणी त्या देखाव्यातून केलेली आहे आणि हजारो लोकांपर्यंत ती पोहोचवली आहे. खरोखरच मी त्यांची मनापासून ऋणी आहे.
आपल्याला भावलेला एखाददुसरा लेख आवडल्याचं अनेकांनी आवर्जून कळवलंच, माझे आईबाबा- प्रत्येक लेखाचे चिकित्सक वाचक होतेच, पण मला विशेष आनंद झाला आणि खूप छान वाटलं ते याचं की, मी लातूरला दहावीच्या वर्षी ज्या शाळेत शिकले तिथल्या माझ्या एका अध्यापकांनी जवळजवळ प्रत्येक लेखानंतर मला फोन करून रसग्रहण तर केलंच, पण अजून कुठे काय बदल हवा, असंही सुचवलं!
या सदराच्या वाचकांनी आपापल्या जगण्याशी यातले प्रसंग, त्यावरचं भाष्य लावून पाहिलं, याचा मला खूप आनंद होतो. त्यातून काही जणांना त्यांची दुरावलेली-हरवलेली नाती परत सापडली, तर काहींना स्वत:समोरच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची उमेद मिळाली. अनेकांनी असं व्यक्तकेलं, की जणू आमच्याच मनातले विचार कुणी तरी आमच्या वतीनं मांडतंय!
हे सगळं लिहिताना मला अगदी पूर्ण कल्पना आहे की, ही एक धडपड आहे या विषयातील मूळ अभ्यासक, मानसशास्त्रज्ञ यांची दूत म्हणूनच मी थोडा प्रयत्न केला आहे. यात काही जमलं आहे, पण काही अपुरेपणाही राहिला आहे. कदाचित याहीपेक्षा अजून सोप्या भाषेत मांडायला हवंय की, ज्यामुळे त्यातला ‘भाषेचा’ बोजडपणा, दबाव, किचकटपणा निघून जाईल! पण तरीही ज्या उत्साहाने, आपलेपणाने वाचकांनी या विषयाला आपलंसं केलं, त्यामुळे त्याची किती गरज आहे हेही अधोरेखित झालंय. अनेकांनी असं म्हटलं की, हे सर्व लिखाण सलग वाचायला मिळालं तर खूप उपयोग होईल. त्यामुळे खरंचच याचं ‘पुस्तक’ प्रकाशित करावं असं मनात येतंय. त्यावर काही कामही सुरू केलंय. इतक्या त्वरेनं केलेली माझी ही पहिलीच कार्यवाही असेल, पण ‘आश्वासक’ प्रोत्साहनामुळे ती करायला मी प्रवृत्त झाले, खरंय!
या मांडणीसाठी अर्थातच मी काही पुस्तकांचा आधार घेतला. त्यातील मुख्य म्हणजे ‘पॉझिटिव्ह सायकॉलॉजी’ या शीर्षकाची दोन पुस्तकं (लेखक Steve Baumgardner, Mary Chrothers आणि C.R. Snyder, Shance Lopez) याशिवाय इंटरनेटवर येणाऱ्या साहित्यानं माझ्या माहितीत खूप भर पडली. या शास्त्रीय परिभाषेतील माहितीच्या जोडीला वेळोवेळी उल्लेख केलेलं ललित साहित्य, वैचारिक साहित्य, उत्तमोत्तम चित्रपट आणि प्रत्यक्ष ‘आश्वासक जगणं’ म्हणजे काय ते दाखवणारी अनेक माणसंही मला यासाठी मिळालेली शिदोरी होती. ती असंख्य विचारी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम बनता आलं याचा आनंद वाटतो. म्हणूनच ‘देता देता मलाच किती उदंड मिळालं आहे’ असं वाटत आहे. समारोप करताना कवितेच्या काही ओळी आठवत आहेत.
पाण्यामध्ये पडलास ना? पाणी कसेही ते असो..
आता टळेना पोहणे.. त्याला तयारी पाहिजे! – (विंदा करंदीकर)
असं ‘जगण्यात पडलेल्या’ आपण सर्वानी जर आश्वासक मन:शक्ती घेऊन लढायचं ठरवलं, तर मानसिक आरोग्याचा किल्ला आपण जास्त भक्कम बनवू शकू! सर्वाना त्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

anagha.lavalekar@jnanaprabodhini.org
(सदर समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2015 1:55 am

Web Title: chaturang article on hopeful life
टॅग Chaturang,Human Life
Next Stories
1 तुझे आहे तुजपाशी..
2 अपराधमुक्ती
3 समाधानी आयुष्याचा चढता आलेख
Just Now!
X