‘मनाचे श्लोक’ ही तर मानसशास्त्र समजून घेणाऱ्यांसाठी पर्वणीच आहे. विवेकबुद्धी, विचार नियंत्रण, वासना संयम, अपराधीपणातून मुक्ती अशा अनेक पैलूंवर त्यात संक्षेपाने मांडणी केली आहे. त्यातून रामदास स्वामी हे किती कसलेले मानसशास्त्रज्ञ होते, त्याची प्रचीती येते.

एखाद्या हौशी प्रवासवेडय़ानं नव्या मोहिमेच्या ओढीनं तयारी करावी, खूप अनोळखी ठिकाणं बघण्याची उत्सुकता जोपासावी, समजून घेण्याची ओढ बाळगावी आणि प्रत्यक्ष प्रवासाला प्रारंभ केल्यावर काही काळानं लक्षात यावं की, ‘जे खूप नवीन, अनोळखी वाटेल अशी अपेक्षा होती, तिथे ठायी-ठायी ओळखीच्या निजखुणा सापडत आहेत. निसर्ग तोच फक्त त्याचे विभ्रम वेगळे असं जाणवत आहे,’- तसंच काहीसं ‘आश्वासक मानसशास्त्रा’चं हे ‘आजचे पसायदान’ सदर लिहिताना सतत वाटत होतं. कुठलाही विषय अभ्यासायला, मांडायला घेतला की कस्तुरीमृगासारखा वाटायचं, ‘अरे, हे ऐकलंय-वाचलंय कुठे तरी आणि तेव्हाही स्पर्शून गेलंच होतं. आज ते या अभ्यासाच्या निमित्तानं ठळकपणे जाणवतंय!’
मग असं ठरवलं, की आपण कस्तुरीमृगासारखं अतृप्त नाही राहायचं. खोलातला अभ्यास आत्ता शक्य नसला तरी आपल्या घडणीच्या काळात जे जे कानावर पडलं, समजून घ्यावंसं वाटलं असं भारतीय मातीतून उमगलेलं ‘आश्वासक विचारधन’ आधुनिक मानसशास्त्रातील कुठल्या संकल्पनांची निजखूण (ओळखीची खूण) पटवत आहे ते पाहायचं. आणि काय आश्चर्य? माझ्या अगदी तोकडय़ातल्या तोकडय़ा अनुभवविश्वातसुद्धा असे किती विचारकण लक्षात आले म्हणून सांगू! ओढून-ताणून- अभिनिवेशानं नव्हे तर अगदी सहज- रात्रीची कळी पहाटे फूल होऊन सामोरी यावी तसे! मी ज्या मांडणीबद्दल लिहिते आहे ती सगळी ज्या काळात झाली, त्या काळात आधुनिक विज्ञानाच्या पद्धती रुजायच्या होत्या, त्यामुळे त्या वेळी मनसंस्कारासाठी परिणामकारक मानलेल्या ‘जीवनधर्म’ नावाच्या व्यापक मांडणीचा एक भाग म्हणून कधी ओवी/ भजनं/ श्लोक/  कहाण्या/ ललित अशा माध्यमांतून त्या लोकांपर्यंत अत्तरासारख्या सूक्ष्म अर्करूपात पोचल्या. ज्यानं त्यानं आपल्या क्षमतेप्रमाणं, प्रकृतीप्रमाणं त्याचा सुगंध घ्यावा.
दृढनिश्चयाबद्दल आपण बरंच वाचलं. अनेक शास्त्रीय अभ्यास पाहिले. नचिकेताची गोष्ट तरी वेगळं काय सांगते? ध्रुवाचा वज्रनिश्चय वेगळं काय दाखवतो? व्रतबंधासारखा संस्कार (जो दुर्दैवानं नंतर एकाच ज्ञातीला चिकटला) खरं तर सर्व संस्कारेच्छु मनांसाठी मांडला गेला नसेल का? त्यातील सहा व्रते स्व-संयमाची परखड शिकवण देणारीच नाहीत का? आणि हे सगळं आंधळेपणानं मुळीच नाही करायचं! मला आठवतं, ज्ञान प्रबोधिनीत शिकत असताना (आणि आजतागायत) जी एक उपासना आम्ही म्हणायचो, त्यात संत सोहिरोबांचा एक अभंग आहे, ‘हरिभजनावीण काळ घालवू नको रे..’ कै. आप्पांच्या उत्कट स्वरात तो ऐकल्याचंही स्मरतं. त्यातली शेवटच्या कडव्यातली ओळ मनात अगदी लख्ख रुतून बसली आहे, ‘सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथ कैची दिवसराती? अनुभवाविण नेत्रपाती, हालवू नको रे..’. (प्रचीतीशिवाय, पुराव्याशिवाय पापणीसुद्धा लववू नकोस. एकाही गोष्टीवर अंधविश्वास ठेवू नकोस) असं म्हणणारे सोहिरोबा विज्ञाननिष्ठेचा किती दृढ आग्रह धरत होते, ते आठवलं.
मध्यंतरी ग्रंथप्रदर्शनाला गेले असता, एक पुस्तक असंच अनाहूतपणे हाती पडलं. विनोबांच्या ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ या संकलित लेखसंग्रहाची अनुक्रमणिका नजरेला पडली आणि एकेका प्रकरणाचं शीर्षक वाचताना वाटत गेलं, अरे, आश्वासक मानसशास्त्राचा सगळा-सगळा अर्थ या लेखांमध्ये उलगडून दाखवला आहे. या पुस्तकात विनोबा म्हणतात, ‘विचारनिष्ठा हीच विवेकनिष्ठा- विज्ञाननिष्ठा आहे. आद्य शंकराचार्यानी म्हटले आहे की, ‘साक्षात श्रुतींनी जरी सांगितले की अग्नी थंड आहे तरी त्यावर विश्वास ठेवू नका! हे विज्ञान कमळा तुझ्या पाकळ्या शतदलांनी उमलू देत!’ भारतीय धर्मविचाराचे वळण वैज्ञानिकच आहे, असं विनोबांनी आग्रहानं म्हटलं आहे. ते खऱ्या अर्थानं संस्कारक्षम वयात मुलांपर्यंत पोचलं तर त्यांच्या विचारभावनांमधली आश्वासकता वाढायला मदत होईल असं ते वाचताना जाणवलं.
‘सद्गुणांच्या जोपासने’बद्दल तर किती दिशांनी बोललं गेलं आहे! भगवद्गीतेतील संपूर्ण सोळावा अध्याय त्याचंच विवेचन करतो. ‘निर्भयत्व- मन:शुद्धि (अ. १६ श्लोक) १. आश्वासकतेसाठी पूरक अशा मनोगुणांचं केवढं वर्णन त्यात आहे. खरं तर गीतेतील प्रत्येक अध्यायाचं नाव आश्वासक मानसशास्त्राच्या कुठल्या ना कुठल्या पलूवर भाष्य करण्याचं संकेत देतं, चौदाव्या अध्यायातील  ‘सत्व-रज-तम’ गुणांची मांडणी असेल, बाराव्या अध्यायातील ‘न उल्लासे न संतापे’ (गीताई १२ श्लोक १७) हा भावना स्थिर ठेवण्याचा मार्ग असेल, दुसऱ्या अध्यायातील स्थिरत्व बुद्धीचे सांगणारे स्थितप्रज्ञ दर्शन असेल, हे रोजच्या जगण्यातील मनोव्यापारांसाठीच मांडलेलं नाही का? म्हणूनच कदाचित स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, ‘युवकांनी मदानावर जोशात फुटबॉल खेळण्याबरोबरच गीतेनं दिलेलं ज्ञान ही समजून घ्यायला हवं!’
लहानपणी शिकलेला श्लोक- ‘समुद्रवसने देवी पादस्र्पश क्षमस्व मे!’- सर्व सजीव-निर्जीव सृष्टीविषयीची कृतज्ञता सहज मनात रुजवून जातो. तीच कृतज्ञता आजच्या एका इंग्रजी चित्रपटात Act of Random Kindness’ (ARK) बनून आपल्या समोर येते. (संदर्भ- इव्हान ऑलमायटी), निर्हेतूक-फलनिरपेक्ष मनाने एखाद्याला केलेली छोटीशी मदतही माणसाला किती प्रगल्भ बनवते, ते समोर येतं. ‘कृतज्ञता’ संकल्पनेची मांडणी तर आपल्या साहित्यात ठायी ठायी आहे, व्यवहारामध्येही आहे हे अनेक प्रथा-परंपरांतून समोर येतं. सर्वाचा विस्तार इथे देणं शक्य नाही.
आश्वासक मानसशास्त्रातील उद्दिष्टसाधना (Goal orientation) याविषयीचा लेख अनेकांना भावला. खरं तर लहानपणापासूनच ऐकलेल्या किती तरी कथांमधून हा विचार ऐकला आहे, हे स्मरतं. मग तो अर्जुनानं लहान वयात भेदलेला पोपटाचा डोळा असो वा संस्कृत सुभाषितांमधला- ‘कितीही संकटे आली तरी श्रेष्ठजन आपल्या मार्गापासून तसूभरही ढळत नाहीत’, असं सांगणारा श्लोक असो. दृढनिश्चयाची आणि त्यासाठी केलेल्या साधनेची उदाहरणं प्राचीन काळ ते आजच्या ‘पोस्टमॉडर्न’ काळापर्यंत आपल्याकडेही घडोघडी आढळतात.
‘मनाचे श्लोक’ ही तर मानसशास्त्र समजून घेणाऱ्यांसाठी पर्वणीच आहे. विवेकबुद्धी, विचार नियंत्रण, वासना संयम, अपराधीपणातून मुक्ती अशा अनेक पलूंवर त्यात संक्षेपाने मांडणी केली आहे. त्यातून रामदास स्वामी हे किती कसलेले मानसशास्त्रज्ञ होते, त्याची प्रचीती येते. मनाचं भटकेपण अधोरेखित करताना, ‘बहु हिंडता सौख्य होणार नाही’ (श्लोक ४१)- आपणहून सुखाचा जीव दु:खमय करणारा माणूस ‘उभा कल्पवृक्षातळी दु:ख वाहे’ (श्लोक ९१), ‘कळेना कळेना कळेना कळेना’ (श्लोक १४२) अशी पूर्ण निराश, गोंधळलेली अवस्था! किती सूक्ष्म वर्णनं रामदासांनी केली आहेत! आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ठायी ठायी नेमके उपाय सुचवले आहेत. ‘विवेके क्रिया आपुली पालटावी’ (श्लोक १०५), ‘विचारूनी बोले विवंचूनी चाले’ (श्लोक १३२), ‘विवेके देहेबुद्धि सोडोनी द्यावी’, (श्लोक १२) हे तर नुसते मासले आहेत.
संपूर्ण योगशास्त्र तर मनोधारणेसाठीच निर्माण झालं आहे, असं म्हणण्यात मुळीच अतिशयोक्ती नाही. शरीर हे तिथं केवळ साधनमात्र आहे. ‘तत्रकाग्रं मन: कृत्वा- यतचित्तें द्रिय: क्रिय:! उपविश्यासने युत्र्जात् योगमात्मविशुद्धये ‘हा श्लोक दरवर्षी ज्ञान प्रबोधिनीच्या विद्याव्रत संस्कार कार्यक्रमात ऐकते- म्हणते तेव्हा पूर्ण तादात्म्य किती महत्त्वाचं आहे ते कळतं. (गम्मत म्हणजे हल्ली मला असा अनुभव येतो की, कंगवे साफ करणं, क्रॉकरी पुसणं, कपडय़ाची शिवण उसवणं अशी फालतूतली फालतू वाटणारी कृती करतानासुद्धा ठरवलं तर मन असं पूर्ण एकात्म करता येतं. कानाशी येऊन कुणी टाळी वाजवली तरी कळत नाही. फक्त गॅसवर तापायला ठेवलेल्या दुधाचा अपवाद. त्या वेळी मात्र मला नेमकं काही तरी दुसरं करायचं सुचतं, तोपर्यंत दुधानं शेगडीवर धाव घेतलेली असतेच!) बौद्ध विचार प्रवाहातील ‘विपश्यना’ साधनासुद्धा अशी स्वत:शीच स्वत: तादात्म्यपासून केलेल्या मूक संवाद रूपानं येते. अनेकांना त्याचे परिणाम स्वत:मधील सूक्ष्म बदलांमधून जाणवतात. त्यावरही ‘भारतीय मानसशास्त्र’ विषयांतर्गत प्रचंड संशोधन सुरू आहे.
जी मांडणी आधुनिक शास्त्रातून प्रयोग सिद्धतेनं होत आहे तीच सूक्ष्मरूपाने तत्त्वज्ञान ग्रंथातून, संतवचनातून अर्करूपानं ठायी ठायी दिसू लागली की मन मुग्ध होतं. या दोन्हींची सांगड व्यवहारात कशी घालायची, असा प्रयत्न करावासा वाटतो. आधुनिक साहित्यातूनही असा प्रयत्न जाणता-अजाणता झाला आहेच. एकच उदाहरण देते- अल्बर्ट एलिस हा विवेकनिष्ठ  विचारपद्धतीचा उद्गाता मानला जातो! पण जेव्हा एलिसचं नाव आपल्याकडे एवढं सुपरिचित नव्हतं तेव्हाही आपल्या एका तर्कनिष्ठ-प्रगल्भ कवीनं, िवदा करंदीकर यांनी लिहिलेल्या या ओळी पाहा-
केले कुणास्तव ते किती- ते कधी मोजू नये
होणार त्याची विस्मृती- त्याला तयारी पाहिजे
विंदा अजून एका कवितेत म्हणतात,
माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी
त्याने स्वत:ला जिंकणे, एवढे लक्षात ठेवा!
डॉ. आनंद नाडकर्णीनी ‘विषाद योग’ पुस्तकातून अशी सांगड घातली आहे, तर
डॉ. उषाताई खिरे यांनी ‘समर्थ जीवनासाठी समर्थ विचार’ यातून! मघा उल्लेखिलेल्या लेखसंग्रहात विनोबा म्हणतात, ‘हृदय (मन) आणि बुद्धीत विरोध नाही, उलट कमालीची एकरसता आहे. गरज आहे ती भावनांना वेळावेळी बुद्धीनं तपासून बघण्याची!’ हव्याशा भावना बळकट करून नकोशा भावनांची तीव्रता कमी करता येते, हेच मुक्ताबाईनं ‘ताटीच्या अभंगां’मध्ये ज्ञानोबा माऊलींना समजावलेलं नाही का? आश्वासक मानसशास्त्र तरी काय निराळं सांगतं?
मी ‘भारतीय मानसशास्त्र’ शाखेचा पद्धतशीर अभ्यास केलेला नाही, त्यामुळे जे संदर्भ मी दिलेत ते समुद्रातल्या एका थेंबाएवढे, फक्त माझ्या अनुभव-वाचन विश्वातील आहेत हे मला पूर्ण माहीत आहे. यातून कुठलीच मांडणी- ‘आधी/नंतर- श्रेष्ठ/कनिष्ठ’ ठरवण्याचा प्रश्नच नाही. जाणवतं इतकंच की माणसाच्या मनाची, विचारांची उन्नती संस्कृती निरपेक्ष होतच असते. मात्र आपापल्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार होत असते. पाश्चिमात्य शास्त्रे ही वस्तुनिष्ठ प्रयोगशीलतेतून विकसित झाली तर पौर्वात्य शास्त्रे व्यक्तिनिष्ठ अनुभवावरून मांडली गेली. दोन्ही आपापल्या ठिकाणी खरी, उपयुक्तच आहेत. सुदैवाने आज या दोन्हीतील पूरक गोष्टींचा समन्वय करून वेगळी अभ्यासपद्धती मांडण्याला वेग आला आहे, हे खूप आश्वासक आहे.
म्हणूनच असं वाटलं की पाश्चात्त्य विचारांचा अभ्यास मांडता मांडता भारतीय दृष्टिकोनाचं दार थोडं किलकिलं करून पाहावं! त्या छोटय़ाशा फटीतूनच एवढा प्रकाश आत आला की, आता दार उघडून त्या प्रकाशाला आतला सर्व आसमंत अजून उजळवण्यासाठी बोलावलंच पाहिजे, अशी ओढ लागली आहे मला. तुम्हालाही?
anagha.lavalekar@jnanaprabodhini.org

Google New App Photomath let you take a picture of a math equation and help you solve it step by step
गूगलकडे आहे ‘असा’ एक ॲप; विद्यार्थ्यांची गणितं सोडवली जातील मिनिटांत, जाणून घ्या
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…
Indian Institute of Science Education and Research
विज्ञान दिनी विज्ञानप्रेमींना मेजवानी! खुला दिवस, शास्त्रज्ञ संवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन